Tag Archive for: व्यावहारिक जीवन

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

तुमच्यातील कोणताही एखादा घटक जोवर या जगाशी निगडीत असतो तोवरच हे जग तुम्हाला त्रास देईल. मात्र तुम्ही जर सर्वथा ‘ईश्वरा’चे होऊन राहिलात तरच तुमची त्या त्रासापासून मुक्तता होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 362)

माझे असे मत आहे की, पराधीनता किंवा दारिद्रय किंवा धर्माचा व आध्यात्मिकतेचा अभाव हे भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण नाही; तर ‘ज्ञानाच्या या जन्मभूमी’मध्येच अज्ञानाचा फैलाव आणि विचारशक्तीचा ऱ्हास हेच भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 369)

असे एक प्रेम असते की, ज्यामध्ये भावना या चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ईश्वराभिमुख झालेल्या असतात. हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते; पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तसे करण्यास जर तुम्ही सक्षम असाल तर, तेव्हा तो प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असतो.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा व्यक्ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा हीच व्यक्तीची पहिली चूक असते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

–श्रीमाताजी (CWM 17 : 370)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्ती असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला बांधून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

तुम्ही कोण होतात त्याचा विचार करू नका, तर तुम्ही जे बनण्याची आस बाळगून आहात त्याचाच विचार करा; तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्यामध्येच पूर्णतः राहा. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 03:84)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात याने व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, केवळ ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 14:279)

प्रामाणिकपणा – ३६

आपण ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा ‘असुर’सुद्धा ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते. सुरुवाती सुरुवातीला नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो.

मला एक असे मूल माहीत आहे, की जे स्वत:च खेळता-खेळता एका दारावर धडकले आणि नंतर मात्र त्यानेच त्या दाराला जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक त्या दुसऱ्यानेच केलेली असते. बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण असा वागलो नसतो.’’ पण वास्तविक, हे याच्या अगदी उलट असायला हवे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असली पाहिजे, भले मग तुमच्या सोबतची ती व्यक्ती, तसे करो वा न करो. यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये. मी तुम्हाला सांगते : तुम्ही तुमची वृत्ती कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा, जर तुम्ही भेदकपणे स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. तेव्हा प्रामाणिकपणे वागणे हे किती कठीण असते हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी [CWM 05 : 06]