Posts

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल.

योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून)

शरीर हे काही वस्त्रासारखे नाही; किंवा आजारी शरीर हे देखील फाटक्या वस्त्राप्रमाणे नाही. शरीर जरी दुर्बल किंवा आजारी पडले तरी ते स्वतःला परत पुनरुज्जीवित करू शकते, त्याची प्राणिक शक्ती ते परत मिळवू शकते, हे असे हजारो लोकांच्या बाबतीत घडत असते. पण कापडामध्ये मात्र पुनरुज्जीवन करणारी जीवनशक्ती नसते. व्यक्ती जेव्हा पंचावन्न किंवा साठ वर्षे वयाच्या पलीकडे जाते तेव्हा हे पुनरुज्जीवन अवघड होऊन बसते; परंतु अगदी तेव्हासुद्धा आरोग्य आणि शक्ती कायम राखता येते किंवा शरीर सुस्थितीत राखण्यासाठी ते पुन्हा होते तसे होऊ शकते.

तुम्हाला आंतरिक अस्तित्व या शब्दांनी नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला उमगले नाही. जर तुम्हाला ‘विकास’ या शब्दांनी साधनेचा विकास अभिप्रेत असेल तर, त्यासाठी आरोग्याची पुन्हा प्राप्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे. मन आणि प्राणाप्रमाणेच शरीर हे पण साधनेसाठी आवश्यक असे साधन आहे आणि होता होईल तितके ते सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंतरिक अवस्थेच्या तुलनेत त्याला काही फारसे महत्त्व नाही असे समजून, त्याची हेळसांड करणे, हा काही या (पूर्ण)योगाचा नियम नाही.

(CWSA 31 : 558)

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल.

हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील.

तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)

कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो.

ज्यामुळे शरीरात समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल अशाच रीतीने सर्व शारीरिक क्रियांची आखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासना-तृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी-अधिक अचेतनेचा काळ येतो, या स्थितीत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुले होते आणि मनुष्याची जाणीव खाली उतरते.

तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेने स्वत:ची तयारी करावयाची असेल, तर त्याने सुखोपभोगासाठी, एवढेच नव्हे, तर आराम म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्ताने सुद्धा आपली जाणीव ढिसाळपणा व निश्चेतनतेपर्यंत कधीच खाली घसरू देता कमा नये. व्यक्तीने शक्ती आणि प्रकाश यामध्येच विश्रांती मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे.

म्हणूनच प्रगतीची आस बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ब्रह्मचर्यत्वाचे व्रत असले पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वत:ला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठी तयार करावयाचे असेल, त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याची जागा संपूर्ण परिवर्जनाने (abstinence) घेतली पाहिजे. हे परिवर्जन बळजबरीने व दमनाने नव्हे तर, एक प्रकारच्या आंतरिक किमयेमुळे साध्य झाले पाहिजे. सर्वसाधारणपणे प्रजननार्थ केलेल्या कृतीमध्ये ज्या शक्ती उपयोगात येतात त्या शक्तींचे, विकास आणि संपूर्ण रूपांतरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींमध्ये रूपांतर झाल्याचा परिणाम म्हणून ही आंतरिक किमया उदयास येते. हे तर उघडच आहे की, हा परिणाम संपूर्ण व खरोखरीच हितकारी होण्यासाठी मानसिक, प्राणिक जाणिवेतून इतकेच नव्हे तर, शारीरिक इच्छेतूनही सर्व कामप्रवृत्ती व कामेच्छा समूळ नष्ट व्हायला पाहिजेत. सर्व आमूलाग्र व चिरस्थायी रूपांतरण हे आतून बहिर्गामी दिशेने अग्रेसर होते त्यामुळे कोणतेही बाह्य रूपांतरण हे वरील प्रक्रियेचा स्वाभाविक व जवळजवळ अटळ असा परिणाम असते.

