Posts

काही विशिष्ट अपवाद वगळता, आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जे आपल्याला रस्त्यामध्ये, आगगाडीमध्ये, जहाजामध्ये, बसमध्ये योगायोगाने भेटतात अशा व्यक्तींना आपण भौतिक मदत पुरविणे, हे सर्वांत चांगले साहाय्य असते. उदाहरणार्थ, आर्थिक मदत, आजारपणामध्ये किंवा संकटामध्ये असताना केलेली मदत इ.

आपल्यासारखीच कलाभिरुची किंवा अन्य रुची असल्यामुळे जे आपल्याकडे आकर्षित झालेले असतात, त्यांच्या ऐंद्रिय-ऊर्जांमध्ये सुधारणा घडवून, त्यांमध्ये समतोल घडवून आणि त्यांना योग्य दिशा देऊन, त्यांच्या संवेदनशीलतेस आपण साहाय्य केले पाहिजे.

प्रगतीबद्दल एकसमान आस असल्यामुळे जे आपल्या संपर्कात आणले गेले आहेत त्यांना आपल्या उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रेमाने त्यांचा मार्ग सुकर करून, आपण त्यांना साहाय्य करू शकतो.

आणि अंततः मानसिक आत्मीयतेचा परिणाम म्हणून जे आपल्या निकट आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्या प्रज्ञाप्रकाशाला उजळण्याची मुभा दिली पाहिजे; त्यामुळे, शक्य झाले तर, आपण आपल्या निकट आलेल्यांचे विचारक्षेत्र व्यापक करू शकू आणि त्यांचे आदर्श उजळवू शकू.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 72)

एकसारख्या असणाऱ्या इच्छा आणि आवेग यांच्यामध्ये ‘प्राणिक संपर्क’ (Vital contact) घडून येतो किंवा परस्परांना पूरक ठरण्यासाठी आणि एकमेकांना अधिक उन्नत करण्यासाठी त्यांचे एकत्र येणे क्रमप्राप्त असते.

आध्यात्मिक आकांक्षांच्या अभिसरणातून ‘आंतरात्मिक संपर्क’ (Psychic contact) घडून येतो.

समानधर्मा किंवा परस्परपूरक मानसिक क्षमता व आवडीनिवडी यांमधून ‘मानसिक संपर्क’ (Mental contact) निर्माण होतो.

सर्वसाधारणपणे, जर कोणत्याही एका प्रकाराचे प्राबल्य हे स्पष्टपणे प्रस्थापित झालेले नसेल तर भौतिक कारणांसाठी जे आपल्या निकट आलेले आहेत त्यांना आपण भौतिक मदत देऊ शकतो आणि तशी ती दिली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 72)

आपल्याला आपल्या सारख्याच असणाऱ्या माणसांच्या संपर्कात आणणारी जी कारणं असतात त्या कारणांचे जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येते की, आपल्या अस्तित्वाच्या विविध गहन पातळ्यांवर हे संपर्क घडून येतात. आपण जागृतपणे जो व्यवहार करत असतो, त्याची आपली स्वतःची एक खास पद्धत असते, त्यावर हे संपर्क अवलंबून असतात.

आपल्या व्यवहाराच्या ज्या चार मुख्य पद्धती आहेत त्याच्याशी संवादी अशा चार मुख्य प्रकारांमध्ये, आपण सर्व नातेसंबंधांचे वर्गीकरण करू शकतो. शारीरिक (physical), प्राणिक (vital), आंतरात्मिक (psychic) आणि मानसिक (mental) या त्या चार पद्धती आहेत. या वर्गीकरणापैकी एक किंवा अधिक गटांमध्ये नातेसंबंधांचा खेळ असू शकतो, मग तो एकाच वेळी असेल किंवा क्रमशः असेल, आपल्या व्यवहाराच्या आविष्करणाच्या प्रकारानुसार आणि गुणवत्तेनुसार त्यांचा हा खेळ सुरु असतो.

