पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ला न फसविणे. आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा असुर सुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते.
पहिल्यांदा नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो. अगदी बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी मूर्खपणाच करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर, मी पण असा वागलो नसतो.” पण वास्तविक, हे बरोबर याच्या उलट असायला पाहिजे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे, आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, तुमची अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची हवी, भले मग ती सोबत असणारी व्यक्ती, तसे करो वा न करो. ह्याला मी ‘प्रामाणिक असणे’ म्हणते.
एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात, तर, तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे.
ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्या विषयी तर मी बोलतच नाहीये.
तुम्ही तुमची वृत्ती भले कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा जर तुम्ही तीक्ष्णपणे स्वत:चे निरिक्षण कराल तर, तुम्हाला शेकडो वेळा तरी स्वत:मधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. प्रामाणिकपणा हा किती कठीण असतो हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल.
*
जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी साहाय्य, मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपा नेहमीच तेथे असते आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.
*
पूर्णपणे प्रामाणिक राहावयाचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अनिवार्यपणे आवश्यक अशी गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तूंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा दृष्टिकोन असतो.
*
आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व हालचाली उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकता ! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाच्या सभोवार संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह, सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 06), (CWM 03 : 192), (CWM 08 : 398), (CWM 14 : 65)