Tag Archive for: समर्पण

समर्पण – ०१

आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे ही एक दृढ अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये असू शकते आणि ईश्वराखेरीज माझे काहीच चालणार नाही, अशी एक प्रकाशमय धारणा तुमच्यामध्ये असू शकते. किंवा मग आनंदी होण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे, हीच एक दिशा आहे अशी उत्स्फूर्त भावना असू शकते; किंवा मग आपण केवळ ईश्वराचेच असावे अशी दृढ आंतरात्मिक इच्छा असू शकते. ”मी माझा नाही,” असे तुम्ही म्हणता आणि आपल्या अस्तित्वाची जबाबदारी तुम्ही ‘सत्या’वर सोपविता.

मग येते आत्मार्पण (Self-offering) : तुम्ही म्हणता की, “मी एक चांगल्या आणि वाईट साऱ्या गुणांनी बनलेला, अंधाऱ्या आणि प्रकाशपूर्ण गुणांनी बनलेला असा प्राणी आहे; मी जसा आहे तसा मी स्वतःला समर्पित करत आहे; माझ्या चढउतारांसहित, माझ्या परस्परविरोधी प्रेरणा आणि प्रवृत्तींनिशी माझा स्वीकार कर आणि तुला जे करावेसे वाटते ते माझ्याबाबतीत कर.” आणि मग जो पहिल्या प्रथम निर्णय घेतला होता त्या केंद्रवर्ती आंतरात्मिक इच्छेभोवती तुमच्या साऱ्या अस्तित्वाचे एकीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीमधील अडथळा निर्माण करणारे सारे घटक एकेक करून हाती घ्यायला हवेत आणि त्यांचे केंद्रवर्ती अस्तित्वाभोवती एकीकरण करावयास हवे. तुम्ही एका उत्स्फूर्त प्रेरणेने स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करू शकता; पण अशा प्रकारे एकीकरण घडून आल्याखेरीज तुम्ही प्रभावीरित्या समर्पण करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 126)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. Read more

मानसिक परिपूर्णत्व – १२

 

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ”मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,” असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे; मी त्याच्यावर विश्वास ठेवेन; त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे; त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाहीत; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

मानसिक परिपूर्णत्व – ११

 

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया आधीपासून चांगल्या रीतीने सुरु झालेली असतानाही, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ईश्वरी अस्तित्व आणि ईश्वरी शक्ती सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते आणि त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते. काही जण असेही असतात की, जे हा अनुभव येण्याच्या आधीच श्रद्धेच्या आधारे ही भूमिका घेतात. आणि जर व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा खूप बळकट असेल तर, या गोष्टी त्या अनुभवाप्रत व्यक्तीला घेऊन जातात. परंतु सर्वच जण अगदी सुरुवातीपासून अशी भूमिका घेऊ शकत नाहीत आणि कधीकधी तर हे धोकादायकसुद्धा ठरू शकते; कारण ईश्वर आहे असे समजून, त्यांनी स्वतःला एखाद्या चुकीच्या शक्तीच्या हाती, सोपवून देण्याची शक्यता असते. पण बहुतेकांच्या बाबतीत तरी, त्यांनी तपस्येच्या माध्यमातूनच समर्पणामध्ये वृद्धिंगत होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

मानसिक परिपूर्णत्व – १०

 

देवावर श्रद्धा, विश्वास, ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या समवेत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे. ईश्वराप्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांना, कनिष्ठ हालचालींना शरण जाण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराला शरण जाण्याचे किंवा ईश्वराचे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींना शरण जाण्याचे एक कारण, एक बुरखा, एक निमित्त बनता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 87)

मानसिक परिपूर्णत्व – ०८

 

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.

*

स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह न धरता, सर्वत्र त्यांची जागा ईश्वरी सत्याला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेता यावी म्हणून सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण !

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०७

 

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
जे हातचे काहीही राखून न ठेवता, स्वतःच्या सर्व अंगांनिशी ईश्वराप्रत स्वतःला देऊ करतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देऊन बसतो. आणि मग त्यांना स्थिरता, प्रकाश, शक्तिसामर्थ्य, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता, आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)