‘शारीरिक, भौतिक संपर्क’ हा अनिवार्य असतो, असे म्हणण्याचे कारण असे की, आपण शरीरधारी असतो आणि या तथ्यावर तो आधारित असतो. ज्यांनी आपल्याला हे शरीर दिलेले असते त्यांच्यासोबत आणि जे त्यांच्यावर भौतिकदृष्ट्या अवलंबून असतात, त्या सर्वांशी अटळपणे आपले संबंध असतात. ही रक्ताची नाती असतात. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी असलेले संबंध, प्रवास करत असताना होणाऱ्या ओळखी, रस्त्यावर होणाऱ्या ओळखीपाळखी यांसारखे सहवासातून निर्माण होणारेही काही नातेसंबंध असतात. (मला येथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे आणि ती इतर तिन्ही प्रकारांना देखील लागू पडते – हे नातेसंबंध अनन्य (Exclusive) असलेच पाहिजेत असे नाही. किंबहुना ते तसे असणे खरोखर खूप दुर्मिळ असते; याचे कारण, आपण क्वचितच आपल्या अस्तित्वाच्या कोणत्यातरी एकाच पातळीवर सक्रिय असतो; म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, शारीरिक नातेसंबंध इतर तीन संबंधांपेक्षा अधिक प्रभावी असतात.)

– श्रीमाताजी
(CWM 02 : 71-72)

प्रश्न : एखाद्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला दु:खयातना का भोगाव्या लागतात?

श्रीमाताजी : एखादा आत्महत्या का करतो ? कारण तो भ्याड असतो, भित्रा असतो… आणि भ्याड लोकांना नेहमीच दु:ख भोगावे लागते.

प्रश्न : पुढील जन्मात देखील त्याला परत दु:खयातना भोगाव्या लागतात का?

श्रीमाताजी : या जगात येण्यामागे, चैत्य पुरुषाचा (Psychic being) एक विशिष्ट हेतू असतो. अनेक प्रकारचे अनुभव घेणे आणि त्यातून काही शिकणे व प्रगती करणे हा तो हेतू होय. त्याचे कार्य पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही हे जग सोडलेत तर अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक अवघड अशा परिस्थितीमध्ये परत यावे लागते. ह्याचाच अर्थ, एका जन्मात तुम्ही जे जे काही टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो ते पुढच्या जन्मी पुन्हा तुमच्या वाट्याला येते आणि ते आधीपेक्षा अधिकच अवघड असते. आणि अशाप्रकारे (जीवन) सोडून न जाताही, जर आयुष्यात तुम्हाला अडचणींवर मात करावयाची असेल तर ज्याला आपण सहसा ‘परीक्षा देणे’ असे म्हणतो, ती द्यावी लागते, तिच्यामध्ये यशस्वी व्हावयाचे असते, तुम्ही तिच्यात जर यशस्वी झाला नाहीत किंवा तिच्याकडे पाठ फिरविलीत, तिच्यात उत्तीर्ण होण्याऐवजी तुम्ही तिला टाळून तिच्यापासून दूर निघून गेलात तर पुन्हा कधी तरी ही परीक्षा देणे तुम्हाला भाग असते आणि मग ती पूर्वीपेक्षाही अधिक कठीण असते.

