Posts

सद्भावना – १०

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे घडते ते तुम्हालाच शिकवण देण्यासाठी असते की, व्यक्तीने कोणतातरी अंतःस्थ हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितके काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर होईल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते.

चांगुलपणाच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजेत, न्यायाच्या प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असायला हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)

सद्भावना – ०९

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष असेल, जो तुम्ही दूर करू इच्छित असाल आणि जर का तो तरीही टिकून राहिला आणि जर तुम्ही म्हणाल की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता; कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या अगदी तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात – तुमच्या चेतनेचा भाग नसलेले असे काहीच तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि जे जे काही तुमच्या चेतनेशी संबंधित असते त्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. ज्या गोष्टी किंवा सूचना बाहेरून येतात, त्यासुद्धा तुमच्या चेतनेने ज्याला संमती दिलेली असते अगदी तेवढ्या प्रमाणातच असतात आणि तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची निर्मिती झालेली असते. तुम्ही जर असे म्हणाल की, ”मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, आणि म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. सगळे करून सुद्धा, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट (जॅक इन द बॉक्स) या खेळण्यातल्याप्रमाणे अचानक उसळून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते. म्हणून, करण्यासारखी एकमात्र गोष्ट म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे कोपरे वेचून वेचून काढायचे आणि जर का त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल आणि एके काळी जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटली होती ती नुसती शक्यच होईल असे नाही, ती केवळ व्यवहारातच उतरेल असे नाही, तर ती पूर्ण झालेली असेल. तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रीतीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला अगदी खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि हे सर्व बाबतीत सारखेच असते, शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सारखीच लागू पडते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 74-75)

सद्भावना – ०८

दयाळूपणा आणि सद्भावना यांमध्ये खरी महानता, खरी श्रेष्ठता सामावलेली असते.

*

एकटा मनुष्य त्याच्या आध्यात्मिक शक्तीच्या साहाय्याने जे साध्य करू शकतो तीच गोष्ट, एखादा समूह सद्भावनेच्या विचाराने संघटित झाला तर साध्य होऊ शकते. एक खाल्डियन (Chaldean) म्हण आहे की, “तुम्ही बारा जणं जेव्हा सदाचरणासाठी एकत्रित याल तेव्हा ‘अनिर्वचनीय’ (सद्वस्तु) प्रकट होईल.”

*

सर्वांबद्दलच्या सद्भावना आणि सर्वांकडून मिळणाऱ्या सद्भावना हा शांती आणि सुसंवादाचा पाया असतो.

*

मानवतेची एकता ही एक आधारभूत आणि विद्यमान वस्तुस्थिती आहे. परंतु मनुष्यजातीचे बाह्य एकत्व हे मात्र मनुष्याच्या सद्भावनांवर आणि त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

*

जिथे कुठे प्रामाणिकपणा आणि सद्भावना असते, तिथे ईश्वराचे साहाय्यसुद्धा असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 21), (CWM 02 : 114), (CWM 13 : 243), (CWM 15 : 66), (CWM 14 : 86)

सद्भावना – ०७

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून…)

इतरांविषयी आप-पर भाव, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्यामध्ये आध्यात्मिक स्थिरता आणि समता, सर्वांविषयीची एक सद्भावना किंवा एका विशिष्ट अवस्थेमध्ये ‘ईश्वरा’खेरीज इतर सर्वांविषयी एक निश्चल अलिप्तता असते; चैत्य (psychic) अस्तित्वामध्ये सर्वांविषयी मूलभूतपणे समान दयाळूपणा किंवा प्रेम असते परंतु एखाद्याबाबत विशेष नातेही असू शकते – परंतु प्राण (vital) मात्र नेहमीच असमान असतो, पसंती-नापसंतीने भरलेला असतो.

साधनेद्वारे प्राणाला स्थिर-शांत केलेच पाहिजे; ऊर्ध्वस्थित आत्म्याकडून सर्व वस्तुमात्रांबाबतची त्याची शांत सद्भावना आणि समता आणि चैत्य अस्तित्वाकडून त्याचा सार्वत्रिक दयाळूपणा किंवा प्रेम यांचा स्वीकार प्राणाने करायला हवा. या गोष्टी होतील पण हे घडून येण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. राग, अधीरता किंवा नापसंतीच्या आंतरिक तसेच बाह्य प्रवृत्तींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.

