Posts

कोणतेही कर्म हे शांततेमध्ये नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये. तुम्ही काय केले पाहिजे तर, इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि इतर काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे स्वतःला अस्वस्थ, त्रस्त किंवा नाराज होऊ देऊ नये – दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ‘समता’ बाळगावी आणि योगसाधकाला साजेशी अशी वैश्विक सदिच्छा बाळगावी. तुम्ही तसे केलेत आणि तरीही इतर जण अस्वस्थ झाले किंवा नाराज झाले तर, तुम्ही ते मनावर घेता कामा नये; कारण (मग तेव्हा) त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.

*

सामान्य मानवी प्राणिक मागण्यांच्या विरोधात जेव्हा साधक स्वतःच्या योगमार्गावर अढळ राहतो तेव्हा ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (हा दगडासारखा भावशून्य आहे इ.) अशा प्रकारची निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता कामा नये. सामान्य प्राणिक मानवी प्रकृतीच्या चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 322-323), (CWSA 31 : 315)

तुम्ही जेवढे अधिक अचंचल (quieter) व्हाल, तेवढे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल. समत्व हा सर्व आध्यात्मिक शक्तींचा दृढ पाया आहे. तुमची बैठक मोडू शकेल अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही थारा देता कामा नये; तुम्ही तसे करू शकलात, तर मग होणाऱ्या सर्व हल्ल्यांच्या प्रतिकार तुम्ही करू शकता. तसेच, त्याच्या जोडीला जर तुमच्याकडे पुरेसा विवेक असेल आणि जेव्हा अनिष्ट सूचना तुमच्यापाशी येत असतात तेव्हाच तुम्ही जर का त्या पाहू शकलात, पकडू शकलात तर, त्यांना परतवून लावणे हे तुम्हाला सोपे जाते; परंतु कधीकधी त्या नकळतपणे येतात आणि मग त्यांच्याशी मुकाबला करणे अवघड होऊन बसते. जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही शांत बसले पाहिजे आणि तेव्हा तुम्ही शांतीला व सखोल आंतरिक अचंचलतेला आवाहन केले पाहिजे. दृढ राहा आणि विश्वासाने, श्रद्धेने आवाहन करा. जर तुमची अभीप्सा शुद्ध आणि स्थिर असेल तर तुम्हाला खात्रीपूर्वक साहाय्य मिळतेच.

विरोधी शक्तींकडून होणारे हल्ले हे अटळ असतात. मार्गावरील परीक्षा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्या अग्निदिव्यामधून मोठ्या धैर्याने बाहेर पडले पाहिजे. हा मुकाबला कठीण असू शकतो पण जेव्हा तुम्ही त्यामधून बाहेर पडता, तेव्हा तुम्ही काहीतरी प्राप्त करून घेतलेले असते, तुमचे एक पाऊल पुढे पडलेले असते. कधीकधी तर अशा विरोधी शक्तींच्या अस्तित्वाची आवश्यकताही असते. त्यांच्यामुळे तुमचा निश्चय अधिक दृढ होतो, तुमची अभीप्सा अधिक सुस्पष्ट होते. हेही खरे आहे की, तुम्हीच अशा शक्तींना जिवंत राहण्याचे खाद्य पुरविता म्हणून त्या टिकून राहतात. जोवर तुमच्यामधील काहीतरी त्यांना प्रतिसाद देत राहते तोवर, त्यांचा हस्तक्षेप हा अगदी यथायोग्यच आहे, असे म्हटले पाहिजे.

परिस्थिती कोणतीही असली तरी, जेव्हा विरोधी शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा हा हल्ला बाहेरून होत आहे, असे समजावे आणि म्हणावे, “हे माझे स्वरूप नाही, मला या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नाही”; हा दृष्टिकोन सुज्ञपणाचा आहे. सारे कनिष्ठ आवेग, साऱ्या इच्छाआकांक्षा, साऱ्या शंका आणि मनामधील साऱ्या प्रश्नांना तुम्ही याच पद्धतीने हाताळले पाहिजे. जर तुम्ही त्या साऱ्यांबरोबर वाहवत गेलात तर, त्यांच्याशी मुकाबला करण्यातील अडचणी अधिक वाढतात; कारण मग तुम्हाला, तुमच्या स्वतःच्याच प्रकृतीवर मात करण्याच्या कायमस्वरूपी अवघड कामाला सामोरे जावे लागत आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण जर एकदा का तुम्ही असे म्हणू शकलात की, “नाही, हे माझे स्वरूप नाही. मला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही”, तर मग त्यांना पिटाळून लावणे अधिक सोपे जाते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 34-35)

समतेशिवाय साधनेचा पाया पक्का होऊ शकत नाही. परिस्थिती कितीही असुखकर असू दे, इतरांची वागणूक कितीही मान्य न होण्यासारखी असू दे तरी, तुम्ही तिचा पूर्ण शांतपणे आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियेविना स्वीकार करायला शिकलेच पाहिजे. ह्या गोष्टी हीच समत्वाची खरी कसोटी असते. जेव्हा लोक चांगले वागत असतात आणि परिस्थिती सुखकारक असते आणि सर्व गोष्टी सुरळीत चालू असतात, तेव्हा समत्व राखणे आणि शांत राहणे सोपे असते; पण जेव्हा ह्या साऱ्या गोष्टी विपरित असतात तेव्हाच स्थिरता, शांती, समता यांच्या पूर्णत्वाचा कस लावता येणे शक्य होते, त्यांचे दृढीकरण करता येते, त्यांना परिपूर्ण करता येते.

*

समत्व हाच खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार आहे आणि साधक जेव्हा स्वत:च्या प्राणिक प्रवृत्तीला, भावना किंवा वाणी किंवा कृती यामध्ये वाहवत जायला मुभा देतो, तेव्हा तो या समत्वापासूनच ढळत असतो, विचलित होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 129, 130)

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

तुमच्यातील कोणताही एखादा घटक जोवर या जगाशी निगडीत असतो तोवरच हे जग तुम्हाला त्रास देईल. मात्र तुम्ही जर सर्वथा ‘ईश्वरा’चे होऊन राहिलात तरच तुमची त्या त्रासापासून मुक्तता होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 362)

माझे असे मत आहे की, पराधीनता किंवा दारिद्रय किंवा धर्माचा व आध्यात्मिकतेचा अभाव हे भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण नाही; तर ‘ज्ञानाच्या या जन्मभूमी’मध्येच अज्ञानाचा फैलाव आणि विचारशक्तीचा ऱ्हास हेच भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 369)

असे एक प्रेम असते की, ज्यामध्ये भावना या चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ईश्वराभिमुख झालेल्या असतात. हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते; पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तसे करण्यास जर तुम्ही सक्षम असाल तर, तेव्हा तो प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असतो.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा व्यक्ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा हीच व्यक्तीची पहिली चूक असते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

–श्रीमाताजी (CWM 17 : 370)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्ती असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला बांधून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)