आता, तुम्हाला हे माहीतच आहे की, लोक अतिशय अज्ञानी असतात आणि त्यांना असे वाटत असते की, जीवन आहे आणि त्यानंतर मृत्यु आहे; जीवन म्हणजे हालअपेष्टांचा ढीग आणि त्यानंतर येणारा मृत्यू म्हणजे चिरंतन शांती. परंतु असे अजिबात नसते आणि बहुतकरून, एखादा माणूस जेव्हा पूर्णतया निरंकुश, बेताल पद्धतीने, अज्ञानी आणि अंध:कारयुक्त भावावेगापोटी, जीवन संपवून टाकतो, तेव्हा तो थेट वासनांविकारांनी व सर्व प्रकारच्या अज्ञानाने बनलेल्या प्राणिक जगतामध्ये (Vital world) पोहोचतो. आणि मग जे त्रास व हालअपेष्टा त्याला टाळावयाच्या होत्या त्याच परत त्याच्यासमोर उभ्या ठाकतात आणि आता तर शरीररूपी रक्षणकवचही राहिलेले नसते. जर तुम्ही कधी दुःस्वप्न पाहिले असेल, म्हणजेच, तुम्ही अविचारीपणे प्राणिक जगतात फेरफटका मारला असेल तर तो भयानक अनुभव, ते दुःस्वप्न संपविण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वत:ला जागे करणे, म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वेगाने आपल्या शरीरात परतून येणे हा असतो. परंतु तुम्ही जेव्हा शरीरालाच नष्ट करून टाकता तेव्हा तुमचे रक्षण करण्यासाठी ते शरीरच राहिलेले नसते. आणि मग ही दुःस्वप्नामुळे भयभीत होण्याची अवस्था तुमच्या कायमचीच वाट्याला येते, आणि हे नक्कीच फारसे सुखावह नसते. दुःस्वप्नातील भयाला टाळावयाचे असेल तर तुम्ही चैत्य चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असणे गरजेचे आहे आणि ज्यावेळी तुम्ही चैत्य चेतनेमध्ये असता त्यावेळी या गोष्टी तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, याची तुम्हाला खात्री असते. खरोखरीच, ही सगळी अज्ञानयुक्त अंध:काराची आंदोलने असतात आणि मी म्हटले त्याप्रमाणे, असे करणे म्हणजे निरंतर प्रयत्न करण्याऐवजी भ्याडपणाने, घाबरून मोठी माघार घेणे असते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 23-24)

जडभौतिक शरीरामध्ये मनुष्यप्राणी स्वगृही व सुरक्षित असतो; देह हा त्याचे सुरक्षाकवच असते. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार भरलेला असतो व ते असा विचार करतात की, त्यांच्या मृत्युनंतर गोष्टी अधिक चांगल्या व अधिक सोप्या होतील. परंतु वास्तविकता अशी आहे की, शरीर हे तुमचे आश्रयस्थान असते, गडकोट असतो. तुम्ही जेव्हा शरीरात निवास करीत असता तेव्हा विरोधी जगताच्या शक्तींना तुमच्यावर थेट ताबा मिळविणे कठीण असते. दु:स्वप्ने म्हणजे काय? तर, दु:स्वप्ने म्हणजे तुम्ही प्राणिक जगतामध्ये (vital world) केलेले भ्रमण असते. आणि दुःस्वप्नाच्या तावडीत जेव्हा तुम्ही सापडता तेव्हा तुम्ही प्रथम काय करता? तर, तुम्ही झपाट्याने स्वत:च्या शरीरात परत येता आणि तुम्ही तुमच्या सामान्य शारीरिक चेतनेमध्ये परतून येईपर्यंत स्वतःला खडबडवून जागे करता. परंतु प्राणिक शक्तीच्या जगतात मात्र तुम्ही परके असता; तो अपरिचित समुद्र असतो व त्यात तुमच्याकडे दिशादर्शक होकायंत्र नसते, की सुकाणूही नसते. कसे जावे, कुठे जावे हे तुम्हाला काहीही कळत नसते आणि जे करायला हवे त्याच्या अगदी विरुद्ध असेच प्रत्येक पावलागणिक तुम्ही करत असता. या जगताच्या कोणत्याही प्रदेशात तुम्ही थेट प्रवेश केला तर तेथील जीव तुमच्याभोवती गोळा होतात, ते तुम्हाला घेरतात आणि तुमच्यामध्ये असलेले सर्वकाही काढून घेऊ पाहतात, जे त्यांना काढता येईल ते काढून त्याला ते स्वतःचे अन्न व भक्ष्य बनवू पाहतात. तुमच्याकडे जर शक्तिशाली प्रकाश आणि अंतरंगातून प्रस्फुरित होणारी शक्ती नसेल, तर तुम्ही तुमच्या शरीराविना तिथे कसे वावरत असता? तर, जणू काही कडाक्याच्या थंडीमध्ये आश्रय देणारे घर तुमच्यापाशी नसावे, संरक्षण करणारे उबदार कपडेही तुमच्याकडे नसावेत, इतकेच नव्हे तर तुमच्या शरीरांतर्गत असणाऱ्या नाड्या झाकून घेण्यासाठी त्वचादेखील नसावी आणि त्या त्वचेविना त्या नाड्या, धमन्या, शिरा उघड्या पडलेल्या असाव्यात, अशा तऱ्हेने तुम्ही तिथे वावरत असता.

