Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

(दि. १९.०६.१९०९)

हिंदुधर्म हा सर्वाधिक चौकस आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे. तो चौकस आहे असे म्हणण्याचे कारण की, हिंदुधर्माने आजवर सर्वाधिक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच त्यामध्ये सर्वाधिक प्रयोग करण्यात आले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अनुभूती आहे. असा हा विशाल हिंदुधर्म म्हणजे केवळ एक मतप्रणाली वा मतप्रणालींचा समुच्चय नव्हे तर, तो जीवनधर्म आहे. हिंदुधर्म ही केवळ सामाजिक चौकट नव्हे तर, तो भूतकालीन आणि भावी सामाजिक उत्क्रांतीचा आत्मा आहे. तो कशालाही नकार देत नाही, तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यावर व प्रयोग करण्यावर भर देतो; आणि अशा रितीने एकदा का अनुभवांती व प्रयोगांती गोष्टींची पारख झाली की त्या साऱ्याची योजना तो आत्मोद्धारासाठी करतो. अशा या हिंदुधर्मामध्येच भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया आम्हास आढळतो.

भारताच्या सनातन धर्मामध्ये वेद, वेदान्त, गीता, उपनिषदे, दर्शने, पुराणे, तंत्र असे अनेक धर्मग्रंथ येतात; हा धर्म बायबल वा कुराण यांचाही अव्हेर करीत नाही; पण त्याचा खराखुरा अधिकृत धर्मग्रंथ हा त्याच्या हृदयांत असतो की जेथे चिरंतनाचा निवास असतो. आमच्या स्वत:च्या आंतरिक आध्यात्मिक अनुभूतीमध्येच आम्ही जगभरातील धर्मग्रंथांचा स्रोत आणि त्याचे प्रमाण शोधले पाहिजे; तेथेच आम्ही ज्ञान, प्रेम व आचरण यांचे नियम आणि कर्मयोगाची प्रेरणा व त्याचे अधिष्ठान शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26)

 

(दि. १९.०६.१९०९)

युरोपियन समाजाची हुबेहूब नक्कल करून, यंत्रणेत बदल घडवून आणून, आमच्या समाजाचे पुनरुज्जीवन होईल यावर आमचा विश्वास नाही. विधवाविवाह, जातीयतेच्या जागी वर्गव्यवस्था, प्रौढविवाह, आंतरजातीय विवाह, सहभोजन आणि अशाच तऱ्हेचे समाजसुधारकांचे इतर काही रामबाण उपाय हे फक्त यांत्रिक बदल आहेत. त्यांचे गुणावगुण काहीही असोत पण या गोष्टी राष्ट्राच्या आत्म्याला जिवंत ठेवू शकत नाहीत; किंवा अधोगती व ऱ्हास यांचा ओघ त्या रोखू शकत नाहीत. त्यास फक्त चैतन्यशक्तीच सुरक्षित ठेवू शकते आणि हृदय विशाल व स्वतंत्र झाले तरच आम्ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या महान व स्वतंत्र होऊ शकतो. पाश्चात्य देशांमधून आयात केलेल्या धर्माच्या संकुचित व निम्नतर संकल्पनांवर आधारित अशा नव्या धर्मपंथांची संख्या वाढविणे किंवा हिंदुधर्माचा केवळ पोषाख व देह चिरस्थायी राहावा म्हणून एखादी संघटना स्थापन करणे अशा गोष्टींमुळे आमचे आध्यात्मिक आरोग्य, आणि आमची ऊर्जा व महानता आम्हाला पुनर्प्राप्त होईल, असे आम्ही मानत नाही.

भौतिकतावाद आणि मुक्त विचार यांच्या अटळ अशा संधिकालातून, धार्मिक विचार व अनुभूती यांच्या एका नव्या समन्वयाकडे, हे जग जात आहे. या नव्या धार्मिक जगताचे जीवन हे असहिष्णुतेपासून मुक्त असून, श्रद्धा व उत्साह यांनी परिपूर्ण, धर्माच्या सर्व संप्रदायांचा, पंथांचा स्वीकार करणारे असेल; कारण या जगाची त्या एकमेवाद्वितीय ईश्वरावर अढळ श्रद्धा आहे. जो धर्म श्रद्धा आणि विज्ञान यांना, तसेच ईश्वरवाद (Theism), ख्रिश्चनधर्म, इस्लाम व बौद्धधर्म या सर्वांना कवेत घेतो आणि तरीसुद्धा, तो यांपैकी काहीही नाही; अशा धर्माकडे विश्वचैतन्य वळत आहे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 08 : 25-26)

 

 

(दि. १९.०६.१९०९)

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नसून, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. केवळ शासनाच्या प्रकारामध्ये बदल घडविणे हेच आमचे उद्दिष्ट नसून राष्ट्रबांधणी हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कामाचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! आम्ही केवळ राजकारण, सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना वाहून घेणार नाही तर; या सर्वांचा समावेश आम्ही – जो आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे – त्या तत्त्वामध्ये करतो.

