Posts

केवळ प्राणामध्येच जोश असतो आणि आंतरात्मिक प्रेम (Psychic love) मात्र कोणत्याही ज्वालेविना काहीसे थंड असते, असे समजण्याची चूक करता कामा नये. …आंतरात्मिक प्रेमामध्ये सुद्धा जोश असू शकतो, प्राणिक प्रेमाइतकीच उत्कट किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट अशी ज्वाला असू शकते. तो शुद्ध अग्नी असतो, तो अहंकारात्मक इच्छावासनांच्या पूर्तीवर अवलंबून नसतो. तसेच, हे आंतरात्मिक-प्रेम ज्याला कवळते त्या समिधेचे (fuel) ते भक्षण करत नाही. ती ज्वाला लाल नसते, ती शुभ्र असते; परंतु उष्णतेच्या बाबतीत लाल उष्णतेपेक्षा ही धवल उष्णता कणभरदेखील उणी नसते. हे खरे आहे की, सहसा आंतरात्मिक प्रेमाला मानवी नातेसंबंध व मानवी प्रकृतीमध्ये पूर्ण वाव मिळत नाही; जेव्हा ते प्रेम ईश्वराभिमुख होऊन उन्नत होते तेव्हा तिथे त्याच्या अग्नीला अधिक सहजतेने पूर्णत्व आणि परमानंद गवसतो. मानवी नातेसंबंधांमध्ये हे आंतरात्मिक प्रेम इतर घटकांमध्ये मिसळून जाते; ते घटक लगेचच त्याला वापरण्याचा प्रयत्न करतात, त्याला झाकोळून टाकतात. अगदी क्वचितच काही क्षणी या प्रेमाला स्वतःची परिपूर्ण उत्कट अभिव्यक्ती करण्यास वाव मिळतो. अन्यथा, ते केवळ एक तत्त्व म्हणून प्रवेशते परंतु तरीसुद्धा ते प्राणप्रधान अशा त्या प्रेमामध्ये सर्व उच्चतर गोष्टी प्रदान करते – सुंदर असे माधुर्य, कोमलता, एकनिष्ठता, आत्मदान, आत्मत्याग, आत्म्याचे आत्म्याला भेटणे ह्या साऱ्या गोष्टी ते प्रदान करते. मानवी प्रेमाला स्वत:च्या अतीत जात, त्याला उन्नत करण्याची, त्याचे उदात्तीकरण करण्याची, त्याला आदर्श प्रेम बनविण्याची प्रक्रिया अंतरात्म्याकडूनच घडते. आंतरात्मिक प्रेम जर मानवी प्रेमाच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक या इतर घटकांवरही वर्चस्व राखू शकले आणि त्यांच्यावर शासन करू शकले आणि त्या घटकांचे परिवर्तन घडवू शकले तर, या द्वैती जीवनामध्ये (dual life), असे प्रेम म्हणजे, आत्मा आणि त्याच्या साधनांचे ‘परिपूर्ण ऐक्य’ हे जे वास्तव आहे त्याचे या पृथ्वीवरील काहीसे प्रतिबिंब असू शकते किंवा ती त्या वास्तवतेची पूर्वतयारी असू शकते, असे म्हणता येईल. परंतु आंतरात्मिक प्रेमाची अशा प्रकारची अपूर्ण रुपेसुद्धा खूप दुर्मिळ असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307-308)