अशीही काही माणसे असतात जी म्हणतात की, “मी या शरीरात किती दुःखी आहे.” आणि त्या दु:खापासून सुटका म्हणून ते मृत्युचा विचार करत असतात! परंतु मृत्युनंतरदेखील तुमचा बाह्य प्राणिक परिवेश अगदी तसाच कायम असतो आणि इहलोकातील जीवनामध्ये तुमच्या हालअपेष्टांना कारणीभूत असणाऱ्या शक्तींसारख्याच शक्तींचा तुम्हाला तेथेही धोका असतो. शरीराच्या विघटनामुळे, तुम्ही प्राणिक जगताच्या उघड्या अवकाशात जबरदस्तीने ढकलले जाता. आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतेही सरंक्षण नसते. आणि वेगाने सुरक्षिततेमध्ये परत येण्यासाठी भौतिक शरीरही आता तुमच्याकडे नसते.

इथे या पृथ्वीवर असताना, प्रत्यक्ष देहामध्ये असतानाच पूर्ण शक्तीचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही शिकले पाहिजे आणि पूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

…अंध:कारमय जीव ज्यामुळे तुमच्यापाशी येतील किंवा तुमच्यावर सत्ता गाजवू शकतील अशा कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे; जर तुम्ही तसे मुक्त नसाल तर सावध व्हा!

कोणतीही आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंतीनापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ईश्वरी संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही संकटात सापडता. आणि जोवर तुम्ही सुरक्षित नसता, तोवर कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले!

– श्रीअरविंद
(CWM 03 : 47-48)

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला त्याच्या पत्नीच्या निधनानंतर जे पत्र लिहिले आहे त्यातील हा अंश…)

तुझ्या पत्नीच्या भयंकर मृत्युमुळे तुला केवढा मोठा धक्का बसला असेल हे मी समजू शकतो. पण आता तू सत्याकांक्षी आहेस, सत्याचा साधक आहेस. त्यामुळे तू तुझे मन सामान्य मानवी प्रतिक्रियांच्या वर स्थिर केले पाहिजेस आणि सर्व गोष्टींकडे तू एका व्यापक, महत्तर प्रकाशातून पाहिले पाहिजेस.

अज्ञानमय जीवनाच्या उतारचढावांमधून, वाटचाल करणारा एक जीव या दृष्टीकडे तुझ्या मृत पत्नीकडे पाहा. या प्रवासात अशा काही घटना घडतात की ज्या मानवी मनाला दुर्दैवी भासतात. आयुष्यावर अकाली घाला घालणारा, असा हा आकस्मिक अपघाती किंवा विदारक मृत्यू नेहमीच, आपण ज्याला जीवन म्हणतो त्या, पार्थिव जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारा असतो. आणि मानवी मनाला हा विशेषच यातनामय व दुर्दैवी भासतो.

पण एखादा (साधक) ह्या वरपांगी दृश्यामागील संगती पाहू शकतो, तो हे जाणतो की, जीवात्म्याच्या प्रवासात जे जे काही घडते त्याला काही अर्थ असतो; त्याचे काही प्रयोजन असते. जीवाच्या अनुभव-मालिकेतील अशा घटनेचे स्थानही तो साधक ओळखून असतो; हा अनुभव त्या जीवाला अशा एका वळणबिंदूपाशी घेऊन जात असतो की जेथून तो अज्ञानाकडून प्रकाशाकडे मार्गस्थ होतो. ईश्वरी प्रारब्धानुसार जे जे काही घडते ते चांगल्यासाठीच हे तो साधक जाणतो – मनाला जरी ते तसे भासले नाही तरी!

