ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आमचे सर्व जाणीवयुक्त अस्तित्व ईश्वराशी संपर्क साधेल, ईश्वराशी नाते जुळवेल असे केले पाहिजे; ईश्वराला आम्ही हाक दिली पाहिजे आणि त्याने आमच्यात येऊन आमचे सर्व अस्तित्व रूपांतरित करावे, त्याला स्वत:च्या ईश्वराच्या अस्तित्वाचे रूप द्यावे असे आम्ही त्यास आळवले पाहिजे; याचा अर्थ असा की, आमच्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनला पाहिजे, आणि योगाचा प्रभु या नात्याने त्याने आमच्या खालच्या व्यक्तितेला दिव्य रूपांतराचे केंद्र, स्वत:च्या व्यक्तितेच्या पूर्णतेचे साधन बनवले पाहिजे. या साधना-पद्धतीचा अभ्यास केला असता, त्याचा योग्य तो परिणाम घडून येतो.

दिव्य प्रकृतीच्या कल्पनेत मग्न असलेल्या आमच्या जाणिवेचे, जाणीवशक्तीचे दडपण, अर्थात आमच्या तपाचे दडपण आमच्या एकंदर अस्तित्वावर पडून, या दडपणाला अनुरूप अशी अभिव्यक्ति, अनुभूति आमच्यात घडून येते. अर्थात आमच्या मर्यादित अंधकारमय अस्तित्वावर दिव्य, सर्वज्ञ, सर्वकारक ईशतत्त्व उतरून, आमच्या सर्व निम्नतर प्रकृतीला क्रमशः अधिकाधिक प्रकाश देऊन, अधिकाधिक समर्थ करते आणि कमी दर्जाचे मानवी ज्ञान व मर्त्य क्रिया सर्वथा बाजूला सारून, त्याच्या जागी आपली स्वत:ची क्रिया चालू करते.

या साधनेच्या कार्याचे मानसशास्त्रीय स्वरूप सांगायचे तर असे म्हणता येईल की, या पद्धतीमुळे अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रासह, सर्व साधनसंभारासह क्रमशः अहंभावातीत परमतत्त्वाच्या स्वाधीन होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, हा मार्ग जवळचा मार्ग नाही, तेथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहून अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. या मार्गात तीन टप्पे असतात; केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमय असते.

पहिला टप्पा : या टप्प्यांत आमचा अहंभाव हा ईश्वराशी संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यांत केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याने होत असते, खालच्या प्रकृतीने वरच्या प्रकृतीचे स्वागत करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे ह्यासाठी खालच्या प्रकृतीची व्यापक व परिपूर्ण तयारी करावयाची असते. त्यामुळे हे काम मोठ्या कष्टाचे असते; हा झाला दुसरा टप्पा.

तिसरा टप्पा : खालच्या प्रकृतीचे या टप्प्यांत वरच्या प्रकृतीत अंतिम रूपांतर होत असते. हा शेवटला टप्पा आनंदमय व लवकर चालून संपतो. बाकी दोन टप्प्यांसाठी महान श्रद्धा, धैर्य, सबुरी लागते, हे वर आलेच आहे. तथापि, एक गोष्ट येथे सांगणे योग्य होईल की, वास्तवांत ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आम्हांकडे बघत असते व ती आमचा दुबळेपणा पाहून स्वत:च पुढे होते आणि आम्हाला आधार देते. आमची श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी आम्हाला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती ‘आंधळ्याला पाहण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते ‘, असे एका ठिकाणी तिचे वर्णन आहे. आमच्या बुद्धीला ही जाणीव होते की, आम्हाला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आमच्या मदतीला आहे, तिला अशीही जाणीव होते की, आम्हाला मदत मिळत आहे व या मदतीमुळेच आम्ही चढण्याचे कष्ट करू शकत आहोत; आमचे हृदय आम्हाला सांगते की, सर्व वस्तुजाताचा स्वामी आम्हा मानवांचा मित्र आहे; ते सांगते की, विश्वमाता आम्हाला हात देत आहे. आम्ही अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व माता आम्हाला हात देऊन सावरतात. तेव्हा आमच्या बुद्धीची व आमच्या हृदयाची ही जाणीव व हे सांगणे लक्षात घेता, असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाने मिळणारे प्राप्तव्य, यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद

(CWSA 23-24 : 45-46)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

46 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago