Posts

सद्भावना – ०४

सत्याने वागण्याचा एकच एक मार्ग आहे, व्यक्तीला जे सर्वोच्च सत्य आहे असे जाणवते केवळ तेच आपल्या प्रत्येक कृतीमधून, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला अभिव्यक्त होत राहील, यासाठी व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच वेळी व्यक्तीला ही जाणीव देखील असली पाहिजे की, तिचे सत्याविषयीचे आकलन हे प्रगमनशील (progressive) आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या घडीला जे सर्वाधिक सत्य वाटते ते उद्या तसेच असेल असे नाही आणि त्याहूनही अधिक उच्च सत्य तुमच्या माध्यमातून अधिकाधिक अभिव्यक्त होईल. येथे आरामदायी तामसिकतेमध्ये झोपून राहणे याला थाराच नाही; व्यक्तीने सदैव जागे असले पाहिजे – मी शारीरिक झोपेविषयी बोलत नाहीये – व्यक्तीने कायम जागे असले पाहिजे, म्हणजे नेहमी सचेत (conscious) असले पाहिजे आणि नेहमी सद्भाव व प्रकाशमान ग्रहणशीलतेने परिपूर्ण असले पाहिजे. नेहमी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे, नेहमी उत्तम, नेहमीच उत्तम. तुम्ही स्वतःशी असे कधीच म्हणता कामा नये की, “बापरे, हे फारच थकवणारे आहे. मला आता विश्रांती घेऊ दे, मला आराम करू दे. बास, आता मी हे प्रयत्न थांबवणार आहे.” असे केलेत तर मग तुम्ही लगेचच एका गर्तेत सापडणार आहात आणि घोडचूक करणार आहात, हे निश्चित!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 282-283)

विचार शलाका – ४१

प्रश्न : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची?

काल आपण या साधनेची पहिली बाजू विचारात घेतली होती. आता त्याची दुसरी बाजू विचारात घेऊ

श्रीअरविंद : साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे. येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती केली पाहिजे म्हणजे व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन होता कामा नये आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ‘ईश्वरा’र्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती ही ‘उच्चतर शक्ती’ने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने संकेत मिळत राहतात आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेलासुद्धा एक नवा आकार प्राप्त होतो.

दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहायचे; आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य ‘प्रकृती’च्या नित्य रचना आहेत असे समजायचे. व्यक्ती यामध्ये जेवढ्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जेवढ्या प्रमाणात ती निर्लिप्त होते आणि मन व मनोव्यापार म्हणजेच आपण आहोत, असे मानत नाही; प्राण व त्याची स्पंदने म्हणजेच आपण आहोत, असे मानत नाही; शरीर व त्याचे चलनवलन म्हणजेच आपण आहोत, असे मानत नाही; तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगामध्ये असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते.

आणि अशा या शांत आंतरिक ‘अस्तित्वा’मधूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम ‘इच्छा’ उदयास येते किंवा ‘प्रकृती’च्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून ‘दिव्य शक्ती’चा धावा करणे सुरु होते. त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 07-08)

विचार शलाका – ४०

प्रश्न : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना असते तिची दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते. हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला आत्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’च्या दिशेने वळवू लागतो, ‘ईश्वरा’च्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, आपल्या ऊर्ध्वस्थित राहून, आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आवाहन करतो. ‘ईश्वरा’प्रत स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर (अनाहत केंद्रावर) एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये (आज्ञाचक्र) करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते; हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केलेच पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या, ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘दिव्य आनंदा’च्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, तेच होऊन जाते. अचंचलतेसाठी अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि ‘आत्म्या’चा व ऊर्ध्वस्थित अशा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये जाणिवेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये चढून तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते. काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-07)

विचार शलाका – ३९

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल की, ‘देव’च तुमचा गुरु आहे. योगाची स्वाभाविक प्रक्रिया घडून यावी म्हणून, अनंत प्रज्ञेने तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान आंतरिक आणि बाह्य परिस्थिती कशी सूक्ष्मपणाने नियोजित केली आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आंतरिक व बाह्य प्रवृत्तींना परस्परांवर कार्य करता यावे म्हणून, त्या कशा रीतीने रचल्या आहेत, कशा रीतीने एकत्रित आणल्या आहेत, जेणेकरून त्या प्रवृत्ती, पूर्णत्वामध्ये अपूर्णतांवर काम करू शकतील, हे तुम्हाला उमगेल. तुमच्या उन्नतीसाठी सर्वशक्तिमान प्रेम आणि प्रज्ञा कार्यरत आहेत. त्यामुळे जरी खूप वेळ लागताना दिसत असला तरी त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही, परंतु जेव्हा अपूर्णता आणि अडथळे उद्भवताना दिसतील तेव्हा अप्रमत्त (सावध) राहा, धीर धरा आणि उत्साह टिकवून ठेवा आणि इतर सारे काही ‘देवा’वर सोपवून द्या.