अस्तित्वाच्या दोन अवस्थांच्या मधील सीमारेषा ओलांडून गेलेला जीव या दृष्टीने तू तुझ्या पत्नीकडे पाहा. विश्रांतिस्थळाकडे चाललेल्या तिच्या प्रवासाला, तुझ्या शांत विचारांद्वारे साहाय्य कर आणि ‘ईश्वरी साहाय्या’ने तिला त्या मार्गावर साथ द्यावी म्हणून प्रार्थना करून, तिला मदत कर. दीर्घकाळ चाललेल्या शोकामुळे मृतात्म्याला मदत तर होणार नाहीच उलट त्याच्या प्रवासाला विलंब होईल. तुझी जी हानी झाली त्याबद्दल कुढत बसू नकोस तर तिच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार कर.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 528)

जोवर स्त्रिया स्वत:ला मुक्त करत नाहीत तोवर,
कोणताही कायदा त्यांना मुक्त करू शकणार नाही.

पुढील गोष्टी स्त्रियांना गुलाम बनवतात –
१) पुरुष आणि त्याच्या सामर्थ्याविषयीचे आकर्षण
२) सांसारिक जीवन आणि त्याची सुरक्षा यांविषयीची इच्छा
३) मातृत्वाविषयीची आसक्ती

पुढील तीन गोष्टींमुळे पुरुष गुलाम होतात –
१) स्वामित्वाची भावना आणि सत्ता व प्रभुत्व यांबद्दलची आसक्ती
२) स्त्रीबरोबर लैंगिक संबंधाची इच्छा
३) वैवाहिक जीवनातील छोट्या छोट्या सुखांविषयीची आसक्ती

– श्रीमाताजी
(CWM 14 : 289)

समर्पण – ४८

व्यक्ती जर संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, जर तिने त्या ‘ईश्वरी कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे, अशी त्या व्यक्तीची भावना असेल तर ते त्याहूनही अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र ईश्वरी कृपेने असे का केले अन् तसे का केले, असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तीने असे म्हणता कामा नये की, “मला असे असे होईल असे वाटले होते, म्हणून मी तसे केले,” कारण व्यक्तीला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ‘ईश्वरी कृपा’ ते तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितीत, व्यक्तीने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले; त्यात काही गैर नाही.

केलेली विनंती मान्य केली जात नाही आणि व्यक्ती बंड करते, तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की, व्यक्तीची जी इच्छा असते, आकांक्षा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच केलेली मागणी ही त्या व्यक्तीसाठी हितावहच असेल असेही नाही. अशा घडीला व्यक्तीने थोडेसे अधिक समंजस होऊन म्हटले पाहिजे, “ईश्वरा, जशी ‘तुझी’ इच्छा.” पण जोवर व्यक्तीला आतून काही आवडीनिवडी व अग्रक्रम असतात तोवर तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर असे काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने वेडेपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि तशी चूक परत होऊ नये असे त्या व्यक्तीला खरोखर, मनापासून वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तीने अगदी सच्चेपणाने, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची खूपच शक्यता असते. तुम्हाला विरोध करणे हे ईश्वराला आवडते, असा तुम्ही विचार करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या अभिलाषेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागाल ते द्यायला तो नेहमीच तयार असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसं आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील.

त्यांच्या लेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील.

त्यांच्या लेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

…जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशाच व्यक्ती येथे आम्हाला हव्या आहेत.

इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 351-352)

एक गोष्ट महत्त्वाची आहे; ती अशी की, एक असे म्हातारपण आहे की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा वाढणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते.

मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)