Posts

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

 

साधक : माताजी, तुम्ही या छायाचित्रामध्ये प्रणाम का करत आहात ? का ? आणि कोणाला ?

श्रीमाताजी : मी ‘सत्या’चे स्वागत करत आहे. त्यासाठी ही आवश्यक अशी मुद्रा आहे. हा भक्तीचा आणि विनम्रतेचा भाव आहे. जेव्हा ‘सत्य’ हेच एकमेव मार्गदर्शक असेल अशा दिवसाची मी अगदी धीराने वाट पाहत आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. येथे ‘दिव्य सत्य’ समग्रपणे स्थापित व्हावे अशी जर पृथ्वीची इच्छा असेल तर, हा भाव तिने बाळगला पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की जी या पृथ्वीला वाचवू शकेल. या भूमिकेमध्ये राहायचे आणि ऊर्ध्वगामी अभीप्सा बाळगायची. या वृत्तीने ‘सत्या’समोर नतमस्तक व्हायला या पृथ्वीने शिकलेच पाहिजे. हीच आराधनाही आहे आणि तोच प्रणामही आहे. पृथ्वीने हे शिकलेच पाहिजे, या (प्रणामाच्या) मुद्रेमधून अजूनही अधिक काही, म्हणजे गहनगभीर आणि उदात्त असे काही अभिव्यक्त होते.

[Sweet Mother – Harmonises of Light, Part 01 : 15]

संन्यासवादी जीवनपद्धती ही आध्यात्मिक पूर्णतेसाठी अगदी अनिवार्यपणे आवश्यकच असते किंवा आध्यात्मिक मार्ग म्हणजे संन्यासवादी मार्गच असतो, असे मी मानत नाही.

एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे.

तसे नसते तर, भारतामध्ये ‘जनक’ किंवा ‘विदुरा’सारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय ‘श्रीकृष्ण’देखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो ‘श्रीकृष्ण’ वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा ‘अधिपती’ झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा ‘कुरूक्षेत्रा’तील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता.

‘महाभारता’मध्ये किंवा अन्यत्र, ‘भारतीय धर्मशास्त्रा’मध्ये आणि ‘भारतीय परंपरे’मध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला एकसारखेच स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासवादी मार्ग हाच तेवढा ‘भारतीय परंपरे’तून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्व प्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग ‘युरोपियन किंवा पाश्चात्त्य’ आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो ‘भारतीय’ नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 250]

(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]

आपल्या अंतरंगातील ‘देवता’ कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती स्वत:ला झाकून घेते आणि ती त्यांच्यामध्ये स्वत:ला विसरून जाते. ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती देवता, निर्बंधरहित पूर्णत्व आणण्याचे, कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येक व्यक्तीला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते. ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 42-43]

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “समग्र प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे, ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

भौतिक संभावनांच्या वर उठून, पुरेसे उन्नत कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल तर, तिला या पार्थिव जीवनाकडे समग्रपणाने पाहता येते. त्या क्षणापासून हे लक्षात घेणे सोपे जाते की, आजवरचे मानवजातीचे सारे प्रयत्न हे एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेले आहेत. सामूहिक रीतीने असू देत वा वैयक्तिक रीतीने असू देत, माणसं तेथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात हे खरे आहे. त्यातील काही मार्ग हे इतके वेड्यावाकड्या वळणांचे असतात की, कधीकधी प्रथमदर्शनी ते त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याऐवजी, त्या ध्येयापासून दूर गेल्यासारखेच दिसतात. परंतु सारे मार्ग जाणते वा अजाणतेपणी, कमीअधिक वेगाने एकाच दिशेने चाललेले असतात. तर मग हे ध्येय आहे तरी कोणते? तेच मानवी जीवनाचे प्रयोजन आणि या विश्वातील मानवाचे जीवितकार्य असते. हे ध्येय म्हणजे, मग तुम्ही ‘त्या’ला कोणत्याही नावाने आवाहन करा, कारण प्रज्ञावंतासाठी तो सर्वच नावांचा धारणकर्ता असतो. चिनी लोकांचा ‘ताओ’, हिंदुंचे ‘ब्रह्म’, बौद्धांचा ‘नियम’, हर्मीस लोकांच्या दृष्टीने ‘शुभ’, प्राचीन ज्यू लोकांच्या परंपरेनुसार ‘अनाम’, ख्रिश्चन लोकांचा ‘प्रभु’, मुसलमानांचा ‘अल्ला’, भौतिकतावादी दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या दृष्टीने ‘न्याय, सत्य’. (अशी ध्येयाची कितीही विविध नावे असली तरी) ‘त्या’च्याबद्दल सचेत होणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. ‘त्या’चे आविष्करण करणे हे मानवाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 129]