Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (३०)

(एका साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना, आद्य शंकराचार्य, भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेऊन झाल्यावर मग, श्रीअरविंद त्यांनी स्वतः मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी थोडे अधिक स्पष्टीकरण येथे करत आहेत.)

विश्वाचे मी जे स्पष्टीकरण केले आहे त्यामध्ये, येथे (पृथ्वीवर) असलेल्या आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूलभूत तथ्य मी समोर ठेवले आहे. ही आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे आरोहणांची एक मालिकाच असते. त्यामध्ये शारीरिक अस्तित्व आणि चेतना यांपासून प्राणमय पुरुषाकडे, म्हणजे ज्या अस्तित्वावर जीवन-शक्तीचे वर्चस्व असते त्या अस्तित्वाकडे आरोहण होत असते. तेथून पुढे, पूर्ण विकसित मनुष्यामधील मनोमय पुरुषाकडे आरोहण होत असते. त्यानंतर, मानसिक चेतनेच्या अतीत असणाऱ्या परिपूर्ण चेतनेकडे म्हणजे ‘अतिमानसिक’ चेतनेकडे, आणि ‘विज्ञानमय’ पुरुषाकडे, म्हणजे आध्यात्मिक अस्तित्वाची संपूर्ण चेतना असणाऱ्या ‘सत्य-चेतने’ कडे (Truth-Consciousness) आरोहण होत राहते.

‘मन’ ही काही आपली अंतिम सचेत अभिव्यक्ती असू शकत नाही कारण मन म्हणजे मूलतः अज्ञान असते, की जे ज्ञान मिळविण्यासाठी धडपडत असते; केवळ ‘अतिमानसिक सत्य-चेतना’च आपल्याला शुद्ध आणि समग्र ‘आत्म-ज्ञान’ आणि ‘जगत-ज्ञान’ प्रदान करू शकते; त्या चेतनेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या खऱ्या, सत् अस्तित्वाची प्राप्ती होऊ शकते आणि आपली आध्यात्मिक उत्क्रांती परिपूर्णतेला जाऊन पोहोचू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 396-397)

आध्यात्मिकता ०८

तुम्ही तुमच्या पत्रामध्ये वर्णन केलेल्या परिपूर्णत्वाच्या गोष्टी या कितीही चांगल्या असल्या तरी, त्याचे वर्णन मी ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा जो खरा अर्थ आहे त्या अर्थाने करणार नाही. कारण त्यामध्ये आध्यात्मिकतेच्या सारभूत आवश्यक अशा गोष्टींचा अभाव आहे. सर्व प्रकारचे पूर्णत्व हे खरोखर चांगलेच असते, कारण या किंवा त्या स्तरावर, या किंवा त्या मर्यादेत पूर्ण आत्माविष्काराच्या दिशेने, चेतनेचा जो प्रेरक-दाब (pressure) जडभौतिक विश्वावर पडतो, त्याची ती खूण असते. एका विशिष्ट अर्थाने ती स्वयमेव ‘ईश्वरा’चीच प्रेरणा असते, जी विविध रूपांमध्ये दडलेली असते. तिच्याद्वारे, चेतनेच्या निम्नतर श्रेणींमध्ये स्वयमेव ‘ईश्वर’च स्वतःच्या चढत्यावाढत्या आत्म-प्रकटीकरणाच्या (self-revelation) दिशेने स्वतःला प्रवृत्त करत असतो.

अचर निसर्गामध्ये एखाद्या वस्तूचे किंवा दृश्याचे पूर्णत्व; सामर्थ्य, वेग, शारीरिक सौंदर्य, धैर्य किंवा प्राण्यांची एकनिष्ठता, प्रेम, बुद्धिमत्ता यांचे सचेतन पूर्णत्व; कला, संगीत, काव्य, साहित्य यांचे पूर्णत्व; परिपूर्ण राजधुरंधर, योद्धा, कलाकार, कारागिर यांच्या मानसिक कृतीच्या कोणत्याही प्रकारातील बुद्धीचे पूर्णत्व; प्राणिक शक्ती आणि क्षमता यांचे पूर्णत्व; नैतिक गुणांमधील, चारित्र्यामधील, स्वभावधर्मातील पूर्णत्व – या सर्व गोष्टींना त्यांचे त्यांचे उच्च मूल्य आहे; उत्क्रांतीच्या शिडीवरील एक पायरी या दृष्टीने त्यांचे प्रत्येकाचे असे एक स्थान आहे; चैतन्याच्या उदयाच्या क्रमबद्ध पायऱ्या म्हणून त्यांचे मोल आहे. त्या पाठीमागे असलेल्या ‘ईश्वरा’च्या या अदृश्य प्रेरणेमुळे, त्याला आध्यात्मिक असे संबोधावे असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने तसे खुशाल संबोधावे; फार फार तर, ती गुप्त चैतन्याच्या उदयाची पूर्वतयारी आहे, असे म्हणता येईल. परंतु, आवश्यक भेद केल्यानेच, विचार आणि ज्ञान प्रगत होऊ शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुष्कळसा गोंधळ निर्माण झाला आहे.