मानववंश जसा आहे तसाच चिरस्थायी राखण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, त्या मागणीपुढे मान तुकवून, तिचे हे साध्य यशस्वी व्हावे म्हणून, हा देह प्रकृतीला देऊ करावयाचा का; एका नूतन वंशाच्या निर्मितीच्या दिशेने टाकावयाचे पाऊल बनण्यासाठी, ह्या देहाची तयारी करावयाची ही निर्णायक निवड करावयास हवी. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणे शक्य नाहीत; व्यक्तीला भूतकालीन मानववंशाचा एक भाग बनून राहावयाचे आहे की, भावीकाळातील अतिमानववंशाशी संबंधित व्हावयाचे आहे, हे व्यक्तीने प्रत्येक क्षणी ठरवावयाचे आहे.

– श्रीमाताजी

दुर्दम्य हाक आली असेल तर आणि तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो. केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर या योगासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांपैकी ती एक आवश्यक बाब आहे, इतकेच.

*

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहिततता व संपूर्ण शरणागती यांजकडे वाटचाल करण्याचा ज्यांचा दृढ संकल्प आहे केवळ त्यांच्यासाठीच हा योग आहे.

*

पूर्णयोगामध्ये ईश्वराचा केवळ साक्षात्कार अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन अभिप्रेत आहे. तसेच, ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन जोपर्यंत सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते.

*

हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची ‘तयारी असल्या’ची खात्री पटल्याखेरीज, व्यक्तीने या मार्गामध्ये प्रवेश करता कामा नये. ‘तयारी असणे’, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. जर सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छाशक्ती असेल, तरच या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 27)

आंतरिक सत्याविषयी सजग होणे

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

चैत्य पुरुषाचे जागृत होणे आणि तो पुढे येणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चैत्य पुरुषाचे जागृत होणे म्हणजे मागे असलेल्या चैत्याची जाणीवपूर्वक कृती…

जेव्हा तो पुढे येतो तेव्हा तो मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अधिराज्य गाजवतो आणि त्यांच्या सर्व हालचालींचे चैत्यीकरण करतो. विशेषत: अभीप्सा बाळगून व कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, नि:शेषत्वाने श्रीमाताजींकडे पूर्णपणे वळल्याने आणि त्यांना समर्पित झाल्याने चैत्यपुरुष पुढे येतो. परंतु कधीकधी ‘आधार’ (मन, प्राण आणि शरीर) जर सक्षम झालेला असेल तर, अशावेळी तो स्वत:हूनच पुढे येतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 354-355)

जेव्हा चैत्य पुरुष पुढे येतो तेव्हा, व्यक्तीला, साध्यासुध्या उत्स्फूर्त अशा आत्मदानासहित चैत्य पुरुषाची जाणीव होते आणि मन, प्राण व शरीर यांच्यावरील त्याच्या चढत्या-वाढत्या थेट नियंत्रणाचा व्यक्तीला अनुभव येतो; हे नियंत्रण निव्वळ झाकलेल्या किंवा अर्ध-झाकलेल्या प्रभावातून आलेले नसते, तर ते थेट नियंत्रण असते.

विशेषत: जेव्हा चैत्य विवेक येतो तेव्हा विचार, भावनिक आंदोलनं, प्राणिक आवेग, शारीरिक सवयी एकाएकी उजळून निघतात आणि तेथे काहीच धूम्राच्छादित, झाकोळलेले, तिमिरात्मक असे शिल्लक रहात नाही; चुकीच्या हिंदोळ्यांऐवजी योग्य स्पंदने त्यांची जागा घेतात. हा चैत्य विवेक दुर्लभ आणि दुर्मिळ असतो.

*

केंद्रवर्ती प्रेम, भक्ती, समर्पण, सर्वस्वदान, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय हे नेहमीच स्वच्छपणे पाहणारी आणि आपोआपच अयोग्य गोष्टींना नकार देणारी आंतरिक दृष्टी ही चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

तसेच, समग्र आत्मनिवेदनाची प्रक्रिया आणि एखाद्या व्यक्तीने स्वत:मधील सर्वाचे श्रीमाताजींच्या प्रति केलेले समर्पण ही देखील चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 352), (CWSA 30 : 356)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)