दोन पुरुषांमध्ये किंवा दोन स्त्रियांमध्ये मैत्री होणे हे पुरुष आणि स्त्रीमध्ये मैत्री होण्यापेक्षा निश्चितपणे अधिक सोपे असते, कारण सहसा तेथे कोणतीही लैंगिक लुडबुड नसते. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीला कोणत्याही क्षणी सूक्ष्मपणे किंवा थेटपणे लैंगिक वळण लागू शकते आणि त्यातून विकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु स्त्री-पुरुषांच्या बाबतीत शुद्ध मैत्री अशक्यच असते असे मात्र नाही; अशी मैत्री असू शकते आणि ती नेहमीच अस्तित्वात असते. मात्र एवढे सांभाळले पाहिजे की, कनिष्ठ प्राणाने मागल्या दाराने त्यात डोकावून पाहता कामा नये किंवा त्याला प्रवेश देता कामा नये, या खुल्या किंवा छुप्या कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या (लैंगिक) आधाराव्यतिरिक्त इतर गोष्टींवर आधारित अशी आत्मीयता किंवा एक प्रकारचे आकर्षण, एक प्रकारचा सुसंवाद हा पुरुष आणि स्त्रीच्या प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येतो. कधीकधी असा सुसंवाद प्राधान्याने मानसिक किंवा आंतरात्मिक किंवा उच्चतर प्राणाच्या पातळीवरील असू शकतो किंवा या साऱ्यांच्या मिश्रणामधूनही त्याला आधार लाभत असतो. अशी मैत्री ही स्वाभाविक असते आणि अशा वेळी इतर गोष्टी मिसळल्यामुळे ती निम्न स्तरावर उतरेल किंवा ती मैत्री मोडेल अशी शक्यता खूपच कमी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307)

…व्यक्ती ज्याला सारे काही सांगू शकेल, ज्याच्यासमोर सारे काही उघड करू शकेल असा तो ईश्वरच व्यक्तीचा सर्वोत्तम मित्र असू शकत नाही का? कारण खरोखरच तोच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, पुन्हा पुन्हा केल्या नाहीत तर, साऱ्या चुका दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो; जो सर्व जाणू शकतो, साऱ्यावर उपाय करू शकतो आणि जो मार्गावर नेहमीच साहाय्य पुरवितो. तुम्ही अपयशी होऊ नये, तुम्ही डळमळू नये, कोलमडू नये आणि तुम्ही तुमच्या ध्येयाप्रत सरळ चालत राहावे यासाठी साहाय्य करणाराही तोच असतो. तोच खरा मित्र असतो, तुमच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्येदेखील तो तुमचा साथी असतो, तोच तुम्हाला जाणून घेऊ शकतो, तुम्हाला बरे करू शकतो आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तोच तुमच्यासोबत असतो. तुम्ही जेव्हा त्याला अगदी प्रामाणिकपणे हाक मारता तेव्हा, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला कवेत घेण्यासाठी आणि तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासाठी तो नेहमीच उपस्थित असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)

तुम्हाला तुमच्या कनिष्ठ पातळीवर घसरण्यास प्रोत्साहन देणारा, त्याच्यासोबत तुम्हीही मूर्खपणाच्या गोष्टी कराव्यात म्हणून प्रोत्साहन देणारा किंवा त्याच्या सोबत चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणारा किंवा तुम्ही ज्या हीन गोष्टी करत आहात त्याचे कौतुक करणारा असा कोणी ‘मित्र’ असू शकत नाही; हे अगदी स्पष्ट आहे. आणि तरीसुद्धा, कनिष्ठ पातळीवर उतरल्यावर देखील ज्यांच्यासोबत असताना अस्वस्थता (चुकल्या-चुकल्या सारखे) जाणवत नाही अशांबरोबरच सहसा तुम्ही मैत्री करता. शाळेत जाण्याऐवजी इकडेतिकडे भटकणे, बागांमध्ये जाऊन फळे चोरणे, शिक्षकांची टिंगलटवाळी करणे आणि यासारख्या साऱ्या गोष्टी करणे, अशा तऱ्हेच्या मूर्खपणाच्या गोष्टी करत असताना जी व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देत असते तिलाच व्यक्ती आपला खास मित्र समजते. ते तुमचे खरे मित्र नसतात. पण असे असूनसुद्धा ते खूप सोयीस्कर मित्र असतात कारण तुम्ही काही चुकीचे वागत आहात याची जाणीव ते तुम्हाला करून देत नाहीत; मी अशा माणसांना मित्र म्हणत नाही; खरे तर ते तुमचे शत्रूच असतात. एखादा मित्र मात्र तुम्हाला येऊन सांगतो, ”हे बघ, इतस्ततः भटकण्यापेक्षा, काहीच न करण्यापेक्षा किंवा काहीतरी मूर्खपणाच्या गोष्टी करण्यापेक्षा, जर तू वर्गात आलास तर ते अधिक बरे, असे तुला वाटत नाही का?’ सहसा मग व्यक्ती त्याला असे उत्तर देते की, ”मला त्रास देऊ नको, तू माझा मित्र नाहीस.”…

