Posts

(आपल्यामधील) चेतना स्वत:ला कोठे ठेवते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. चेतना जर स्वत: अहंकाराशी संबंधित राहील किंवा अहंकारामध्ये स्वत:ला ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता. चेतना जर मनाशी संबंधित राहील किंवा तेथे स्वत:ला ठेवेल तर ती मनाशी आणि त्याच्या क्रियांशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल. चेतना जर बाह्य गोष्टींवरच भर देईल, तर ती बहिवर्ती अस्तित्वामध्येच राहू लागेल आणि आंतरिक मन, प्राण आणि आंतरतम असणाऱ्या चैत्याची तिला विस्मृती होईल. चेतना जर आत वळली आणि तिने तिथे भर दिला तर तिथे ती स्वत:ला ‘आंतरिक पुरुष’ (Inner being) म्हणून ओळखते, किंवा अधिक खोलवर गेली तर ती स्वत:ला ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) म्हणून ओळखते; जर ती देहाच्या बाहेर असलेल्या पातळ्यांवर चढून गेली तर, ज्या आत्म्याला स्वाभाविकपणेच त्याच्या विशालतेचे आणि मुक्ततेचे भान असते त्या आत्म्याशी तद्रूप होऊन, ती स्वत:ला शरीर, प्राण वा मन म्हणून नव्हे तर, ‘आत्मा’ (self) म्हणून ओळखते.

चेतनेचा भर कशावर आहे त्यावरून सर्व फरक पडतो. म्हणूनच व्यक्तीने स्वत:ची चेतना अंतरंगामध्ये नेण्यासाठी किंवा उर्ध्वगामी करण्यासाठी, ती हृदयामध्ये किंवा मनामध्ये केंद्रित केली पाहिजे.

चेतनेचा हा कल सारे काही ठरवीत असतो. तोच व्यक्तीला मनोप्रधान, प्राणप्रधान, शरीरप्रधान किंवा आत्मप्रधान अशा स्वरुपाचा बनवतो. तोच व्यक्तीला बंधनात अडकवतो किंवा बंधमुक्त करतो; ‘पुरुषा’प्रमाणे साक्षी बनवितो किंवा ‘प्रकृती’प्रमाणे गुंतवून ठेवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 20-21)

माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते.

व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक उथळ वाटू लागते. सुरुवातीला आंतरिक चेतना ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते. कालांतराने ही आंतरिक चेतना खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य चेतना एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते.

ही आंतरिक चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ‘ईश्वरा’च्या जवळीकीचे किंवा ‘ईश्वरा’च्या उपस्थितीचे, ‘दिव्यमाते’चे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा मग व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन चेतनांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य चेतना ही आंतरिक चेतनेच्या समकक्ष चेतनेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी; बाह्य चेतना देखील शांती, प्रकाश, ‘ईश्वरी’ ऐक्याने परिपूर्ण व्हावी याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्धाचा सारांश – चेतना जडामध्ये गर्भित असते. जडामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असलेली ही चेतना उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे विमुक्त केली जाते.)

(उत्तरार्ध) – भाग ०१

प्राण ही चेतनेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक (spiritual) आणि अतिमानसिक (supramental) चेतनेमध्ये विमुक्त होण्याची ती वाट पाहत राहते. ‘अतिमानसा’चे विकसन आणि सचेतन जीवामध्ये ‘आत्म्या’चे प्राबल्य हे निश्चितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. तसे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित (involved) असणारे ‘दिव्यत्व’ पूर्णत: बहरून येईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.

परंतु ‘प्रकृती’कडून उत्क्रांतीची या आधीची पावले, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मनुष्यामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास ‘प्रकृती’ समर्थ ठरली आहे. तथापि, मनुष्यामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल असे वळण चेतनेला देणे आवश्यक आहे; असे एक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक तपस्येच्या आणि ‘योगाभ्यासा’च्या माध्यमातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा ‘आत्म्या’च्या उच्चतर चेतनेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

