Tag Archive for: चैत्य पुरुष

बालकसदृश विश्वास ही सर्वात महत्त्वाची अट असते. बालकाला असा प्रांजळ विश्वास असतो की, त्याला हवी असलेली गोष्ट त्याला मिळेलच, ते बालक त्या गोष्टीची स्वतःहून मागणीसुद्धा करत नाही; त्याला खात्री असते की, जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला मिळेलच. असा अगदी बालकसदृश विश्वास, हीच खरोखर सर्वात महत्त्वाची अट असते. मात्र त्यासाठी आस बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण काही माणसांच्या अंतरंगातच श्रद्धा आणि अश्रद्धा, विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो; विजयाची खात्री असलेला आशावाद आणि मोठी आपत्ती आली तर काय होईल असा विचार करणारा निराशावाद यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो….

मुले स्वाभाविकपणे जशी असतात तशीच असतील म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांना बिघडवले नसेल तर, त्यांना ‘सारे काही चांगलेच घडेल’ असा दुर्दम्य विश्वास असतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा त्यांच्याबाबतीत एखादी छोटीशी दुर्घटना घडते तेव्हा याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम होतील का, असला विचार त्यांच्या मनाला कधी शिवतही नाही. सारे काही लवकरच सुरळीत होईल अशी त्यांना अगदी स्वाभाविकपणे खात्री असते आणि ही खात्री इतकी जबरदस्त असते की त्यामुळे तो दुष्परिणामच नाहीसा झालेला असतो.

कोणी एखादा जेव्हा ‘शक्ती’ची आस बाळगतो, ‘ईश्वरा’कडे मदतीची याचना करतो, आणि ती मिळेलच असा ज्याचा अढळ विश्वास असतो तेव्हा, ती मदत मिळणार नाही असे शक्यच नाही, ती खात्रीने मिळणारच. हा विश्वास, हेच खरेखुरे ‘आंतरिक खुलेपण’ (inner opening) असते. काही माणसं सतत याच स्थितीमध्ये असतात. स्वीकारण्याजोगे असे जेव्हा काहीतरी असते तेव्हा, ते स्वीकारण्यास अशी माणसं नेहमी तत्पर असतात. पण असेही काही जण असतात की, जेव्हा काही मिळण्याची वेळ येते, जेव्हा शक्ती अवतरते तेव्हा, ते नेहमीच अनुपस्थित असतात, ते त्या घडीला मिटलेले असतात (ग्रहणशील नसतात.) त्याउलट ज्यांच्यापाशी बालकसदृश विश्वास असतो ते मात्र योग्य वेळी तेथे उपस्थित असतात. आणि आश्चर्य म्हणजे, बाह्यत: दोघांमध्ये कोणताही फरक नसतो. त्या दोघांकडेही समान सदिच्छा असते, समान अभीप्सा असते, काहीतरी कल्याणकारी करण्याची समान इच्छा असते, परंतु ज्यांच्या अंत:करणात सुहास्य विश्वास असतो, ते प्रश्न उपस्थित करत बसत नाहीत, ते आपल्याला काही प्राप्त होईल किंवा नाही, ‘ईश्वर’ आपल्याला प्रतिसाद देईल की नाही अशा शंकाकुशंका मनात आणत नाहीत; त्यांच्या मनात तसा प्रश्नच निर्माण होत नाही… “जे माझ्यासाठी गरजेचे आहे ते मला दिले जाईल; मी जर प्रार्थना केली तर मला प्रतिसाद मिळेल; जेव्हा मी अडचणीत असेन आणि मदतीची याचना करेन तेव्हा मला मदत मिळेल आणि केवळ मदत मिळेल इतकेच नाही तर सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था लावली जाईल.” असा त्यांना विश्वास असतो. असा जर हा उत्स्फूर्त, विनम्र, निःशंक विश्वास असेल तर, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कार्य अधिक चांगल्या रीतीने घडून येते आणि त्याचे परिणामदेखील अद्भुत असतात. मनाच्या शंका आणि विरोधाभास यामुळेच व्यक्ती सर्व गोष्टी बिघडवून टाकते. अशी व्यक्ती जेव्हा संकटामध्ये असते तेव्हा तिची, एक प्रकारे अशी धारणा तयार होते की, “हे अशक्य आहे! मला हे जमणार नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी मला नको आहे, ती जर का अजून खालावली, आणि जर तसेच घडले तर, सारे काही अधिकच बिघडून जाईल. मी अशा रीतीने अधिकाधिकच खालावत गेलो तर…” अशा विचारांमुळे, व्यक्ती स्वतःमध्ये आणि जी शक्ती तिने स्वीकारायला हवी त्या शक्तीमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण करते.

चैत्य पुरुषाकडे मात्र कोणताही विरोधाभास नसलेला, कोणताही तर्कवितर्क नसलेला, कोणतीही छाया नसलेला अद्भुत विश्वास असतो. आणि जेव्हा हा विश्वास असतो तेव्हा, जिला प्रतिसाद मिळणार नाही अशी कोणतीच प्रार्थना असत नाही, आणि प्रत्यक्षात साकार होणार नाही अशी कोणतीच ‘अभीप्सा’ असत नाही.