…व्यक्ती ज्याप्रमाणे एखाद्या संसर्गजन्य रोगापासून स्वतःचे संरक्षण करते त्याचप्रमाणे सोयीस्कर मित्रांपासून सुद्धा व्यक्तीने स्वतःला जपले पाहिजे. ज्याला संसर्गजन्य आजार झाला आहे त्याचा सहवास आपल्याला आवडत नाही आणि आपण सावधपणे त्याला टाळतो; तो आजार पसरू नये म्हणून सहसा त्याला विभक्त करण्यात येते. त्याचप्रमाणे, जो तुमच्याबरोबर मौज-मजा करतो आणि जो तुमच्यातील वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालतो त्याच्याबरोबर तुम्ही मैत्री करता कामा नये; तर चांगले सांगणारा जो तुमचा मित्र असतो त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवले पाहिजेत.

…खरंतर, जे तुमच्यापेक्षा अधिक हुशार असतात, ज्यांच्या सहवासामध्ये तुम्ही अधिक प्रगल्भ होता, जे तुम्हाला प्रगती करण्यास, अधिक चांगल्या प्रकारे वागण्यास, आणि अधिक स्पष्टपणे बघण्यास, स्वतःवर प्रभुत्व मिळविण्यास साहाय्य करतात, अशांसोबतच तुम्ही मैत्री केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 56-58)

(श्रीमाताजींचे एक शिष्य ‘पवित्र’ पुढील वचन वाचून दाखवितात…)
“आपल्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे त्यानिशी जो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण जसे आहोत, त्यापेक्षा काहीतरी निराळे असावे, अशी अधिकची अपेक्षा जो बाळगत नाही, तो आपला उत्तम मित्र.” (CWM 14 : 288)

श्रीमाताजी : आपण जी गोष्ट नेहमी विसरतो त्याच्या अनुषंगाने मी हे विधान केले होते. ती गोष्ट अशी की, व्यक्ती स्वतःचे मित्र आणि आजूबाजूला असणाऱ्यांकडून, ते जसे आहेत तसे नव्हे तर, तिला स्वतःला ते (मित्र) जसे असायला हवेत असे वाटते, तशी त्यांच्याकडून व्यक्ती अपेक्षा करत राहते – व्यक्ती स्वतःसाठी एक आदर्श ठरवू शकते आणि तोच आदर्श सर्वांवर लादू पाहते, पण…

यावरून मला टॉलस्टॉयच्या मुलाची गोष्ट आठवली. मी जपानमध्ये राहत असताना त्याची आणि माझी भेट झाली होती. जगातील माणसांमध्ये एकात्मता आणावी या आशेने तो जगभर प्रवास करत होता. त्याचा हेतू अतिशय उत्तम होता पण ते साध्य करण्याचा त्याचा मार्ग मात्र तितकासा चांगला नव्हता, असे दिसते. अत्यंत अविचल गांभीर्याने त्याने मला सांगितले की, जर प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण सारखेच कपडे परिधान करेल, एक सारखेच अन्नपदार्थ सेवन करेल आणि प्रत्येक जण समान रीतीनेच वागेल तर त्यामुळे अपरिहार्यपणे एकात्मता साधेल ! आणि जेव्हा त्याला विचारले की, हे तो कशा रीतीने साध्य करणार आहे, तेव्हा तो म्हणाला, ”देशोदेशी जाऊन एका नवीनच पण जागतिक भाषेची, एका नवीनच पण वैश्विक पोषाखाची आणि नवीनच पण वैश्विक सवयींची शिकवण दिली तर पुरेसे होईल.” तो हे अशा रीतीने करू इच्छित होता !

