कर्म आराधना – २८
कर्मामध्ये प्राणाचे समर्पण झाल्याची काही लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत –
सर्व जीवन आणि कार्य हे ‘श्रीमाताजीं’चे आहे याची केवळ कल्पना किंवा अभीप्सा नव्हे तर, जाणीव असणे आणि या आत्मनिवेदनामध्ये, समर्पणामध्ये व्यक्तीला प्राणिक प्रकृतीच्या उत्कट आनंदाचा अनुभव येणे. परिणामतः स्थिरचित्त समाधान आढळून येणे आणि कर्माप्रत आणि त्याच्या वैयक्तिक फळाबाबत असलेल्या अहंकारी आसक्तीचा अभाव असणे आणि त्याच वेळी कर्मामध्ये आनंद जाणवणे आणि आपल्या क्षमतांचा ईश्वरी कार्यासाठी उपयोग होतो आहे याचा अतीव आनंद होणे. आपल्या कृतींच्या पाठीशी ती ‘ईश्वरी शक्ती’ कार्यरत आहे आणि प्रत्येक क्षणाला ती मार्गदर्शन करत आहे याची जाणीव होणे.
कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा घटनेमुळे जिचा भंग होऊ शकणार नाही अशी सातत्यपूर्ण श्रद्धा असणे. अडचणी आल्याच तर, अशा व्यक्ती मनात कोणत्याही शंका उपस्थित करत नाहीत किंवा निष्क्रिय मूकसंमती देत नाहीत, तर त्यांच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, आपण प्रामाणिक आत्मनिवेदन केले तर, ‘ईश्वरी शक्ती’ अडचणी दूर करेल. या विश्वासानिशी अशा व्यक्ती त्या दिव्य शक्तीकडे अधिक प्रमाणात वळतात आणि त्यासाठी त्या शक्तीवर विसंबून राहतात. जेथे संपूर्ण श्रद्धा आणि आत्मनिवेदन असते, तेथे ‘दिव्य शक्ती’बाबत ग्रहणशीलतादेखील येते, या ग्रहणशीलतेतून व्यक्ती योग्य गोष्ट करू लागते आणि योग्य साधनं निवडते, नंतर परिस्थिती स्वतःशी जुळवून घेते आणि परिणाम दिसू लागतो.
या अवस्थेप्रत येण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे – सातत्यपूर्ण अभीप्सा, दिव्य शक्तीला आवाहन आणि तिच्याप्रत आत्मार्पण, आणि मार्गात अडथळा बनून उभ्या राहणाऱ्या स्वतःमधील आणि सभोवतालच्या सर्व गोष्टींना नकार देण्याचा संकल्प. सुरुवातीला नेहमीच अडचणी असतात आणि परिवर्तनासाठी जोवर त्यांची आवश्यकता असते तोवर त्या अडचणी राहणारच. पण त्या अडचणींना व्यक्ती एका स्थिर श्रद्धेने, संकल्पाने आणि चिकाटीने सामोरी गेली तर त्या नाहीशा होणे अपरिहार्यच असते.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233-234]