गोष्टी जर विपरित झाल्या किंवा चुकीच्या पद्धतीने घडून आल्या तर तुम्ही सहजतेने असे म्हटले पाहिजे की, ”श्रीमाताजींना सारे काही माहीत आहे,” आणि कोणत्याही संघर्षाविना शांतपणाने तुम्ही गोष्टी करत राहिल्या पाहिजेत किंवा करवून घेतल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

सद्भावना – ०५

मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (Vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांचे आध्यात्मिक जीवनात काहीच मोल नसते – किंबहुना ते नातेसंबंध प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; (असा अडथळा उत्पन्न होऊ नये म्हणून) मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच नव्हे तर, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर उभ्या करणे हा असतो; आणि या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णतया एकात्म पावलेली असते. तोपर्यंत व्यक्तीमध्ये सर्वांबाबत एक स्थिर सद्भावना असली पाहिजे, परंतु प्राणिक प्रकारच्या नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही कारण ते नातेसंबंध व्यक्तीची चेतना ही प्राणिक स्तरावरच ठेवतात आणि चेतनेला उच्च स्तराप्रत उन्नत होण्यास प्रतिबंध करतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)

सद्भावना – ०४

सत्याने वागण्याचा एकच एक मार्ग आहे, व्यक्तीला जे सर्वोच्च सत्य आहे असे जाणवते केवळ तेच आपल्या प्रत्येक कृतीमधून, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला अभिव्यक्त होत राहील, यासाठी व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच वेळी व्यक्तीला ही जाणीव देखील असली पाहिजे की, तिचे सत्याविषयीचे आकलन हे प्रगमनशील (progressive) आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या घडीला जे सर्वाधिक सत्य वाटते ते उद्या तसेच असेल असे नाही आणि त्याहूनही अधिक उच्च सत्य तुमच्या माध्यमातून अधिकाधिक अभिव्यक्त होईल. येथे आरामदायी तामसिकतेमध्ये झोपून राहणे याला थाराच नाही; व्यक्तीने सदैव जागे असले पाहिजे – मी शारीरिक झोपेविषयी बोलत नाहीये – व्यक्तीने कायम जागे असले पाहिजे, म्हणजे नेहमी सचेत (conscious) असले पाहिजे आणि नेहमी सद्भाव व प्रकाशमान ग्रहणशीलतेने परिपूर्ण असले पाहिजे. नेहमी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे, नेहमी उत्तम, नेहमीच उत्तम. तुम्ही स्वतःशी असे कधीच म्हणता कामा नये की, “बापरे, हे फारच थकवणारे आहे. मला आता विश्रांती घेऊ दे, मला आराम करू दे. बास, आता मी हे प्रयत्न थांबवणार आहे.” असे केलेत तर मग तुम्ही लगेचच एका गर्तेत सापडणार आहात आणि घोडचूक करणार आहात, हे निश्चित!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 282-283)

सद्भावना – ०२

तुम्ही खरोखर जर अभीप्सेच्या उत्कट अवस्थेमध्ये असाल, तर ती अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी साहाय्यभूत ठरणार नाही, अशी कोणतीच परिस्थिती नसते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित हे ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ते पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ झालेले असता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्हाला हे माहीत आहे का की, एक संकल्प, परम सद्भाव (Good will) हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत असतो आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक प्रभावीपणे कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

सद्भावना – ०१

पूर्णयोगाच्या आव्हानात्मक मार्गावर पुढे किंवा वर आपण जसजसे प्रगत होत जातो, तसतशा प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. – प्रामाणिकपणा, विनम्रता, समता, अभीप्सा, नकार, समर्पण… अशांपैकीच एक गोष्ट म्हणजे सद्भावना. परंतु ‘सद्भावना’ या शब्दाचा खरा अर्थ काय? आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्याचे नेमके स्थान कोणते? हा असा एक शब्द आहे की, जो गप्पांच्या ओघात अगदी सहजगत्या वापरण्याची आपल्याला सवय असते; खरे तर, तो शब्द अत्यंत अर्थगर्भ आणि कृतीमध्ये परिवर्तन घडविणारा आहे. हा असा एक पायरीचा चिरा आहे की, ज्यावर आपल्या सहवासात आलेल्या लोकांकडे आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अवलंबून असतो.

‘सद्भावना’ या वरकरणी साध्या-सोप्या वाटणाऱ्या शब्दाचा अर्थ आणि त्याचे उपयोजन ज्यामधून स्पष्ट होईल असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विपुल साहित्य आहे, त्यातील निवडक भाग येथे मोठ्या सद्भावनेने आपल्या सर्वांसमोर प्रसृत करत आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मासिक

पूर्णयोग आणि बौद्धमत – १३

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा, सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितले तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही…

तुम्हाला हे कळत नाही कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

तुमच्या मनात काही नाही, फक्त सद्भावना व सद्हेतूच आहेत आणि तुम्ही जे सारे काही करता ते फक्त चांगल्यासाठीच करता, असे समजून तुम्ही तुमची पाठ थोपटून घेता – हो, जोपर्यंत तुम्ही जागृत आहात आणि तुमचे स्वत:वर नियंत्रण आहे तोपर्यंत, पण ज्या क्षणी तुम्ही सावधानता गमावता, त्या क्षणीच तुमच्या आतमध्ये अशा काही गोष्टी घडतात की, त्याची तुम्हाला जाणीव नसते, आणि त्या फार काही सुखकर नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)