Tag Archive for: साधना

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)

रिक्त मन (vacant mind) आणि स्थिर मन (calm mind) यामध्ये फरक आहे. तो असा की, मन जेव्हा रिक्त असते तेव्हा त्यामध्ये कोणताही विचार नसतो, धारणा नसते, कोणत्याच प्रकारची कोणतीही मानसिक कृती तेथे नसते, कोणत्याही रचलेल्या कल्पना नसतात, तर गोष्टींचा एक मूलभूत बोध तेथे असतो. मात्र स्थिर मनामध्ये, मानसिक अस्तित्वाचे द्रव्य (substance) स्थिर झालेले असते; ते इतके स्थिर झालेले असते की त्यास कोणीही विचलित करू शकत नाही.

काही विचार आलेच किंवा काही कृती उदयाला आल्याच तर, त्या आता मनामधून उगम पावलेल्या नसतात; त्या बाहेरून आलेल्या असतात आणि निर्वात हवेमध्ये आकाशामधून पक्ष्यांचा थवा इकडून तिकडे भरारी घेऊन जावा त्याप्रमाणे ते विचार किंवा कृती मनामध्ये प्रवेश करतात आणि तशाच बाहेर निघून जातात. या गोष्टी (स्थिर) मनात फक्त येऊन जातात, त्या कशालाही धक्का लावत नाहीत किंवा त्या स्वतःची कोणती खूणही मागे सोडून जात नाहीत. अशा मनामध्ये अगदी हजारो प्रतिमा तरळून गेल्या किंवा प्रचंड उलथापालथ झाल्याच्या घटना जरी मनासमोरून तरळून गेल्या तरी ही स्थिर-अचलता तशीच टिकून राहते, जणू काही त्या मनाचा पोतच शाश्वत आणि अविनाशी शांतीच्या द्रव्याचा बनलेला असतो.

अशा प्रकारची स्थिरता प्राप्त झालेल्या मनाकडून कर्म करायला सुरुवात केली जाऊ शकते, अगदी अविरतपणे आणि जोरकसपणेही त्या कर्माचा प्रारंभ केला जाऊ शकतो, परंतु त्या परिस्थितीमध्येदेखील असे मन स्वतःची मूलभूत स्थिरता टिकवून ठेवते. (आता) त्या कर्माचा उगम हा त्या मनामधून होत नसतो तर असे मन फक्त, जे ऊर्ध्वस्थित आहे ते त्याच्याकडून ग्रहण करत असते आणि त्यामध्ये स्वतःचे असे काही न मिसळता, स्थिरचित्ताने, निरपेक्षपणे, पण तरीही सत्याच्या आनंदानिशी, त्यांना मानसिक रूप देत असते. मनाच्या माध्यमातून पुढे जात असताना त्या मार्गाचा प्रकाश आणि आनंदी शक्तीदेखील त्याच्या सोबत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

अचंचल, अविचल मन (quiet mind) ही पहिली पायरी होय, त्यानंतरची खूप पुढची पायरी म्हणजे निश्चल-निरवता (silence). परंतु त्यासाठी (व्यक्तीमध्ये) आधी अविचलता असलीच पाहिजे. ‘अविचल मन’ असे म्हणत असताना, मला अशी एक मानसिक चेतना अभिप्रेत आहे की, ज्या चेतनेमध्ये विचार आत प्रविष्ट होताना दिसतील आणि तेथे ते इतस्ततः वावरताना दिसतील; परंतु आपण स्वतः विचार करत आहोत असे व्यक्तीला वाटणार नाही किंवा ते विचार आपले स्वतःचे आहेत किंवा ते विचार म्हणजेच आपण आहोत असेही त्या व्यक्तीला वाटणार नाही.

एखाद्या शांत प्रदेशामध्ये वाटसरू यावेत, काही काळ तेथे राहून नंतर तेथून निघून जावेत त्याप्रमाणे, मनामध्ये विचारतरंग येतील आणि निघून जातील. अविचल मन त्यांचे निरीक्षण करेल किंवा करणारही नाही, परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये ते सक्रिय होणार नाही किंवा ते स्वतःची अविचलता देखील गमावणार नाही.

निश्चल-निरवतेमध्ये अविचलतेपेक्षा अधिक असे काही असते; आंतरिक मनामधून विचारांना पूर्णपणे हद्दपार करत, त्याला नि:शब्द करून किंवा विचारांना सीमेच्या बाहेरच ठेवून, ही अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते. परंतु वरून होणाऱ्या अवतरणाद्वारे (descent) ही अवस्था अधिक सुलभतेने प्रस्थापित करता येते. ही निश्चल-निरवता वरून खाली अवतरत आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेमध्ये प्रवेश करून, ती तिला व्यापून टाकत आहे किंवा तिला ती कवळून घेत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते, आणि मग ती चेतना स्वतःला विशाल अशा अवैयक्तिक (impersonal) निश्चल-निरवतेमध्ये विलीन करू पाहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 141-142)

अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरा‌पासून, स्वतःपासून किंवा सद्गुरू‌पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वर‌प्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात आपल्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. किंवा कधीकधी तिच्या स्वभावाची एक (उजळ) बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच (अंधारी) बाजू व्यक्त होते किंवा व्यक्ती काही जणांशी जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांशी वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीमध्ये स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची एक आत्मपरीक्षणात्मक दृष्टी असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. आणि बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ईश्वरी कृपेमुळेच साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ईश्वरी कृपेमध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम होतोच होतो; तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे, फक्त आणि फक्त दिव्य सत्याचीच आस बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एकमेव अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती ईश्वरालाच समर्पण करणे आणि हे कार्य ईश्वराने नेमून दिलेले आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्तीमध्ये एकदम, एकाएकी असा बदल घडून येऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून त्या शक्तीचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ, प्रामाणिक इच्छेने नेहमी धावा करत राहील तर, व्यक्ती या चेतनेमध्ये अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)