Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ५२

आंतरिक आधार शोधण्यासाठी तुम्ही, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत विशाल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; तुम्ही आत, अधिक आत, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अविचल, प्रसन्न शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे.

अस्तित्वाच्या या अतीव अविचलतेमध्ये, साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःख यातनांपासून दूर, विचार व कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांच्या ऊर्मीपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ‘ईश्वराची उपस्थिती’ अनुभवण्यासाठी तुम्ही अगदी काळजीपूर्वक अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते. जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ‘ईश्वरी शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अंतर्मुख करणे आवश्यक असते.

जिथे कोणतीही कृती शिल्लक नसते, कोणताही प्रभाव शिल्लक नसतो, अहंकार नसतो, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नसते, अन्य काहीही नसते तर फक्त आनंदलहरी असतात, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत तुम्ही खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ऐक्य अनुभवले पाहिजे…

– श्रीमाताजी (The Supreme : Dialogue with The Mother by Mona Sarkar)

साधना, योग आणि रूपांतरण – ५१

एकाग्रता आवश्यक असते. ध्यानाद्वारे तुम्ही तुमचा अंतरात्मा जागृत करत असता; तर तुमच्या जीवनामध्ये, कर्मामध्ये आणि तुमच्या बाह्यवर्ती चेतनेमध्ये एकाग्रता साधल्याने, तुम्ही तुमचे बाह्यवर्ती अस्तित्वसुद्धा (मन, प्राण आणि शरीर) ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शांती’ ग्रहण करण्यास सुपात्र बनवत असता.

*

जाग्रत चेतनेमध्येच सर्व गोष्टींचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. परंतु आंतरिक अस्तित्वाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय तसे करता येणे शक्य नसते आणि तुमच्या आंतरिक अस्तित्वाची ही तयारीच ‘ध्याना’द्वारे करून घेतली जाते.

*

तुम्ही सदासर्वदा ध्यानावस्थेत राहण्याची गरज नाही, परंतु ध्यानावस्थेमध्ये जी चेतना तुम्हाला गवसते ती चेतना तुम्ही तुमच्या जागृतावस्थेमध्ये देखील आणली पाहिजे आणि त्या चेतनेमध्ये तुम्ही सदासर्वकाळ राहिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 298)

साधना, योग आणि रूपांतरण – ५०

साधक : मी सध्या ध्यानासाठी जेवढा वेळ देतो त्यापेक्षा अधिक वेळ देणे माझ्यासाठी योग्य ठरेल का, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी मिळून मी सुमारे दोन तास ध्यानामध्ये व्यतीत करतो. मात्र अजूनही मी ध्यान करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. माझे शारीर-मन त्यामध्ये खूप व्यत्यय आणते.. ते शांत व्हावे आणि माझा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी यावा, अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. माझे मन एखाद्या वेड्या यंत्रासारखे कार्यरत असते आणि हृदय मात्र एखाद्या दगडासारखे पडलेले असते आणि हे पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायी असते. माताजी, माझ्या हृदयात मला सदोदित तुमची उपस्थिती अनुभवास यावी, अशी कृपा करावी.

श्रीमाताजी : ध्यानाबद्दल अंतरंगातून जर उत्स्फूर्तपणे तळमळ वाटत नसेल आणि तरीही ध्यान करायचे हा मनाचा स्वैर (arbitrary) निर्णय असेल तर (फक्त) ध्यानाच्या कालवाधीमध्ये वाढ करणे हे काही फारसे उपयुक्त नसते. माझे साहाय्य, प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.

*

ध्यानासाठी ठरावीक तास निश्चित करण्यापेक्षा, सातत्याने एकाग्रतेचा आणि अंतर्मुख दृष्टिकोन बाळगणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52-53)

साधना, योग आणि रूपांतरण – ४९

तुम्ही मनाने अगदी खंबीर नसाल तर, तुम्ही सदासर्वकाळ किंवा दिवसातील बराचसा काळ ध्यानामध्ये व्यतीत करता कामा नये. कारण मग तुम्हाला पूर्णतः आंतरिक जगतामध्ये राहायची सवय लागू शकते आणि त्यामुळे तुमचा बाह्य वास्तवांशी असणारा संपर्क तुटू शकतो. यामुळे एककल्ली आणि विसंवादी वाटचाल होते आणि त्यामुळे संतुलन ढळण्याची शक्यता असते. ध्यान आणि कर्म दोन्ही करावे आणि या दोन्ही गोष्टी श्रीमाताजींना अर्पण कराव्यात हे सर्वात उत्तम.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 251)

साधना, योग आणि रूपांतरण – ४८

साधक : मी तुमच्या पुस्तकात असे वाचले आहे की, “एकाग्रता हीच व्यक्तीला तिच्या ध्येयाप्रत घेऊन जाते.” असे असेल तर मग आम्ही ध्यानाचा कालावधी वाढविला पाहिजे का?

