Tag Archive for: नकार

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४

साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.

अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”

पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.

पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.

असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०८

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये, कोणतीही एकच एक अशी ठरावीक साचेबंद मानसिक शिकवण नसते किंवा ध्यानधारणेचे कोणते नेमून दिलेले प्रकार किंवा कोणत्या मंत्र-तंत्रादी गोष्टीदेखील नसतात.

तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत, तिच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे ही साधना घडत जाते. तसेच या सर्वांना विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणेही या साधनेमध्ये अभिप्रेत असते.

श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच केवळ ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

जीवन जगण्याचे शास्त्र – २९

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारे विद्यमान असतो; पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारे कार्य करत असतो. योगामध्ये ईश्वर हाच साधक आणि तोच साधनाही असतो; त्याचीच शक्ती ही तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि आनंद यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करत असते आणि जेव्हा तो आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा त्या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये झिरपवल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते.

परंतु जोपर्यंत साधकाची कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा (aspiration), नकार (rejection) आणि समर्पण (surrender) अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 06)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा आरंभच कधी झाला नसता. परमानंद हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे तुम्ही ईश्वर जाणून घ्याल.” – श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

*

(श्रीअरविंद लिखित वरील उताऱ्यावर एका साधकाने प्रश्न विचारला आहे.)

साधक : काय केल्यास व्यक्ती ‘विशुद्ध आनंद घेण्यास’ शिकू शकेल?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, सुरुवात करायची झाली तर, तुम्ही सतर्कपणे निरीक्षण करून जाणिवसंपन्न झाले पाहिजे. इच्छावासना आणि त्यांच्या उपभोगातून जे सुख मिळते ते अस्पष्ट, अनिश्चित, मिश्रित, क्षणभंगुर आणि पूर्णपणे असमाधानकारक असे सुख असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. सहसा ही जाणीव हा आरंभबिंदू असतो.

तुम्ही जर बुद्धिनिष्ठ असाल तर, इच्छावासना काय असतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि तुमच्या इच्छावासनांची पूर्ती करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांना नकार दिला पाहिजे.

…‘इच्छावासनांची तृप्ती करण्यामधील आनंदापेक्षा, त्यांचा निरास करण्यामध्ये आणि त्यांच्यावर विजय संपादन करण्यात अनंतपटीने अधिक आनंद सामावलेला असतो.’ आणि हे निरपवाद सत्य आहे, असे प्रत्येक प्रामाणिक आणि निष्ठावान साधकाला आज ना उद्या, कधी कधी अगदी त्वरेने तर कधी कालांतराने, अनुभवास येते. जे सुख अगदीच चंचल आणि भेसळयुक्त असते, त्या वासनापूर्तीच्या सुखापेक्षा, इच्छावासनांवर मात करण्याचा आनंद हा अतुलनीय उच्चकोटीचा असतो. ही दुसरी पायरी असते.

आणि मग स्वाभाविकपणे, अशा प्रकारे सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे, अगदी थोड्या अवधीतच तुमच्या वासना तुमच्यापासून दूर जातील आणि नंतर त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये थोडे अधिक खोलवर जाण्यासाठी मोकळे होऊ शकाल आणि आनंदाचे निधान असणाऱ्या, ईश्वराप्रति, ईश्वरी तत्त्वाप्रति, ईश्वरी कृपेप्रति अभीप्सा बाळगत खुले होऊ शकाल. आणि तुम्ही जर हे अगदी प्रामाणिकपणे आत्मदानाच्या (self-giving) भूमिकेतून केलेत, म्हणजे जणू काही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊ केलेत, स्वतःला अर्पण केलेत आणि त्या अर्पणाच्या मोबदल्यात कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाहीत तर, तुम्हाला एक प्रकारची आल्हाददायक ऊब जाणवेल; आणि ज्याने तुमचे हृदय भरून जाईल असे, संतोषजनक, आत्मीय, प्रकाशमान असे काहीतरी तुम्हाला जाणवेल, आणि ती गोष्ट आनंदाची अग्रदूत असेल. यानंतरचा मार्ग सोपा असतो… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 21)