– श्रीमाताजी [CWM 06 : 403-404]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

कर्म आराधना – ०८

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, ज्याप्रमाणे आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष (psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरोन्मुख’ झाला असाल आणि म्हणाला असाल की, ”मला तुझा होऊन राहायचे आहे.” आणि ईश्वर “हो” असे म्हणाला असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा (central being) स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य माणसांमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरूक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा (inner being) म्हणाला असेल की, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे’’; तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

साधनेची मुळाक्षरे – ०८

आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)

साधनेची मुळाक्षरे – ०७

शुद्ध आत्मा (The pure self) हा अजन्मा असतो, तो जन्म वा मृत्युमधून प्रवास करीत नाही, तो जनननिरपेक्ष असतो किंवा तो देह, प्राण वा मन यांपासून वा या आविष्कृत झालेल्या प्रकृतीपासूनदेखील स्वतंत्र असतो. त्या सर्व गोष्टींचा तो अंगीकार करीत असला आणि त्यांना आधार देत असला तरीसुद्धा तो त्या गोष्टींनी बांधला गेलेला नसतो, सीमित झालेला नसतो, प्रभावित झालेला नसतो. याउलट, चैत्य पुरुष (Psychic being) मात्र, जन्माबरोबर खाली अवतरतो आणि मृत्युद्वारे निघून जातो – (तो स्वत: मृत्यू पावत नाही कारण तो अमर्त्य असतो.) तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, भूलोकावरून इतर लोकांमध्ये आणि परत पुन्हा या पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असतो. जन्मजन्मांतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून त्याची मनुष्यदशेकडे वाटचाल होत राहते… हा चैत्य पुरुष उत्क्रांतीला आधार देतो आणि विश्वानुभव घेण्यासाठीची साधने म्हणून शारीरिक, प्राणिक व मानसिक अशी मानवी चेतना विकसित करतो. ही साधने प्रच्छन्न (disguised), अपूर्ण पण चढतीवाढती आत्मअभिव्यक्ती करणारी असतात. हे सारे तो पडद्यामागे राहून करत असतो, आणि साधनभूत अस्तित्वाच्या अपूर्णतेमुळे जितपत शक्य आहे तेवढेच स्वत:मधील दिव्यत्व दाखवून देतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो चैत्य पुरुष या पडद्यामागून बाहेर येण्यास, साधनभूत प्रकृतीचा ताबा घेऊन तिला दिव्य पूर्णत्वाकडे वळविण्यासाठी सिद्ध होतो; खऱ्या अध्यात्मजीवनाची ही सुरुवात असते. असा चैत्य पुरुष मग आता मानसिक मानवी पातळीवरून आविष्कृत तयार होतो; तो आता मानसिक चेतनेकडून आध्यात्मिक चेतनेकडे आणि आध्यात्मिकतेच्या विविध पातळ्यांमधून हळूहळू अतिमानसिक अवस्थेकडे वाटचाल करू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 536-537)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

विचार शलाका – १२

प्रश्न : आपल्या अस्तित्वामध्ये एकता आणि एकसंधता प्रस्थापित करण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : आपला संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी गतीविधींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरो’न्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, ‘मला तुझे होऊन राहायचे आहे.’ आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकत नाही. जेव्हा जिवात्मा (the central being) स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि घट्ट असते की, त्यामुळे अशा व्यक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणाला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

आपल्यामधील अमर्त्य तत्त्व

बहुसंख्य लोकं जेव्हा ‘मी’ असे म्हणत असतात तेव्हा तो त्यांचा एक अंश असतो, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या विचारांचा एक अंश असतो, तो त्रयस्थपणे बोलत असतो; आणि हा बोलणारा सतत बदलत असतो. त्यामुळे त्यांचे ‘मी’ अगणित असतात किंवा त्यांचा ‘मी’ नेहमीच बदलत असतो. असे असेल तर मग, नित्य असणारे असे त्यांच्यामध्ये काय असते ?… अर्थातच, चैत्य पुरुष. कारण एखादी गोष्ट स्थायी असण्यासाठी ती गोष्ट प्रथम अमर्त्य असावी लागते. अन्यथा ती स्थायी होऊ शकत नाही. तसेच ज्या अनुभवांमधून ती गोष्ट जाते, त्या अनुभवांपासून ती गोष्ट स्वतंत्र अशी असावी लागते : ते अनुभव म्हणजेच ती गोष्ट असे असून चालत नाही. म्हणजेच, नदीच्या पात्रामुळे नदी निर्माण होत नाही, तर ती म्हणजे केवळ एक परिस्थिती असते. हीच तुलना जर आपण किंचितशी पुढे नेली तर (खरे तर, तुलना व्यर्थ असतात, तुलनेमध्ये लोक त्यांना पाहिजे त्या गोष्टी शोधत असतात.) असे म्हणता येईल की, नदी हे जीवनाचे एक चांगले प्रतीक आहे, म्हणजे असे की या नदीमध्ये स्थायी असे काय असते, तर ते असते ‘पाणी’. तो एकच पाण्याचा थेंब नित्य नसतो, पण पाणी मात्र नित्य असते – पाण्याशिवाय नदी असूच शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये जर काही स्थायी असेल तर ती असते ‘चेतना’. मनुष्यामध्ये चेतना असते आणि त्यामुळे तो टिकून राहतो. रूपं टिकून राहत नाहीत, तर या साऱ्या रूपांना बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चेतना, तीच टिकून राहते. तीच या सर्व रूपांमधून जात असताना, त्या रूपांची स्मृती कायम ठेवते (स्मृती ही अगदीच बाह्यवर्ती अशी गोष्ट असते.), इतकेच नव्हे तर त्या चेतनेचे तेच स्पंदनही ती कायम ठेवते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 173)

पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण

मानव प्रथमतः जेव्हा निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा अतिमानवतेच्या (superhumanity) जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (Psychic Being) वाट करून देणे आवश्यक आहे ; मानवामध्ये दिव्यत्वाचे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

ईश्वराचे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते.

चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण होऊ शकते.

तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल नाहीतर नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 434)