(श्रीमाताजी हसतात आणि म्हणतात,) खरे तर, प्रत्येक जण आपापल्या मर्यादित क्षेत्रात अशाच रीतीने वागत असतो. व्यक्तीचा स्वतःचा असा एक आदर्श असतो. सत्य, सुंदर आणि उदात्त कशाला म्हणावे, इतकेच काय पण ईश्वर म्हणजे काय, याचीदेखील प्रत्येकाची आपापली एक संकल्पना असते आणि ही संकल्पनाच तो इतरांवरही लादू इच्छित असतो. अशीही अनेक माणसं असतात की, ईश्वराबद्दलची त्यांची स्वतःची अशी एक संकल्पना असते आणि ते ती ईश्वरविषयक संकल्पना त्यांच्या सर्व शक्तिनिशी ईश्वरावरच लादू पाहत असतात आणि सहसा अशी माणसं स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत हिंमत हारत नाहीत !

आणि याच, अगदी स्वाभाविक आणि बहुतांशी अजाण अशा दृष्टिकोनाबद्दल बोलायचे माझ्या मनात होते; कारण मी जर तुमच्यापैकी एखाद्याला म्हणाले की, “हे बघा ! तुम्हीसुद्धा असेच करू इच्छित असता,” तर तो अगदी उसळून विरोध करेल आणि म्हणेल, “छे, छे! मी तरी माझ्या आयुष्यात असे कधीही केलेले नाही.” परंतु इतर लोकांबद्दल आणि विशेषतः त्यांच्या जीवनसरणीबद्दल एखाद्या व्यक्तीची जी मतं असतात ती याचसाठी असतात; कारण ते जसे असायला हवेत असे त्या व्यक्तीला वाटत असते, तशी ती माणसं असत नाहीत, वागत नाहीत म्हणून मग व्यक्ती त्यांना दोष देत राहते. या विश्वामध्ये दोन वस्तू अगदी एकसारख्या असू शकत नाहीत आणि असताही कामा नयेत; कारण तसे जर झाले तर ती दुसरी वस्तू निरूपयोगीच ठरेल कारण आधीपासून तशाच प्रकारची एक गोष्ट अस्तित्वात होती; तसेच हे विश्व अगणित बहुविधतेच्या सुमेळासाठी निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये कोणत्याही दोन प्रक्रिया – इतकेच काय पण कोणत्याही दोन चेतना या कधीच एकसारख्या असत नाहीत, हे आपण कधीच विसरता कामा नये. आणि असे जर का आहे तर, आपण हस्तक्षेप करण्याचा आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आपले विचार पटलेच पाहिजेत, अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कारण जर तुम्ही अमुक एका पद्धतीने विचार करत असाल तर हे उघडच आहे की, दुसरी व्यक्ती अगदी तुमच्याच पद्धतीने विचार करू शकणार नाही. तसेच, व्यक्ती म्हणून तुमचा जो एक विशिष्ट प्रकार आहे, अगदी त्याच प्रकारची दुसरी व्यक्ती असू शकणार नाही, हे निश्चित. या विश्वामध्ये असणाऱ्या साऱ्या विभिन्न गोष्टींना एकत्रित करून, प्रत्येक वस्तुला तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवून, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून, त्यांचा सुमेळ घडवायला तुम्ही शिकले पाहिजे. संपूर्ण सुसंवाद हा एकसारखेपणातून येत नाही तर, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य जागी ठेवल्यानेच सुसंवाद निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे आपला खरा मित्र आपल्यासारखाच असला पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याचा आपल्याला अधिकार नाही, तो जसा आहे तसाच असावा; हे लक्षात घेऊन त्यावर आपली प्रतिक्रिया आधारलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 55-56)

प्रश्न : खरेखुरे प्रेम कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर, प्रकृतीचे रूपांतरण होणे आवश्यक आहे का?

