कृतज्ञता – २१
तुमच्यामध्ये भक्तिभाव असतो आणि तरीही तुम्ही तुमचा अहंकारही सांभाळत राहता. आणि नंतर मग हा अहंकारच तुम्हाला भक्तीच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करायला भाग पाडतो, अगदी अत्यंत अहंकारी गोष्टी करायलासुद्धा भाग पाडतो. म्हणजे असे की, तुम्ही फक्त तुमचाच विचार करत राहता, इतरांचा नाही, जगाचा नाही, कार्याचाही नाही किंवा जे करायला हवे त्याचाही नाही तर, तुम्ही फक्त स्वत:च्याच भक्तीचा विचार करत राहता आणि त्यामुळेच तुम्ही प्रचंड अहंकारी बनता. आणि म्हणून, जेव्हा तुम्हाला असे आढळते की, ईश्वर कोणत्याही कारणाने म्हणा पण, तुम्हाला अपेक्षित आहे तेवढ्या उत्साहाने तुमच्या भक्तीला प्रतिसाद देत नाही तेव्हा, तुम्ही निराश होता आणि निराशेतच अडकून राहाता.
म्हणजे, एकतर ईश्वर निष्ठुर आहे असे तुम्हाला वाटू लागते. आपण अशा गोष्टी वाचल्या आहेत. उत्साही भक्तांच्या तर अशा कितीतरी गोष्टी असतात. असे उत्साही भक्त मग ‘ईश्वरा’वर टिका करू लागतात. कारण (त्यांच्यादृष्टीने) ‘ईश्वर’ आता त्यांच्याबाबतीत पूर्वीप्रमाणे जवळचा, प्रेमळ उरलेला नसतो, तो दूर निघून गेलेला असतो. मग असा भक्त (मनाशीच) म्हणू लागतो, “तू मला उद्ध्वस्त करून का गेलास? तू मला असे टाकून का गेलास? तू खूप निष्ठुर आहेस.” त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष असे म्हणण्याचे धाडस नसते पण ते असा विचार करत असतात; अन्यथा मग ते म्हणतात, ‘मी नक्कीच काहीतरी घोर पातक केले असले पाहिजे आणि म्हणूनच ईश्वराने मला दूर लोटले आहे.” आणि ते निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडतात.
म्हणून श्रद्धेबरोबर एक स्पंदनही असायला हवे…. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे. ही कृतज्ञतेची अद्भुत भावना, तुम्हाला उत्कट आनंदाने भारून टाकते. तुम्हाला जाणवू लागते की, आपल्याला दिसतो तसा, या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ‘ईश्वर’ म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, होय, येथे ‘ईश्वर’ आहे, ईश्वरी अस्तित्व आहे!
जेव्हा कधी, एखादी अगदी छोटीशी गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या ईश्वरीय अस्तित्वाच्या उदात्त ‘वास्तवा’शी तुमचा संपर्क घडविते तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.
दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते की, जे अवचितपणे तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ‘ईश्वरा’ची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे की, जे ‘ईश्वरी’ आहे यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.
म्हणून कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञतादेखील असायलाच हवी.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 39-40)