Tag Archive for: पूर्णयोग

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८०

श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानमय विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हेच केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे; या इहलोकामध्ये ‘ईश्वरा’चे आविष्करण घडविणे आणि ‘जडभौतिका’मध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना, बहुतेकांना तर तो अशक्यप्रायच वाटतो.

सर्वसाधारण अज्ञानमय विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या ध्येयाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती त्याला नाकारतात आणि त्या शक्ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरलेले आहेत. तुम्ही जर हे ध्येय अगदी अंतःकरणपूर्वक स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, त्या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभूतीद्वारे सापडण्याची काही आशा करता येईल.

‘पूर्णयोगा’ची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबंद मानसिक शिकवणुकीच्याद्वारे किंवा ध्यानधारणेच्या विहित प्रकारांद्वारे किंवा कोणत्याही मंत्रांद्वारे अथवा तत्सम गोष्टींद्वारे प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे आणि उपरोक्त सर्व गोष्टींना ज्या ज्या गोष्टी परक्या असतात त्या सर्व गोष्टींना नकार दिल्यामुळे ही साधना प्रगत होत जाते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 19-20)

साधना, योग आणि रूपांतरण – १७९

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी चेतनायुक्त ऐक्य आणि प्रकृतीचे रूपांतर हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. सर्वसाधारण योगमार्ग हे ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या निर्गुण स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याद्वारे, ऊर्ध्वमुख होत, ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलय पावण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतीत होणे आणि जे केवळ स्थितिमान स्थिरच आहे असे नाही, तर जे गतिमानही आहे अशा ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये प्रविष्ट होणे आणि समग्र व्यक्तित्व हे त्या ‘सत्या’मध्ये उन्नत करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)

साधना, योग आणि रूपांतरण – १७८

‘पूर्णयोग’ हा संपूर्ण ‘ईश्वर’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे; तर येथील जीवनाचेच संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा तीच परिपूर्णता आहे. कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याशिवाय उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाने, प्रकृतीने तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित पूर्णत्वाने वळणे, उन्मुख असणे आणि आत्म-दान करणे अंतर्भूत असते.

अशा प्रकारे आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन (superconscious) आणि अवचेतन (subconscious) घटकदेखील अर्पण केले पाहिजेत. हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये (illumination) आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्येही सहभागी झालेच पाहिजे. हे पूर्णयोगाचे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 358)

साधना, योग आणि रूपांतरण – १७७

(श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे एका साधकाला पूर्णयोग म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे.)

(०१) ‘ईश्वरा’कडे फक्त मनाच्या माध्यमातून (ज्ञानयोग) किंवा फक्त हृदयाच्या माध्यमातून (भक्तियोग) किंवा फक्त इच्छा व कर्म यांच्या माध्यमातून (कर्मयोग) जाण्याऐवजी, पूर्णयोगामध्ये व्यक्ती चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी आणि शक्तींनिशी ‘ईश्वर’प्राप्तीसाठी प्रयत्न करते. तो प्रयत्न करत असताना व्यक्ती उपरोक्त तिन्ही मार्गांचे आणि अन्य अनेक मार्गांचे एकाच योगमार्गामध्ये (ईश्वराशी ऐक्य साधण्याची पद्धत) एकीकरण करते आणि ‘ईश्वरा’चे, ‘त्या’च्या उपस्थितीसहित, चेतना, शक्ती, प्रकाश आणि आनंद यांसहित सर्वकाही, आपल्या स्वतःच्या चेतनेमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये ग्रहण करते.

(०२) पूर्णयोगामध्ये व्यक्ती आपल्या ‘स्व’मध्ये आणि ‘जिवा’मध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. (म्हणजे या कनिष्ठ मानवी प्रकृतीचे ईश्वरी आध्यात्मिक प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते.)

(०३) पूर्णयोगामध्ये जन्म-प्रक्रियेला विराम देऊन, व्यक्ती फक्त पारलौकिकात ‘ईश्वर’प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील नसते तर, ती या जीवनामध्येच त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते; जेणेकरून जीवन हे देखील ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि ‘दिव्य’ प्रकृतीचे आविष्करण व्हावे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 373)

साधना, योग आणि रूपांतरण – १७६

योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधनापद्धती अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ‘ईश्वरा’भिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे असे स्वतंत्र ध्येय असते, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन असतात, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती असतात, प्रत्येकास साहाय्यभूत असे तत्त्वज्ञान आणि त्याची साधनापद्धती असते. ‘पूर्णयोग’ या साऱ्या पद्धतींचे सारग्रहण करतो आणि त्यांच्या ध्येयांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनांच्या एकीकरणाप्रत (तपशिलांच्या एकीकरणाप्रत नव्हे, तर सत्त्वाच्या (essence) एकीकरणाप्रत) पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ‘पूर्णयोग’ म्हणजे जणू ‘सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – १११

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा-वासना यांच्यावर मात करण्याची आणि संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेण्याची केवळ साधने असतात. जोपर्यंत व्यक्ती यशप्राप्तीवर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि हे असे आहे, हे दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजयाची शक्ती प्राप्त करून घेऊ नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नसते; ग्रहण करण्याची शक्ती आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची शक्ती आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपशयाने खचून न जाता केले पाहिजे.
*
कर्माचा एक मोठा उपयोग असा असतो की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांसमोर उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधना-प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात जास्त प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 241-242), (CWSA 29 : 241), (CWSA 32 : 256-257)

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

साधना, योग आणि रूपांतरण – ७८

साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.”

श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था आहे); समाधीला या योगामध्ये प्रतिबंध करण्यात आलेला नाही. श्रीमाताजी नेहमी समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट होतात ही गोष्ट हा त्याचा पुरेसा पुरावा आहे. मी जेव्हा तुम्हाला तसे म्हणालो होतो तेव्हा ‘’समाधीची कधीच आवश्यकता नाही किंवा ती कधीच उपयुक्त नाही’’, अशा अर्थाचे ते सार्वत्रिक विधान नव्हते तर, ते विधान तुमच्या तेव्हाच्या गरजेला अनुसरून केलेले होते. (विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट संदर्भाने, विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेली) विशिष्ट विधाने मनाद्वारे अनन्य आणि त्रिकालाबाधित नियमामध्ये परिवर्तित करू नयेत.

*

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही पण ती अधिकाधिक चेतनायुक्त करणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 41), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ७४

(एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) स्थितीचा, आंतरिक अस्तित्वाच्या फक्त काही भागांसाठीच खरा असणारा अनुभव असेल; मात्र तो संपूर्ण चेतनेला खरा वाटणार नाही.

समाधी अवस्थेमधील अनुभवांचा उपयोग व्यक्तित्व खुले होण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी होतो. परंतु (ध्यानामधील) साक्षात्कार जेव्हा जाग्रतावस्थेमध्येही नित्य टिकून राहतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ‘पूर्णयोगा’मध्ये जाग्रतावस्थेतील अनुभवाला आणि साक्षात्काराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.

‘स्थिरचित्त नित्य-विस्तारत जाणाऱ्या या चेतनमध्ये कर्म करणे ही एकाच वेळी साधना असते आणि तीच सिद्धीही असते,’ हे जे तुम्ही कर्माबाबत लिहिले आहे ते योग्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 253)