काळ आवश्यक आहे. तुमच्यामध्ये प्रचंड कार्य चालू आहे, तुमच्या समग्र मानवी प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविण्याचे, उत्क्रांतीच्या अनेक शतकांचे कार्य काही थोड्या वर्षांमध्ये घडविण्याचे कार्य तुमच्यामध्ये सुरु आहे, त्यामुळे काळ आवश्यकच आहे. तुम्ही काळाविषयी कुरकूर करता कामा नये. इतरही काही मार्ग असतात की, ज्यामधून तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येतात; तुम्ही स्वतःच करू शकाल, अशा काही निश्चित क्रिया ते मार्ग तुम्हाला देतात; तुम्ही काही (साधना) करत आहात, आज इतके अधिक प्राणायाम केले, आज इतक्या जास्त वेळ आसन स्थिर केले, आज इतक्या अधिक वेळा जप केला, इतके इतके केले, त्यातून तुम्ही निश्चित अशी किती प्रगती केली ते कळून येते आणि या भावनांच्या माध्यमातून तुमच्या अहंकाराला समाधान लाभते. त्या साऱ्या मानवी पद्धती झाल्या, परंतु अनंत ‘शक्ती’ अशा पद्धतीने कार्य करत नाही. ती सावकाशपणे वाटचाल करते, कधीकधी तर ती तिच्या ध्येयाप्रत अव्यक्त गतीने वाटचाल करते, कुठे ती प्रगती करताना दिसते, तर कधी मध्येच थांबलेली दिसते, आणि पुढे मग केव्हातरी अगदी जोरकसपणाने आणि विजयी रीतीने, तिने जे भव्य कार्य उभारले आहे ते आपल्यासमोर उघड करते.

उपरोक्त कृत्रिम मार्ग हे मानवी बुद्धीने काढलेल्या कालव्यांप्रमाणे असतात; त्यामधून तुम्ही सुलभपणे, सुरक्षितपणे आणि खात्रीपूर्वक प्रवास करू शकता पण तो प्रवास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत अशा प्रकारचा असतो. पण एकदा का तुम्ही पूर्णयोगाचा मार्ग निवडलात की, मग तुम्ही त्या मार्गालाच धरून राहिले पाहिजे. हा मार्ग मात्र विस्तृत आणि पथविरहित समुद्रासारखा आहे की, ज्यामध्ये अनंताच्या स्वातंत्र्यामध्ये तुमचा प्रवेश झालेला असतो आणि तुम्ही या जगातील विविध प्रांतांमध्ये मुक्तपणे विहार करू शकता. तुम्हाला जर का कशाची आवश्यकता असेल, तर ती एका जहाजाची, त्याला दिशा देणाऱ्या चक्राची, दिशादर्शक यंत्राची, प्रेरक शक्तीची आणि कुशल कप्तानाची!

‘ब्रह्मविद्या’ हे आहे तुमचे जहाज, श्रद्धा म्हणजे दिशा देणारे चक्र, आत्म-समर्पण हे आहे तुमचे दिशादर्शक यंत्र, ईश्वराच्या आज्ञेनुसार जगताची निर्मिती करणारी, त्यांना दिशा देणारी आणि त्यांचा विनाश घडवून आणणारी शक्ती ही आहे तुमची प्रेरकशक्ती आणि स्वतः ‘देव’च तुमचा कप्तान आहे. परंतु त्याचा कार्य करण्याचा स्वतःचा असा एक मार्ग आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा स्वतःचा असा एक काळ आहे. त्याच्या मार्गाकडे लक्ष ठेवून राहा आणि त्याच्या योग्य काळाची वाट पाहा.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 87-88)

विचार शलाका – ३६

योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे आत्मसमर्पणाचा संकल्प करणे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी स्वतःला ‘देवा’च्या हाती सोपवा. कोणतीही अट लादू नका, कोणतीही मागणी मागू नका, अगदी योगसिद्धीचीही मागणी करू नका. कारण अन्य कोणत्याही माध्यमातून नव्हे तर, तुमच्यामध्ये जे आहे त्याद्वारे आणि तुमच्या माध्यमातूनच ‘देवा’ची इच्छा थेटपणे कार्यरत होते. जे कोणी त्याच्याकडे मागणी करतात, त्यांना ‘देव’ त्यांनी जे मागितले आहे ते देतो. परंतु कोणतीही मागणी न करता, जे कोणी स्वतःलाच देऊ करतात, त्यांना ‘देव’ सर्व काही प्रदान करतो, त्यांनी जे मागितले असते किंवा त्यांना जे आवश्यक असते तेही तो देतो आणि त्याशिवाय, ‘देव’ स्वतःलाही त्यांना देऊ करतो आणि त्याच्या प्रेमाचे सहजस्फूर्त असे वरदानही प्रदान करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

विचार शलाका – ३५

प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत.

एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठताबसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत ध्यान साधता आले पाहिजे. मनाचे सैरावैरा भरकटणे, विसराळूपणा, निद्रा, शारीरिक आणि नसांची अधीरता, अशांती या साऱ्या ध्यानाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे चढतेवाढते पावित्र्य आणि जेथून विचार आणि भावनांचा उदय होतो, त्या चित्ताची स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक पूर्णत्व आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २२

….खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक प्रकृती आणि तिच्या अडीअडचणी यांना विजयपूर्वक हाताळू शकतील आणि त्यांचा निरास करू शकतील.

समर्पण हे संपूर्ण आणि प्रामाणिक असले पाहिजे; एकमेव दिव्य ‘शक्ती’प्रतच आत्म-उन्मुखता असली पाहिजे; अवतरित होणाऱ्या ‘सत्या’ची सातत्यपूर्ण आणि संपूर्ण निवड केली पाहिजे, मानसिक, प्राणिक आणि शारीरिक ‘शक्ती’ आणि त्यांची ‘रूपे’, जी अजूनही या ‘पृथ्वी-प्रकृती’वर शासन करत आहेत त्यांच्या मिथ्यत्वाला सातत्याने आणि पूर्णतया नकार दिला पाहिजे…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)