हा मानसिक आदर्शवाद, नैतिक विकास, धार्मिक पावित्र्य आणि उत्साह, गूढशक्ती आणि त्याचे विक्रम या सगळ्या गोष्टींची आजवर ‘आध्यात्मिकता’ म्हणून गणना करण्यात आली होती आणि आध्यात्मिक उत्क्रांती ही चेतनेच्या निम्नतर स्तरांशीच जखडून ठेवण्यात आली होती; वास्तविक त्या गोष्टींनी अनुभवाद्वारे आध्यात्मिक चेतनेसाठी जिवाची तयारी करून दिली होती, पण या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे.

हे पूर्णत्व तेव्हाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बनते, जेव्हा हे पूर्णत्व जागृत झालेल्या आध्यात्मिक चेतनेवर आधारलेले असते आणि त्याने त्या चेतनेचे विशिष्ट सार ग्रहण केलेले असते. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 416]

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्धाचा सारांश – चेतना जडामध्ये गर्भित असते. जडामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असलेली ही चेतना उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे विमुक्त केली जाते.)

(उत्तरार्ध) – भाग ०१

प्राण ही चेतनेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक (spiritual) आणि अतिमानसिक (supramental) चेतनेमध्ये विमुक्त होण्याची ती वाट पाहत राहते. ‘अतिमानसा’चे विकसन आणि सचेतन जीवामध्ये ‘आत्म्या’चे प्राबल्य हे निश्चितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. तसे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित (involved) असणारे ‘दिव्यत्व’ पूर्णत: बहरून येईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.

परंतु ‘प्रकृती’कडून उत्क्रांतीची या आधीची पावले, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मनुष्यामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास ‘प्रकृती’ समर्थ ठरली आहे. तथापि, मनुष्यामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल असे वळण चेतनेला देणे आवश्यक आहे; असे एक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक तपस्येच्या आणि ‘योगाभ्यासा’च्या माध्यमातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा ‘आत्म्या’च्या उच्चतर चेतनेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

(पूर्वार्ध) जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे ‘अस्तित्वाची आणि चेतनेची’ एक ‘वास्तविकता’ आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या प्राचीन शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ ‘आत्म्या’मध्ये आणि ‘चैतन्या’मध्ये एकात्म असतात पण ‘चेतने’च्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी आणि मन, प्राण, देह यांतील ‘वास्तविकते’विषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक साधनेद्वारे हा विभक्त ‘चेतने’चा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या ‘आत्म्या’विषयी, स्वत:मधील व सर्वांमधील ‘दिव्यत्वा’विषयी जागृत होणे शक्य आहे.

श्रीअरविंदांची शिकवण असे सांगते की, ‘सद्वस्तु’ (One Being) आणि ‘चेतना’ (Consciousness) ही ‘जडभौतिका’मध्ये अंतर्हित (involved) आहे. उत्क्रांती (Evolution) ही अशी पद्धती आहे की, जिच्याद्वारे ही सद्वस्तु स्वत:ला मुक्त करवून घेते; जे अचेतन भासते त्यामध्येसुद्धा चेतना प्रकट होते आणि एकदा का ती प्रकट झाली की, उच्च उच्चतर वाढण्याकडे आणि त्याच वेळी जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे विकसित होण्यासाठी व विस्तारण्यासाठी ती स्वत:ला प्रवृत्त करते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

साधक : माताजी, “उत्क्रांत होणाऱ्या ‘प्रकृती’च्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आपली गाठ तिच्या अचेतनेच्या मुग्ध गोपनीयतेशी (dumb secrecy) पडते.” मला (श्रीअरविंदांच्या ‘दिव्य जीवन’मधील) या विधानाचा अर्थ समजला नाही. ही गोपनीयता म्हणजे काय ते सांगाल का?

श्रीमाताजी : …श्रीअरविंद अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आहेत की, जडभौतिकाच्या अगदी गाभ्यामध्ये, आतमध्ये खोलवर ‘ईश्वरी उपस्थिती’ (Divine Presence) दडलेली असते. आणि सर्व वस्तुमात्रांच्याच केंद्रस्थानी असलेल्या या ‘ईश्वरी उपस्थिती’कडे म्हणजे तिच्या उगमाकडे सृष्टी परत वळावी, यासाठी तिची तयारी करणे हे समग्र पार्थिव उत्क्रांतीकडून अपेक्षित आहे. आणि हाच ‘प्रकृती’चा मनोदय आहे.