श्रीमाताजी : तुमच्या प्रेमाची गुणवत्ता ही तुमच्या चेतनेच्या रूपांतरणाच्या प्रमाणात असते.

प्रश्न : मला समजले नाही.

श्रीमाताजी : लहान मुलालादेखील समजेल इतके हे सोपे आहे. तुमची चेतना ही जर पशुवत असेल तर, तुम्ही प्राण्यांसारखेच प्रेम कराल. तुमची चेतना जर सामान्य माणसाची असेल तर तुम्ही सामान्य माणसासारखेच प्रेम कराल. तुमची चेतना ही जर अभिजनाची असेल तर तुमचे प्रेमदेखील उच्च व्यक्तीला साजेसेच असेल आणि तुमच्याकडे जर देवाची चेतना असेल तर तुमचे प्रेमदेखील देवासारखेच असेल. हे अगदी साधेसरळ आहे. आणि म्हणून, प्रगतीसाठी आणि आंतरिक रूपांतरणासाठी प्रयत्नपूर्वक, अभीप्सेच्या आणि विकासाच्या द्वारे, जर तुम्ही एका चेतनेमधून दुसऱ्या चेतनेमध्ये जाऊन पोहोचलात आणि तुमची चेतना जर अधिकाधिक विशाल होत गेली तर तुम्हाला येणारा प्रेमाचा अनुभव हा अधिकाधिक विशाल होत जाईल, हे अगदी उघड आहे.

समजा, तुम्ही अगदी स्फटिकवत स्वच्छ अशा खडकांमधून येणारे अगदी शुद्ध असे पाणी घेतलेत आणि ते एका बऱ्यापैकी मोठ्या भांड्यामध्ये साठवलेत आणि त्या भांड्यामध्ये मात्र तळाशी काहीसा किंवा पुष्कळसा किंवा अगदी मोठ्या प्रमाणात गाळ असेल; तर जे पाणी खडकांमधून आले होते, ते आता अगदी जसेच्या तसेच शुद्ध आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण त्यामध्ये त्या भांड्यामधील पुष्कळ गोष्टी मिसळल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे ते पाणी आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. अशा प्रकारे, प्रेम हे गाभ्यामध्ये अतीव शुद्ध, स्फटिकवत आणि परिपूर्ण अशी गोष्ट असते. मानवी चेतनेमध्ये असताना त्या प्रेमात, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गाळ मिसळला जातो. त्या गाळाच्या प्रमाणात प्रेमदेखील अधिकाधिक गढूळ होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 102-103)

मानवी स्नेहसंबंधांचे मूल्य काहीही असले तरी त्याचे त्याचे स्वतःचे असे एक स्थान असते कारण दिखाऊपणापेक्षा खरेपणाला, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाला, मानवापेक्षा ईश्वराला पसंती देण्याइतपत जोवर चैत्य पुरुषाची (psychic being) तयारी होत नाही तोवर, त्याला आवश्यक असणारे सारे भावनिक अनुभव, या स्नेहसंबंधांमधून त्याला मिळत असतात. चेतना जशी उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आवश्यकता असते; तसेच हृदयाच्या साऱ्या कृतीदेखील उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आणि त्यांचा पाया व त्यांचे स्वरूप बदलण्याची आवश्यकता असते. सारे जीवन आणि चेतना ही ईश्वरामध्ये सुप्रतिष्ठित करणे म्हणजे योग होय, त्यामुळे प्रेम व स्नेह यांची मुळेसुद्धा ईश्वरामध्ये रुजली पाहिजेत तसेच ईश्वराशी आध्यात्मिक व आंतरात्मिक एकत्व हे त्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. इतर साऱ्या गोष्टी बाजूला सारून, प्रथमतः ईश्वराकडे पोहोचणे किंवा केवळ ईश्वराचाच शोध घेणे हा या बदलांच्या दिशेने घेऊन जाणारा सरळ मार्ग असतो. प्रेम हे अप्रीतीकडे किंवा थंड निर्ममतेकडे वळले पाहिजे असा याचा अर्थ नाही; तर त्यामध्ये आसक्ती असता कामा नये, असा याचा अर्थ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296-297)

