(उत्तरार्ध)
आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित होऊ दिले पाहिजे आणि मग तुम्हाला असे आढळेल की तिथे सुसंवादी, प्रकाशमान, सूर्यप्रकाशित हास्याचा जणू झरा वाहत आहे आणि त्याच्यापुढे कोणत्याही सावटाला किंवा दुःखवेदनेला थाराच उरत नाही. वास्तविक, अगदी कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठी दुःखं असू देत किंवा कितीही भयंकर शारीरिक वेदना असू देत, तुम्ही जर त्यांच्याकडे तेथून, त्या दृष्टिकोनातून पाहू शकलात, तर तुम्हाला त्या अडचणीची, त्या दुःखाची, त्या वेदनेची असत्यता दिसून येईल आणि तिथे अन्य काही नाही, तर केवळ एक हर्षभरित आणि प्रकाशमय स्पंदन असल्याचे आढळून येईल.
खरेतर, अडचणींचे निराकरण करण्याचा, दुःखाचा परिहार करण्याचा आणि वेदना नाहीशी करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. यातील पहिल्या दोन गोष्टी (अडचणींचे निराकरण, दुःखाचा परिहार) या तुलनेने सोप्या आहेत. पण शारीरिक वेदना नाहीशी करणे ही गोष्ट काहीशी अधिक कठीण आहे. कारण देह आणि त्याच्या जाणिवा या अत्यंत खऱ्या व मूर्त असतात असे मानण्याची आपल्याला सवय लागलेली असते. परंतु आपला देह हा एक द्रव आहे; तो घडणसुलभ (plastic) आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो वर्धनशील आहे असे समजण्याची आपल्याला सवय नसते. कारण ते आपण शिकलेलो नसतो इतकेच. सर्व अंधकार, सर्व अडीअडचणी, सर्व ताणतणाव, सर्व विसंवाद नाहीसे करणारे हे जे प्रकाशमान हास्य असते, आडकाठी निर्माण करणाऱ्या, शोक आणि विलाप करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निरास करणारे, हे जे प्रकाशमान हास्य असते ते हास्य शरीरामध्ये उतरविण्यास आपण शिकलेलो नसतो.
आणि हा सूर्य, दिव्य हास्याचा हा सूर्य, प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतो. तो त्या सर्व गोष्टींमागील सत्य असतो. हा आंतरिक सूर्य कसा पाहायचा, तो कसा अनुभवायचा आणि तो कसा जगायचा हे आपण शिकलेच पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 10 : 156)






