“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,
जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.
आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.
पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.
उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.
असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.
आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.
तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.
– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)