साधना, योग आणि रूपांतरण – २९७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे वर्णन केले आहे त्यावरून तुमच्यामध्ये अवचेतन (subconscient) अनियंत्रितपणे उफाळून वर आले आहे आणि सहसा शारीर-मन (physical mind) ज्या गोष्टींनी व्याप्त असते त्या गोष्टींचे म्हणजे जुने विचार, जुन्या आवडीनिवडी किंवा इच्छावासना यांच्या यांत्रिक पुनरावृत्तीचे रूप अवचेतनाने धारण केले आहे, असे दिसते. हे जर का एवढेच असते तर त्या गोष्टींना नकार देणे, तुम्ही त्यापासून निर्लिप्त होणे आणि त्या गोष्टी जाऊ देणे आणि त्या शांत होतील असे पाहणे, एवढे करणे पुरेसे होते. परंतु तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून मला असे समजले की, तो एक हल्ला आहे आणि तुमच्या मनावर व शरीरावर आक्रमण करून, त्यांना त्रास देण्यासाठी अंधकारमय शक्तीने या पुनरावृत्तीचा वापर केला आहे.

ते काहीही असो, एक गोष्ट करा आणि ती म्हणजे तुमच्या अभीप्सेच्या (aspiration) साहाय्याने, श्रीमाताजींचे स्मरण करून किंवा अन्य मार्गाने, स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले करा आणि श्रीमाताजींच्या शक्तीला हा हल्ला परतवून लावून दे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 605)

साधना, योग आणि रूपांतरण – २९४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला अवचेतनामधून वर उफाळून येणाऱ्या गोष्टींमुळे, साधनेमध्ये व्यत्यय येत आहे. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी केलेले हे मार्गदर्शन…)

हे खरं आहे की, अजून काहीतरी अवचेतनामधून (subconscient) उफाळून वर येईल, पण जे तिथे अजूनही शिल्लक राहिलेले आहे तेच वर येईल. आत्ता ज्यास नकार दिला जात आहे, ते जर नष्ट न होता इतरत्र कोठे गेले, तर ते आता अवचेतनामध्ये जाणार नाही; तर ते व्यक्ती स्वतःभोवती जी चेतना वागवत असते त्या परिसरीय चेतनेमध्ये (surrounding consciousness) जाईल. एकदा का ते तेथे गेले की ते कोणत्याही प्रकारे स्वतःचे असे राहत नाही आणि जरी त्याने परत येण्याचा प्रयत्न केला तरी ते आता एखाद्या परक्या गोष्टीसारखे असते, तेव्हा व्यक्तीने त्याचा स्वीकार करता कामा नये किंवा त्याला वाव देता कामा नये.

व्यक्ती नकाराच्या ज्या दोन अंतिम टप्प्यांद्वारे, प्रकृतीच्या जुन्या गोष्टींपासून सुटका करून घेऊ शकते ते दोन टप्पे असे : जुन्या गोष्टी एकतर अवचेतनामध्ये जाऊन बसतात आणि तेथून त्या काढून टाकाव्या लागतात किंवा मग त्या परिसरीय चेतनेमध्ये जाऊन बसतात आणि मग त्या आपल्या राहत नाहीत. (त्या सार्वत्रिक प्रकृतीचा भाग बनलेल्या असतात.)

अवचेतनामधून जे पृष्ठभागावर येत आहे ते जोवर पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत व्यक्तीने त्यांची पुनरावृत्ती होण्यास मुभा द्यावी, हा विचार योग्य नाही. कारण त्यामुळे ही त्रासदायक अवस्था विनाकारणच लांबेल आणि ती घातकसुद्धा ठरू शकते. जेव्हा या गोष्टी उफाळून येतात तेव्हा त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्या तशाच कायम न ठेवता, त्या फेकून दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 602)

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)