मला असा एक माणूस माहीत आहे की, ज्याला त्याची चेतना व्यापक करायची होती; तो म्हणाला की, त्याला त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावर जमिनीवर पाठ टेकून आडवे पडायचे आणि चांदण्यांकडे पाहत राहायचे, त्यांच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा आणि त्या जगड्व्याळ अशा विश्वात खोलखोल दूरवर जायचे. अशा रीतीने ही पृथ्वी, तिच्यावरील छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची व्यवस्था, त्यांचे प्रमाण या सगळ्या गोष्टींबाबतचे भान हरपून जाते आणि तुम्ही आकाशाएवढे विशाल होता – पण तुम्ही ब्रह्मांडाएवढे विशाल होता असे म्हणू शकत नाही कारण आपण जे पाहतो तो त्याचा (ब्रह्मांडाचा) केवळ अंशभागच असतो, परंतु तुम्ही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाएवढे विशाल होता, असे म्हणू शकता. आणि अशा रीतीने, काही कालावधीसाठी तरी तुमच्यातील छोट्या छोट्या अशुद्धता गळून पडतात आणि व्यक्ती एका अतिविशाल मापदंडाद्वारे गोष्टी समजावून घेते. हा खरोखर चांगला प्रयोग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

निसर्गाचे रहस्य – १४

‘निसर्गा’च्या शक्ती या अंध आणि हिंस्त्र असतात, असे म्हटले जाते. परंतु तसे अजिबातच नसते. माणूस स्वतःची फूटपट्टी ‘निसर्गा’ला लावून, त्याकडे बघत असतो म्हणून त्याला तसे वाटते. थोडं थांबा, आपण एक उदाहरण घेऊया. एखादा भूकंप झाला की, अनेक बेटं पाण्याने वेढून जातात आणि त्यामध्ये लाखो माणसं आपला जीव गमावतात. तेव्हा लोकं म्हणतात, “निसर्ग किती क्रूर आहे!”

मानवाच्या दृष्टिकोनातून पाहता हा निसर्ग क्रूर आहे. निसर्गाने काय केले आहे? त्याने हलकल्लोळ माजवला आहे. पण विचार करा, तुम्ही जेव्हा उड्या मारता, धावत असता किंवा तसेच काही करत असता, तेव्हा कधीतरी तुम्ही पडता-आपटता, तुम्हाला मार बसतो आणि तुमच्या शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. आपल्या पेशींच्या दृष्टीने तो एक भूकंपच असतो, तुम्ही अगणित पेशी नष्ट केलेल्या असतात. हा प्रमाणाचा प्रश्न आहे. आपल्यासाठी, आपल्या छोट्याशा चेतनेसाठी, अगदी लहान असणाऱ्या आपल्या चेतनेसाठी हे सारे फार महाभयंकर असते पण पृथ्वीच्या दृष्टीने तो केवळ एक लहानसा मुकामार असतो. आपण येथे फक्त पृथ्वीबद्दलच बोलत आहोत. पृथ्वी म्हणजे तरी काय? पृथ्वी म्हणजे काहीच नाही, पृथ्वी म्हणजे विश्वामधील जणू एक छोटेसे खेळणे आहे. आपण जर या विश्वाबद्दल बोलू लागलो तर, जगतांचे नाहीसे होणे हे एखाद्या मुक्यामारासारखेच असते. ते अगदीच किरकोळ असते.

शक्य झाले तर व्यक्तीने स्वत:ची चेतना विशाल केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. पहिल्या प्रथम आरोहण किंवा ऊर्ध्वगमन असते; तुम्ही स्वत:ला जडभौतिक चेतनेमधून काढून, उच्चतर पातळ्यांवरील चेतनेमध्ये वर उचलून घेता. निम्नतर प्रतलामधून उच्चतर प्रतलावर होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर प्रतलावर अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, रुपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकांशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर ह्या गोष्टी आता एकमेकांना भेटू लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला चमत्कार चमत्कार असे म्हणतात ते असे घडून येतात.

हे विश्व चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्याला लागू पडत नाहीत. चमत्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानक घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो. आणि त्या परिणामाला आपण चमत्कार म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य पातळीवरील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक विश्वामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही जगावेगळी घटना नाही, किंबहुना अशा घटना या सतत इंद्रियगोचर सुद्धा असू शकतात; आपल्याला त्या पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे ह्याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा आहे. किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी राखू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिक्रियाच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते.

चेतना म्हणजे फक्त चित नाही, तर चित्शक्तीदेखील आहे. चेतनेचा संबंध हा सहसा मनाशी जोडला जातो, पण मानसिक जाणीव ही अशी एक मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा मानवाची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन, अधोमानसिक किंवा अधिमानसिक, अतिमानसिक अशा भासतात.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 15-16)

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथे असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथे असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 15)