जीवनाचा एक शक्तिशाली कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे, आध्यात्मिक ज्ञान व अनुभूतीचे असे एक संचित आहे की ज्या संचिताचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे हे भारताचे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा आहे शाश्वत धर्म, सनातन धर्म. परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने धर्माची केवळ चौकटच मोठ्या प्रमाणात गमावली आहे असे नाही तर, भारताने धर्माचे जिवंत सत्यत्वच गमावले आहे. कारण भारताचा हा धर्म आचरणात आणला गेला नाही, तर त्याला काहीअर्थच असणार नाही. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणणे पुरेसे नसून, तो जीवनाच्या सर्वांगांत उपयोगात आणला पाहिजे. त्याचे चैतन्य आमच्यामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या राजकारणामध्ये, आमच्या साहित्यामध्ये, आमच्या विज्ञानामध्ये, आमच्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आमच्या आत्मीयतांमध्ये, आमच्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट झाले पाहिजे. या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे, आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे आणि प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने कर्मयोग होय.

आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक हे केवळ त्याची छाया आणि त्याचे प्रतिबिंब आहे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 08 : 24)

 

 

(दि. १९.०६.१९०९)

जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे त्यामुळे सर्वजणच ही प्रक्रिया पाहू शकतात आणि ज्यांच्यापाशी थोडीफार सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली साधनसामग्री यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे प्रकृतीच्या कार्यशाळेमध्ये कच्च्या मालातून तयार झालेला नवीन वंश नव्हे किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच! अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती, मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्रोत स्वत:मध्ये सामावून घेत असून, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

…आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याही पुढे जाऊन आम्हाला असा विश्वास आहे की, यश मिळणारच; कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे.

…ईश्वर आमच्या सोबत आहे हा आमचा विश्वास आहे आणि या श्रद्धेमुळेच आम्ही विजयी होऊ. आम्हाला अशी खात्री आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयी असलेले आमचे प्रेम आणि तिची सेवा या गोष्टी आमची अंत:करणे शुद्ध करतील आणि या लढ्यातील कृतीसाठी त्या आम्हाला प्रेरित करतील. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 08 : 23-24)

 

दि. १९.०६.१९०९

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “…भौतिक दृष्टीने पाहता तुम्ही कोणीच नाही परंतु, आध्यात्मिक दृष्टीने पाहता तुम्ही सर्वकाही आहात. भारतीय मनुष्यच केवळ सर्व गोष्टींवर खरा विश्वास ठेवू शकतो, कोणतेही कार्य करण्यास धजावतो, सर्वस्वाचा त्याग करू शकतो. पण त्याकरता प्रथम खरे भारतीय व्हा.

आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. आर्य विचार, आर्य प्रणाली, आर्य चारित्र्य व आर्य जीवन पुन्हा संपादन करा. वेदान्त, गीता, योग या गोष्टी पुन्हा एकवार प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या संपादन करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही महान, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोशात शिल्लक राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक स्वराज्य तुम्ही प्रथम परत मिळवा.

तुमचे अंतरंग हे मातृदेवतेचे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे यासाठी तुम्ही तिची प्रार्थना करावी याची ती वाट पाहत आहे. तिच्यावर निष्ठा ठेवा, तिची सेवा करा, तुमच्या सर्व इच्छाआकांक्षा तिच्या इच्छेशी एकरूप करा. तुमचा अहं राष्ट्राच्या व्यापक अहंमध्ये विलीन करा. तुमचा विभक्त स्वार्थ हा मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोतच हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व हे सर्वकाही तुम्हाला प्रदान करण्यात येईल.”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 27-28)

 

(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता आजपासून रोज कालानुक्रमे देणार आहोत. तसा विचार करताना त्यातून एक विशिष्ट संगती प्रतीत होईल आणि आजच्या कालमानपरिस्थितीकडे पाहण्याचे एक नवीन भानही वाचकांना प्राप्त होईल, असा विश्वास वाटतो. )

लेखन – १९०७-१९०८
राष्ट्र म्हणजे काय?

आपण पाश्चात्त्य पद्धतीच्या शाळांमध्ये शिकतो आणि परिणामत: स्वत:च्या सखोल संकल्पना, सत्यतर वाणी विसरून आम्ही पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अंधानुकरण करण्यास शिकतो. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे असा देश की जेथे, अमुक एवढ्या जमिनीच्या तुकड्यावर वास्तव्य करणारी काही लाख माणसं एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहून, ती एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. …परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना मात्र अधिक सत्य आणि अधिक सघन असली पाहिजे.

आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, तसेच त्याच्या आत असणाऱ्या दुसऱ्या एका देहाचा म्हणजे सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला. त्याच्याही पलीकडे गेल्यावर, त्यांना अधिक खोलवर दडलेल्या तिसऱ्या देहाचा शोध लागला. त्या तिसऱ्या देहाच्या आतमध्ये, जीवनाचा आणि रूपाचा उगमस्रोत सदासाठी, अचल व अविनाशी अशा स्वरूपात स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तीबद्दल सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.

देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, अन्नमय कोश असतो किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापलेला असतो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा प्राणमय कोश, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, (राष्ट्र)मातेचे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, पूर्तता, सभ्यता आणि संस्कृती या साऱ्या साऱ्यांमधून राष्ट्राचे सूक्ष्म शरीर आकाराला येते. मातेच्या बाह्यवर्ती अस्तित्वाप्रमाणे असणारा हा भागही माणसाच्या भौतिक दृष्टीला दिसू शकतो.

राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये (causal body) जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो. युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, ती त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. मातेचे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक उगमस्त्रोत आहे, जो अमर्त्य, अचल आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक नारायणाचे, अनेकांमध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, ज्याची आपण सर्व जण बालकं आहोत.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 1115-1116)

 

(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन…)

हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते, हे जननी, एकेकाळी तुझ्या लेकरांनी तुझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत, परकीयांची चाकरी केली, तुझा अव्हेर केला तरीही, नैराश्याच्या त्या घोर अंधकारसमयीदेखील तू तुझ्या लेकरांचा कधीही त्याग केला नाहीस. आता जेव्हा ती जागृत झाली आहेत आणि तुझ्या मुक्ततेच्या या उष:काली तुझ्या मुखावर तेज:प्रभा विलसत आहे, हे माते, अशा या मंगल क्षणी आम्ही तुला अभिवादन करत आहोत.

आज आमच्यासमोर स्वातंत्र्याचे क्षितिज उलगडत आहे. तेच क्षितिज हे विविध राष्ट्रांच्या समूहातील खऱ्या जीवनाचे आणि तुझ्या खऱ्या महानतेचेही क्षितिज व्हावे यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही नेहमी उच्च आदर्शांची कास धरू शकू असा मार्ग आम्हाला दाखव. हे माते, आत्ममार्गावरील अग्रणी आणि अखिल मानवजातीची खरी सुहृद व साहाय्यकर्ती तूच आहेस हे तुझे रूप आम्ही जगासमोर प्रकट करू शकू यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर.

– श्रीमाताजी (CWM 13 : 352)

 

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा चौथा आणि अंतिम भाग…)

भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते या जगाला प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. भारताची आध्यात्मिकता सतत चढत्यावाढत्या प्रमाणात युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीचाच नव्हे तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचाही (psychic and spiritual practice) ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील प्रगत विचारी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक चेतनेतूनच उदयास आले पाहिजे, यांमध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विकच असणार, त्याची मध्यवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. या गोष्टी पूर्णत्वास जातील किंवा नाही, त्या किती प्रमाणात आणि किती त्वरेने पूर्णत्वास जातील, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 476 – 477)

 

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा तिसरा भाग…)

आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील पारतंत्र्यात असलेले इतर काही भूभाग हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा देत आहेत. अगदी थोड्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या आज ना उद्या केल्या जातीलच. तेथे भारताला त्याची भूमिका पार पाडावीच लागेल आणि भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी ती भूमिका पार पाडायला सुरुवात देखील केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या परिषदेमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल दोषपूर्ण असली, अगदी प्रारंभिक अवस्था या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे. इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे. अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर, आणि तसेच, एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल. यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या वाटचालीतील एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी घडामोड आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी नि:संदिग्ध भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रेदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून आले पाहिजे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच याला आडकाठी करेल.

…एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागणे आवश्यक आहे; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था वाढीस लागल्या पाहिजेत, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, या साऱ्या गोष्टी एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी भावना संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 36 : 476 – 477)

 

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा दुसरा भाग…)

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही; एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न संस्थानांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. ‘संविधान सभे’च्या (Constituent Assembly) समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या या कोणत्याही मतभेदाविना वा फाटाफूटीविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने सांप्रदायिक भेद होते त्याचे आता देशाच्या कायमस्वरूपी राजकीय विभागणीत रूपांतर होऊन ते अधिक दृढमूल झालेले दिसत आहेत. काँग्रेस (तत्कालीन) आणि राष्ट्र, आत्ता तोडगा निघालेली ही परिस्थिती म्हणजे एक तात्पुरता उपाय आहे, आणि तो कायमचा उपाय नाही, हे लक्षात घेतील, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररीत्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल : अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय या धोक्याची शक्यताही संभवते.

देशाची ही फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल, अशी आशा बाळगता येईल. कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही प्रकारे का असेना अशा रितीने एकात्मता घडून येऊ शकते; त्याचे नेमके अचूक रूप हे व्यावहारिक असण्याची शक्यता आहे पण ते काही फारसे महत्त्वाचे नाही. कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 36 : 475 – 476)