Tag Archive for: विश्व

 

मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत आहे. अशक्यतेची जाणीव होणे ही सर्व शक्यतांची सुरुवात असते. हे कालबद्ध विश्व म्हणजे एक विरोधाभास होता आणि एक अशक्यता होती; म्हणूनच त्या शाश्वता‌ने स्वतःच्या अस्तित्वामधून हे विश्व निर्माण केले.

*

अशक्यता म्हणजे आजवर प्रत्यक्षात न उतरलेल्या महत्तर शक्यतांची केवळ गोळाबेरीज आहे. प्रगतीचा पुढचा टप्पा आणि अद्यापि पूर्णत्वास न गेलेला प्रवास या गोष्टी अशक्यतेमुळे झाकल्या गेलेल्या असतात.

*

मानवतेने प्रगत व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व पूर्वकल्पना बाजूला करा. तसे केल्याने, आजवर दुर्लक्षित राहिलेला विचार जागृत होतो आणि तो सर्जनशील बनतो. अन्यथा तो त्याच त्याच यांत्रिक चक्रात पुनरावृत्त होत राहतो आणि तीच त्याची योग्य कृती आहे असे समजण्याची चूक करतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

 

हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन म्हणजे काही केवळ शक्तींची क्रीडा नाही किंवा जीवन म्हणजे काही केवळ एक मानसिक अनुभवदेखील नाही; तर गुप्त असणाऱ्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी असलेले ते क्षेत्र आहे.

मानवी जीवन जेव्हा हे सत्य अवगत करून घेईल आणि जेव्हा त्याने त्या सत्याला स्वतःच्या जीवनाची प्रेरक-शक्ती बनवलेली असेल आणि त्या सत्याच्या प्रभावी साक्षात्काराची साधने जेव्हा त्याने शोधून काढलेली असतील तेव्हाच मानवी जीवनाला त्याची सार्थकता गवसेल आणि ते स्वतःच्या अतीत असणाऱ्या कशामध्ये तरी स्वतःचे रूपांतरण करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374)

 

(व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि त्यामुळे मी अमुक अमुक कोणीतरी आहे, अशी व्यक्तीची समजूत होते. हा विचार आपण काल समजावून घेतला. आज त्याचा उत्तरार्ध…)

परंतु विभक्ततेच्या वळणावळणाच्या मार्गावरून जाऊन, म्हणजेच विभक्ततेचे, विविधतेचे लाभ घेऊन, जर आपण सच्चिदानंद स्वरूपाशी ऐक्य पुनर्स्थापित केले तर, आपल्याला अधिक उच्च प्रतीचे ऐक्य साध्य होईल.

…जेव्हा सच्चिदानंद हे एकले एकच (absolute) होते, तेव्हा त्या एकत्वाची जाणीव होणार तरी कोणाला? ते एकत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून का होईना, तसे एकत्व नसलेली अशी कोणतीतरी प्रतिमा आपल्यापाशी पाहिजे, कशाचे तरी रूप आपल्यासमोर पाहिजे. आणि मला वाटते विश्वाच्या अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. कदाचित ईश्वर‌च स्वतःला जाणून घेऊ इच्छित होता, म्हणून त्याने स्वतःला स्वतःपासून विभक्त केले आणि त्याने स्वतःला न्याहाळले आणि आता, स्वतःच्या पूर्ण ज्ञानानिशी, तो स्वतःच्या अस्तित्वाची शक्यता स्वतःच उपभोगू इच्छित आहे. आणि ही गोष्ट अधिक स्वारस्यपूर्ण आहे.

– श्रीमाताजी (CWM 07 : 237)

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा अखेरचा भाग…)

विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीकडेच नाही तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचा ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत.

उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी कठीणतर अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ‘ईश्वरी इच्छा’ तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यामध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 477)