Tag Archive for: चैत्य पुरुष

चैत्य विश्व किंवा चेतनचे प्रतल हा विश्वाचा असा एका भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो. आणि चैत्य पुरुष (Psychic Being) हा अस्तित्वाचा असा एक भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो; येथे विरोधी शक्तीची मात्रा तीळमात्रही चालू शकत नाही.

हे सुसंवादाचे विश्व असते आणि येथे प्रत्येक गोष्ट प्रकाशाकडून प्रकाशाकडे आणि प्रगतीकडून अधिक प्रगतीकडे अशी जात असते. चैत्य अस्तित्व हे दिव्य चेतनचे, व्यक्तीमधील दिव्य आत्म्याचे स्थान असते. ते प्रकाश, सत्य, ज्ञान, सौंदर्य आणि सुसंवाद यांचे केंद्र असते. हे असे केंद्र असते जे, तुमच्या प्रत्येकामधील दिव्य आत्म्याने त्याच्या अस्तित्वाने, अंशाअंशाने निर्माण केलेले असते; ज्या दिव्य चेतनेचे ते अविभाज्य भाग असते तिने ते प्रभावित झालेले असते, तिने घडविलेले असते आणि तिने ते संचालित केलेले असते.

तुमच्यामधील दिव्यतेच्या संपर्कात येण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये खोलवर चैत्य अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे. चैत्य पुरुष हा दिव्य चेतना आणि तुमची बाह्य जाणीव यांधील दुवा असतो. तो तुमच्या आंतरिक जीवनाचा रचयिता असतो; दिव्य इच्छेचा कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्याच्याद्वारे बाह्य प्रकृतीमध्ये अभिव्यक्त होत असतात.

जर तुम्ही तुमच्या बाह्य जाणिवेमध्ये तुमच्यामधील ह्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झालात, तर तुम्हाला शुद्ध शाश्वत चेतना गवसेल आणि तुम्ही त्यात जगू लागाल; सामान्यतः मनुष्यप्राणी ज्या अज्ञानाद्वारे संचालित होत असतो त्याद्वारे संचालित होण्याऐवजी, मग तुम्ही तुमच्या अंतरंगातील शाश्वत प्रकाश आणि ज्ञान यांच्या अस्तित्वाविषयी जागृत होता आणि त्यात तुम्ही समर्पण करता, समग्रतया त्यालाच आत्मनिवेदन करता आणि सर्व बाबींमध्ये त्याच्याद्वारेच संचालित होता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 62)

बाळाची संकल्पपूर्वक गर्भधारणा ही अतिशय दुर्मीळ अशी बाब आहे. अगणित पालकांमधील अगदी थोडेच पालक असे असतात की ज्यांना बाळ कसे असावे याची थोडीतरी पर्वा असते, अनेकांना हे देखील माहीत नसते की ते जसे आहेत त्यावर बाळ कसे असणार हे अवलंबून आहे. काही थोड्या अभिजनांनाच हे माहीत असते. बऱ्याचदा गोष्टी जशा घडू शकतात तशा घडतात, काहीही होऊ शकते आणि काय घडत आहे ह्याची लोकांना जाणीवच नसते. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला साहाय्यक ठरेल अशा तऱ्हेचा पुरेसा विशुद्ध असा प्राणिक जीव जन्माला येईल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगू शकता? व्यक्ती जन्माला येताना मृत त्वचा घेऊनच जन्माला आलेली असते, ती स्वच्छ केल्याशिवाय तिला जगण्याची सुरुवातच करता येत नाही.

एकदा का तुम्ही आंतरिक रुपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जीवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत प्रवास केला तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात. आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (ते जास्तच घातक आहे.) किंवा असे काही लोक असतात की जे इतरांच्या संपर्कात आले की भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

जेव्हा तुम्ही चांगली इच्छा बाळगता, तेव्हा बाह्यत: तुम्ही या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की या गोष्टी सारख्या सारख्या वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे तुम्हाला कळू लागते आणि एखाद्या विशिष्ट घडीला तुम्ही स्वत:वर ताबा मिळवू शकत नाही तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

तुमच्या कडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला काही सूचना, काही मदत, निर्णय घेण्यासाठी काही आधार पुरविण्यात येतात आणि तुम्ही योग्य दिशेला वळवितात.

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करावयास सुरुवात केली तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू कोणीतरी संगनमताने सारे घडवीत आहे असे वाटू लागते.

आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुम्हाला तुमच्या अडचणींचे मूळ दिसू लागते : “ओह! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर, अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे; खरंच, माझी आजी अशी होती, माझे आजोबाही असे होते.” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकाल, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या साऱ्या साखळ्या तुम्ही तोडाल आणि तुमच्या मार्गावर अगदी मुक्तपणे पुढे जाल.

जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे. नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; सर्व तत्त्वज्ञानाची पुस्तके, अगदी योग सुद्धा असेच सांगतो, तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमची प्रकृती बदलू शकत नाही कारण तुमच्या जन्माबरोबरच ती आलेली असते, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी खूप अवघड गोष्ट करावी लागते. तुम्हाला तुमची प्रकृती केवळ बदलावयाची नसते तर तुमच्या पूर्वजांची प्रकृती बदलावयची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो, पण तुम्हाला तुमच्यामध्ये ती बदलावयाची असते.

त्या गोष्टी ज्या त्यांनी तुम्हाला दिलेल्या असतात, तुमच्या जन्माबरोबर जणू या छोट्या भेटवस्तूच तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या बदलावयाच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात, आणि जर तुम्ही त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती असाल, एका नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल. आणि जर तुम्ही मागे वळून पाहिलेत तर तुम्ही म्हणाल, ”हे शक्य नाही, मी असा कधीच नव्हतो.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 260-262)

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 26-27)