आत्मीयता, जिव्हाळा, स्नेह, प्रेम अशा भावना टिकून राहत नाहीत, असे नाही. इतर साऱ्या गोष्टी परस्परांना विभक्त करत असल्या तरीसुद्धा केवळ सवयीमुळे तामसिक उपजत प्रेम टिकून राहते, उदा. विशिष्ट असे कौटुंबिक प्रेम. अनेक अडथळे आले, परस्पर परस्परांना अनुरूप नसतील तरीदेखील, किंवा अगदी टोकाचा बेबनाव असला तरीदेखील रजोगुणात्मक प्रेम टिकून राहते कारण एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची प्राणिक गरज असते आणि त्यामुळे ते एकमेकांना धरून राहतात किंवा मग दोघांचीही ती गरज असते आणि मग ते पुन्हापुन्हा भेटण्यासाठी विलग होत राहतात आणि विलग होण्यासाठी पुन्हापुन्हा भेटत राहतात किंवा मग भांडणाकडून सलोखा किंवा सलोख्यातून पुन्हा भांडण असे सतत सुरू राहते. सात्त्विक प्रेमातील जिव्हाळा, उत्कटता किंवा तजेला नाहीसा झाला तरी ते प्रेम बरेचदा आदर्शाप्रत असणाऱ्या कर्तव्यबुद्धीमुळे किंवा अन्य एखाद्या आधारावर टिकून राहते. परंतु मानवी स्नेहामध्ये आंतरात्मिक तत्त्वाचा रंग मिसळण्याइतपत किंवा त्या स्नेहावर प्रभाव गाजविण्याइतपत जेव्हा आंतरात्मिक तत्त्व प्रबळ होते तेव्हाच, त्या स्नेहामध्ये खरी विश्वसनीयता असते. आणि या कारणानेच, मैत्री ही मानवी स्नेहसंबंधातील सर्वाधिक काळ टिकणारी गोष्ट असते किंवा ती तशी बरेचदा असू शकते; कारण त्यामध्ये प्राणाची (vital) ढवळाढवळ कमी प्रमाणात असते आणि जरी त्यामध्ये अहंकाराची ज्वाला असली तरी, ती शांत असते आणि ती नेहमीच ऊब व प्रकाश देणारी अशी शुद्ध अग्नीची ज्वाला असते. तथापि अशी अगदी विश्वासार्ह मैत्री बहुधा अगदी थोड्या व्यक्तींबरोबरच असते; निःस्वार्थी, प्रेमळ, निष्ठावान मित्रांची फौज असणे ही गोष्ट इतकी दुर्मिळ असते की, अशी मैत्री भ्रम असल्याचे बेलाशकपणे समजण्यात येते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296)

