भारत – एक दर्शन १४
आपण भारतीय धार्मिक मनाच्या समन्वयी प्रवृत्तीला, सर्वसमावेशक एकतेला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. तसे केले नाही तर, भारतीय जीवनाचा आणि भारतीय संस्कृतीचा अर्थ आपल्याला सर्वार्थाने लक्षात येणार नाही. या मनाची व्यापक, लवचीक प्रवृत्ती जाणून घेतल्यानेच आपल्याला भारतीय धार्मिक मनाचा समाजावर आणि व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम झालेला आहे तो नीट समजेल. कोणी जर आपल्याला असा प्रश्न विचारला की, “हिंदुधर्म म्हणजे काय, तो कसा आहे? हा धर्म काय शिकवतो? त्याचे आचरण कसे केले जाते? त्यामध्ये असलेले सर्वसाधारण घटक कोणते?” तर उत्तरादाखल आपण असे म्हणू शकतो की, सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर ‘भारतीय’ धर्म आधारलेला आहे.
‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’
प्रथम मनात येणारी संकल्पना म्हणजे वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘एकच अस्तित्व’ आहे ज्याला विद्वान लोकं अनेक वेगवेगळी नावे देतात. (‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’) उपनिषदांत याचे वर्णन ‘एकमेवाद्वितीय’ (ब्रह्म) असे केलेले आहे; या विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व ब्रह्मच आहे, (एवढेच नव्हे तर,) ते या सर्वांच्या पलीकडेसुद्धा आहे. ‘बुद्धधर्मीय’ या तत्त्वाला ‘चिरंतन तत्त्व’ म्हणतात. ‘मायावादी’ याला ‘केवल तत्त्व’ म्हणतात; ‘आस्तिक’ याला ‘परम ईश्वर’ किंवा ‘पुरुष’ म्हणतात. त्या पुरुषाने त्याच्या शक्तीमध्ये जीव आणि ‘प्रकृती’ या गोष्टी धारण केलेल्या असतात. एका शब्दात सांगायचे तर या तत्त्वाला ‘शाश्वत’, ‘अनंत’ असे म्हणता येते. हिंदुधर्माचा हा सर्वत्र समान असा पहिला मूळ आधार आहे. परंतु मानवी बुद्धीद्वारे त्याचे अगणित सूत्रांच्या माध्यमातून आविष्करण करता येते आणि तसे ते केले गेले आहे. या ‘चिरंतना’चा, ‘अनंता’चा, ‘शाश्वता’चा शोध लावणे, त्याच्या अगदी निकट जाणे, त्यात प्रविष्ट होणे, त्याच्याशी कोणत्याही प्रमाणात, कोणत्याही प्रकारे एकरूप होणे, हा त्याच्याविषयीच्या आध्यात्मिक अनुभूतीचा अखेरचा व सर्वोच्च उंचीचा प्रयत्न (आजवर) राहिलेला आहे. असा प्रयत्न करणे ही पहिली सार्वत्रिक श्रद्धा भारतीय धार्मिक मनात आढळते.
या पायाभूत तत्त्वामध्ये तुम्ही कोणत्याही एका सूत्राने प्रविष्ट व्हा, भारतात संमत असलेल्या सहस्रावधी मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने हे महान आध्यात्मिक ध्येय अनुसरा, अथवा त्यातून उदयाला आलेल्या एखाद्या नव्या मार्गाने त्या ध्येयाचे अनुसरण करा; तसे तुम्ही केलेत की, तुम्ही या धर्माच्या गाभ्याशी जाऊन पोहोचाल.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 193-194]