भारताचे पुनरुत्थान – १२
‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८
मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा भ्रांतीपासून मुक्त झालेला असतो तेव्हा त्याला या जगामध्ये अंतर्भूत असलेल्या दिव्य समत्वाचा बोध होतो. प्रेम आणि न्याय यांच्या माध्यमातून हे दिव्य समत्व स्वतःची परिपूर्ती करत असते. व्यक्तीला जेव्हा असा बोध होतो तेव्हा तो बोधच स्वयमेव शासनाच्या व समाजाच्या कायद्यामध्ये रूपांतरित होतो.
एखाद्या व्यक्तीला जेव्हा या दिव्य समत्वाचा बोध होतो तेव्हा तो अखिल जगाचा बंधू होतो आणि त्याला कोणत्याही पदावर विराजमान केले तरी तो प्रेमाच्या व न्यायाच्या कायद्याने, बंधुत्वाच्या नात्याने, सर्व मानवांची सेवा करतो. जेव्हा हा बोध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक अनुमानांचा तसेच राजकीय आकांक्षांचा आधार बनेल तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य जागी विराजमान होतील आणि मग पुन्हा ‘सत्ययुग’ अवतरेल.
हे लोकशाहीचे आशियाई आकलन आहे आणि ते जगाला ज्ञात करून देण्यापूर्वी भारताने प्रथम लोकशाहीचा स्वत:साठी म्हणून पुनर्शोध घेतला पाहिजे. मनुष्याने आत्म्यामध्ये मुक्त असावे आणि सक्तीने नव्हे तर, प्रेमाने सेवाकार्यास बांधील असावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. आत्म्याप्रमाणे समान असावे आणि इतरांच्या स्वार्थी हितसंबंधांनुसार नव्हे तर, समाजाची सेवा करण्याची त्याची जी क्षमता असेल त्यानुसार त्याने स्वत:चे समाजातील स्थान निर्धारित करावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. त्याच्या बंधुभगिनींशी त्याचे नाते सुसंवादी असावे, दोघांमध्ये शोषक व शोषिताचे किंवा भक्ष्य व भक्ष्यकाचे नाते नसावे, तसेच दास्यत्वाच्या बेड्यांनी नव्हे तर परस्परांच्या प्रेमाने व सेवाभावामुळे एकमेकांशी संबंधित असावे; हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे.
लोकशाही ही माणसाच्या हक्कांवर आधारलेली असते असे म्हटले जाते; त्याला प्रत्युत्तर देताना असे म्हटले जाते की, ती हक्कांपेक्षा मनुष्याच्या कर्तव्यांवर आधारली गेली पाहिजे; परंतु हक्क असोत वा कर्तव्य या दोन्ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहेत. जेथे स्वार्थीपणा हाच कृतीचा मूलाधार असतो अशा जगाच्या दृष्टिकोनातून, हक्क आणि कर्तव्य हे द्वंद्व (कृत्रिमरित्या) तयार करण्यात आलेले असते. मात्र धर्म ही अशी एक भारतीय संकल्पना आहे की, ज्या संकल्पनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोहोंमधील कृत्रिम द्वंद्व मावळून जाते आणि त्यांच्यामधील सखोल व शाश्वत ऐक्य त्यांना पुन्हा प्राप्त होते. धर्म हाच लोकशाहीचा आधार आहे हे सत्य आशियाने ओळखले पाहिजे. कारण युरोपचा आत्मा आणि आशियाचा आत्मा या दोहोंमधील फरक नेमका येथेच आहे. आशियाई उत्क्रांती धर्माच्या माध्यमातून तिच्या परिपूर्णतेला पोहोचते, हे तिचे रहस्य आहे.
– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 931-932)