मानवी प्रेम

मानवी प्रेम हे अर्थातच विश्वासपात्र नसते कारण ते स्वार्थाने आणि इच्छा-वासनांनी करकचून बांधले गेलेले असते. मानवी प्रेम म्हणजे कधीकधी धुकं आणि धुराने भरलेली अहंकाराची ज्वाला असते, तर कधी ती ज्वाला अधिक स्वच्छ आणि चमकदार रंगांची असते; कधीकधी ते सहज प्रवृत्ती आणि सवयी यांवर आधारलेले तामसिक प्रेम असते. कधीकधी हे प्रेम रजोगुणात्मक असते आणि प्राणिक देवाणघेवाणीसाठी आसुसलेले किंवा मग, आवेगांनी पोसलेले असते. कधी हे प्रेम अधिक सात्त्विक असते आणि ते स्वतःकडे निरपेक्षपणे पाहण्याचा किंवा निरपेक्ष बनण्याचा प्रयत्न करते. परंतु मूलतःच प्रेम हे वैयक्तिक गरजेवर किंवा आंतरिक वा बाह्य परतफेडीवर अवलंबून असते. आणि जेव्हा ही गरज भागवली जात नाही किंवा हे प्रतिफल दिले जात नाही किंवा ते मिळणे थांबते तेव्हा मग हे प्रेम बहुधा आटते किंवा संपुष्टात येते किंवा जर ते शिल्लक राहिलेच तर, ते केवळ भूतकाळातील सवयीचा एक उत्साहहीन किंवा कष्टमय अवशेष या स्वरूपात शिल्लक राहते, अन्यथा ते तृप्तीसाठी अन्यत्र वळते. जेवढे ते अधिक उत्कट असते तेवढे त्याला प्रकोप, संघर्ष, भांडणे, सर्व प्रकारचे अहंकारात्मक अडथळे, स्वार्थीपणा, अपकर्षण आणि अगदी संताप, तिरस्कार, बेबनाव यांचा देखील त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296)

…आपल्या कृतीला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांबाबत असलेल्या आपल्या चुकीच्या दृष्टिकोनाची कारणे शक्य तितक्या किमान पातळीवर आणण्यासाठी, आपल्या संपर्काची जी असंख्य कारणे असतात ती आपण नेहमीच अत्यंत काळजीपूर्वकपणे तपासली पाहिजेत आणि आपल्याला त्या सहकाऱ्यांशी संबद्ध करणाऱ्या आत्मीयतेचा प्रकार (शारीरिक, प्राणिक, अंतरात्मिक आणि मानसिक आत्मीयता) कोणता ते शोधून काढले पाहिजे.

अगदी काही थोड्याच व्यक्ती एकाच वेळी अस्तित्वाच्या चारही अंगांनी आपल्या निकट असतात. मित्र या शब्दाचा सखोल अर्थ ज्यांना लागू पडेल असे हे आपले मित्र असतात. त्यांच्यावर आपल्या कृतींचे सर्वाधिक परिपूर्ण, सर्वात जास्त पूर्णतया उपयुक्त आणि लाभदायक परिणाम होऊ शकतात.

दोन मानवी जीवनांमधील संबंध हे अस्तित्वाच्या अवस्थांच्या खोलीवर आणि त्यांच्या संख्येवर अवलंबून असतात; आणि त्यामध्ये, ही दोन जीवने संबंद्ध करणाऱ्या आत्मीयतांचा खेळ चालू असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये.

सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या शाश्वत सारतत्त्वाशी जे तादात्म्य पावतात, तेच शाश्वतरीत्या एकत्र राहू शकतात.

…आपण जेव्हा आपल्या आंतरिक देवतेशी एकात्म पावतो तेव्हा आपण सर्वांशीच सखोलतेने एकात्म पावतो आणि आपण त्या देवतेच्या माध्यमातून, तिच्या साहाय्यानेच इतर जिवांच्या संपर्कात आले पाहिजे. तेव्हा मग, सर्व आकर्षण-प्रतिकर्षणापासून, सर्व पसंतीनापसंतीपासून मुक्त झालेले आपण, ‘तिचे’ (आंतरिक देवतेचे) जे निकटवर्ती आहेत त्यांच्याशी निकटवर्ती होतो आणि तिच्या पासून जे दूर आहेत त्यांच्यापासून दूर जातो.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 73)