Posts

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. Read more

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही.

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण दाखवितो, सांत्वनपर संदेश आणतो….
…अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते.
*
उगवणारी प्रत्येक उषा ही प्रगतीच्या नव्या शक्यता दृष्टिपथात आणते.
*
भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उष:प्रभेप्रत स्वत:स खुले करा, तुमच्यासमोर एक तेजोमय पथ उलगडेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 44 & 15 : 74, 97)

मार्ग लांबचा आहे पण आत्म-समर्पणामुळे तो जवळचा होतो. मार्ग खडतर आहे पण पूर्ण विश्वासामुळे तो सोपा होतो..

– श्रीमाताजी
(CWM 14 : 108)

जीवन आणि त्यातील संकटांना संयमाने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्यापाशी नाही, अशा व्यक्तीला साधनेमध्ये येणाऱ्या त्याहूनही खडतर अशा आंतरिक विघ्नांमधून पार होणे कधीच शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या कसोट्यांना शांत मनाने, निश्चल धैर्याने आणि ईश्वरी शक्तीवरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे, हाच पूर्णयोगाच्या साधनेमधील अगदी पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 111)

ईश्वराभिमुख होणे हेच केवळ जीवनातील एकमेव सत्य आहे.”

– श्रीअरविंद (CWSA 31 : 625)

मी नेहमी ऊर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे सौंदर्य, शांती, प्रकाश आहेत; ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी अभीप्सा बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा.

खाली, या विश्वातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 68)

मानसिक परिपूर्णत्व – २४

 

श्रीअरविंद एका साधकाला उत्तरादाखल लिहितात –

मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच आहे आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा बाळगणे आणि लक्ष्याच्या अंतापर्यंत जाणे. तुम्ही आत्तापर्यंत बरेचदा तसा निश्चय केला आहे – त्यावर दृढ राहा. प्राणाच्या वादळांना तुमच्या आत्म्याची अभीप्सा विझवू देऊ नका.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 71)

मानसिक परिपूर्णत्व – २३

 

श्रद्धा हा एक सर्वसाधारण शब्द आहे. श्रद्धा म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या प्रज्ञेविषयी, त्याच्या शक्तीविषयी, त्याच्या प्रेमाविषयी आणि त्याच्या कृपेविषयी जीवाला असणारी खात्री. विश्वास (confidence) आणि भरवसा (trust) हे श्रद्धेचे पैलू आहेत आणि श्रद्धेचा परिणाम देखील आहेत.

विश्वास (confidence) ही अशी एक खात्रीची भावना असते की, ईश्वराला प्रामाणिकपणे साद घातली तर, तो ती ऐकेल आणि मदत करेल आणि ईश्वर जे काही करेल ते भल्यासाठीच करेल.

भरवसा (trust) म्हणजे ईश्वरावर, त्याच्या मार्गदर्शनावर आणि त्याच्या संरक्षणावर मन व हृदयाने संपूर्णपणे विसंबून असणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 88)

मानसिक परिपूर्णत्व – २२

 

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण अशी एक जागा नेहमीच असते की, जिथे सारे काही खुले, साधे, सरळ असते – हे अनुभवलेले सत्य मी सांगत आहे. तुम्ही गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहाता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरिक दृष्टिकोनातून तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते – अगदी सहजतेने हे होते.

मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी म्हणत असत, ‘साधे राहा, साधे असा. जे तुम्हाला भावते तसेच साधेपणाने बोला. साधे असा, साधे असा.’ त्यांचा त्यावर खूप भर असे. पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा एक प्रकाशपथच माझ्यासमोर खुला होताना मला दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एक पाऊल, मग दुसरे पाऊल, हेच केवळ आपल्याला करावयाचे आहे,’ असे मला जाणवून गेले.

श्रीमाताजी स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत म्हणतात, सारी जटिलता इथे आहे, खूप जटिल, त्याच्याशी मिळतेजुळते घेणे खूप अवघड आहे. जेव्हा श्रीअरविंद ‘साधेसरळ असा’, असे म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य – तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता आणि अचानकपणे व्यक्ती जणू प्रकाशाच्या बागेतच उदयाला यावी तसे काहीसे झाले.

जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती.

साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, अगदी साधे, सहज. अगदी साधेपणा.

…साधेसरळ असणे असे ते ज्याला म्हणत आहेत, ती म्हणजे अगदी आनंददायी उत्स्फूर्तता, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असा, साधे असा, सरळ असा. एक आनंदी अशी सहजता. ते ज्याला ‘दैवी स्थिती’ असे म्हणतात ती उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे.

आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही मोकळे होते.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple : September 16, 1961)