साधनेची मुळाक्षरे – १८
सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.
‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.
साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)