श्रीमाताजी : येथे एकाग्रतेचा अर्थ ‘ध्यान’ असा नाही. उलट, बाह्यतः तुम्ही कोणतेही कार्य करत असलात तरी तुम्ही कायम एकाग्रतेच्या स्थितीमध्ये असले पाहिजे. आपल्या सर्व ऊर्जा, आपले सर्व संकल्प, आपली सर्व अभीप्सा ही आपल्या चेतनेमध्ये केवळ ‘ईश्वरा’वर आणि ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराकडे वळलेली असणे याला मी ‘एकाग्रता’ म्हणते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 177-178)

साधना, योग आणि रूपांतरण – ४७

ध्यानासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करता येणे शक्य असेल आणि ती नेहमी पाळणे शक्य असेल तर ते नक्कीच इष्ट ठरेल.
*
तुमची चेतना जागृत ठेवायची असेल तर तुम्ही ध्यानासाठी एक ठरावीक वेळ राखून ठेवली पाहिजे आणि श्रीमाताजींचे स्मरण करून, आमच्या संपर्कात राहिले पाहिजे. ध्यानामध्ये काही विघ्न आले तर, तुम्हाला जे प्राप्त झालेले असते ते नष्ट होत नाही, पण ते माघारी फिरण्याची शक्यता असते आणि ते पुन्हा आविर्भूत व्हायला वेळ लागतो आणि म्हणून (आपल्यातील) तो धागा तुटता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 312)

साधना, योग आणि रूपांतरण – ४६

निश्चल स्तब्ध बसणे ही एकाग्रतापूर्ण ध्यानासाठी अगदी स्वाभाविक अशी आसनस्थिती असते तर चालणे आणि उभे राहणे या, ऊर्जा वितरणासाठी आणि मनाच्या क्रियाकलापांसाठी अनुकूल अशा सक्रिय स्थिती असतात. व्यक्तीने जर स्थायी शांती आणि चेतनेची नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेतली असेल तर तेव्हाच व्यक्तीला चालत असताना किंवा अन्य काही करत असताना लक्ष एकाग्र करणे आणि (ईश्वरी शक्ती) ग्रहण करणे सुलभ जाते. चेतनेची जर स्वतःमध्येच मूलभूत नैष्कर्म्य अवस्था एकवटलेली असेल तर ती एकाग्रतेसाठी योग्य बैठक असते आणि शरीर निश्चल ठेवून लक्ष एकवटून बसणे ही ध्यानासाठी योग्य स्थिती असते. पहुडलेले असताना देखील एकाग्रता साधता येते पण ही स्थिती फारच निष्क्रिय असल्यामुळे चित्त एकाग्र होण्याऐवजी जडत्व, सुस्ती येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच योगी नेहमी आसनस्थ स्थितीमध्ये बसतात. चालत असता, उभे असता, किंवा पहुडलेले असताना व्यक्ती ध्यान करण्याचा नित्य सराव करू शकते, परंतु आसनस्थ असणे ही मूळ स्वाभाविक स्थिती आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 311)

साधना, योग आणि रूपांतरण – ४५

सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता आणि विचारांपासून मुक्तता अनुभवास येईल.

कालांतराने शांतीपूर्ण अवस्था ही आंतरिक अस्तित्वामध्ये काहीशी स्थिर झालेली असते (कारण तुम्ही एकाग्रता करता तेव्हा आंतरिक अस्तित्वामध्येच प्रवेश करत असता,) तेव्हा मग ती शांतीपूर्ण अवस्था तिथून बाह्य व्यक्तित्वामध्ये येऊ लागते आणि बाह्य व्यक्तित्वाचे नियंत्रण करू लागते. आणि त्यामुळे तुम्ही काम करत असताना, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागत असताना, बोलत असताना किंवा इतर व्यवहार करत असतानासुद्धा ती शांती आणि स्थिरता कायम राहते. कारण तेव्हा बाह्यवर्ती चेतना काहीही करत असली तरी आंतरिक अस्तित्व अंतरंगामध्ये स्थिरशांत असल्याचे व्यक्तीला जाणवते. खरोखर आपले आंतरिक अस्तित्व हेच आपले खरे अस्तित्व आहे आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे काहीसे पृष्ठवर्ती, वरवरचे अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरिक अस्तित्वच या जीवनामध्ये कार्य करत आहे असे व्यक्तीला जाणवते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

साधना, योग आणि रूपांतरण – ४४

तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद दिलीत तर तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52)

साधना, योग आणि रूपांतरण – ४३

साधक : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी कोणतीही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा (solitude and seclusion ) असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात.

परंतु बाह्य परिस्थितीमुळे तुम्ही बांधले गेले आहात असे होता कामा नये. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे. मनाचे भरकटणे, विस्मरण, निद्रा, शारीरिक आणि नाडीगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची असते.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार आणि चित्त-वृत्तींचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून ‘चित्त’ मुक्त असले पाहिजे. नैतिक आणि मानसिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 295)