हे विश्व म्हणजे त्या ‘परमेश्वरा’चे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) आहे, जणू त्याने स्वतःच स्वतःला न्याहाळता यावे, स्वतःला स्वतःचे जीवन जगता यावे, स्वतःच स्वतःला जाणून घ्यावे या हेतुने, स्वतःला स्वतःपासून वेगळे काढून, वस्तुनिष्ठ रूपात आणले असावे. आणि म्हणून तेथे असे एक अस्तित्व असेल, अशी एक चेतना असेल की जी त्या ‘परमेश्वरा’ला स्वतःचा उगमस्रोत म्हणून ओळखू शकेल आणि संभूतीमध्ये (Becoming) त्याचे आविष्करण घडून यावे म्हणून त्याच्याशी सचेतनपणे एकत्व पावेल. याव्यतिरिक्त या विश्वाचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. ही पृथ्वी म्हणजे या वैश्विक जीवनाचे स्फटिकीभवन (crystallization) झालेले एक प्रातिनिधिक रूप आहे, एककेंद्रीकरण झालेली, ती एक छोटी प्रतिकृती आहे; ज्यामुळे, उत्क्रांतीचे कार्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे जाण्याची शक्यता आहे. आपण पृथ्वीचा इतिहास समजावून घेतला की, या विश्वाची निर्मिती का झाली असावी, हे आपल्या लक्षात येते. शाश्वत ‘संभूती’मध्ये (eternal Becoming) ‘परमेश्वर’ स्वतःविषयीच अधिकाधिक जागृत होत आहे आणि निर्मितीचे ‘निर्माणकर्त्या’शी ऐक्य व्हावे हे त्यामधील उद्दिष्ट आहे; ‘आविष्करणा’मध्ये घडून येणारे हे ऐक्य सजग, ऐच्छिक आणि मुक्त असणार आहे.

हे ‘प्रकृती’चे गुपित आहे. ‘प्रकृती’ ही कार्यकारी शक्ती आहे, तीच हे सारे कार्य करत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321)

विचार शलाका – २७

माझी शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी स्वतःला तयार करत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश हा मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या ‘योग’पद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये (श्रीअरविंद व श्रीमाताजी ‘आर्य’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असत.) मांडले आहे. …ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे. वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 225)

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे.

आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे आणि त्या सत्य-तत्त्वाला हे शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; आणि तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)

जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

सद्यस्थितीमध्ये, मानवाचे जीवन हे बुद्धीने शासित केले जात आहे; मनाच्या सर्व कृती, हालचाली त्याला नेहमीच्या उपयोगाच्या अशा आहेत; निरीक्षण व अनुमान ही त्याच्या ज्ञानाची साधने आहेत; तो त्याच्या तर्कबुद्धीच्या आधारे जीवनातील निर्णय घेतो, मार्गाची निवड करतो. किंवा तो तर्कबुद्धीच्या आधारे तो तसे करतो, अशी त्याची समजूत असते.

परन्तु नवीन वंश हा मात्र अंतर्ज्ञानाने, म्हणजेच आंतरिक दिव्य कायद्याच्या थेट बोधाने शासित होईल. ही अंतर्ज्ञानशक्ती काही माणसांना खरंतर माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्याप्रमाणे, मानवाच्या उदयापूर्वी जंगलातील काही ठरावीक अशा मोठ्या गोरिलांना निश्चितपणे तर्कबुद्धीची झलक दिसलेली होती, त्याप्रमाणे काही माणसांना ही अंतर्ज्ञानशक्ती माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्यांनी आपला अंतरात्मा विकसित केलेला आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा खरा कायदा काय, ह्याच्या शोधासाठी आपल्या ऊर्जा एकवटलेल्या आहेत, मानववंशातील अशा अगदी काही मोजक्याच व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची कमीअधिक शक्ती आढळते.

जेव्हा मन पूर्णपणे शांत असते, एखाद्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छ असते, वाराविरहित दिवशी असलेल्या निस्तरंग तळ्याप्रमाणे जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हा, ज्याप्रमाणे, त्या पाण्यामध्ये वरून चांदण्यांचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे अतिमानवाचा, आंतरिक सत्याचा प्रकाश निश्चल मनाला उजळवून टाकतो आणि त्यातून अंतर्ज्ञानाचा उदय होतो. शांतीमधून येणारा हा आवाज ऐकण्याची ज्यांना सवय आहे, अशा व्यक्ती त्याकडे आपल्या कृतींचा प्रेरक प्रारंभ म्हणून पाहतात. जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं बुद्धीच्या जटिल मार्गांवरून इतस्ततः भटकत राहतात, तेव्हा अशा व्यक्ती मात्र अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने, या सरस उपजतप्रेरणेच्या साहाय्याने, जीवनाच्या वळणावळणाच्या मार्गावरून सरळ पुढे जातात; जणूकाही त्यांना सामर्थ्यवान आणि अमोघ अशा हातांकडून मार्गदर्शन मिळत असावे.

ही जी आत्ता अपवादात्मक आणि असामान्य वाटणारी अशी क्षमता आहे, ती उद्याच्या मानवासाठी, येणाऱ्या नवीन प्रजातीसाठी, नूतन वंशासाठी अगदी सर्वसामान्य आणि स्वाभाविक असेल. पण कदाचित त्याचा सातत्यपूर्ण वापर हा बौद्धिक क्षमतांना बाधक ठरू शकेल. ज्याप्रमाणे माकडाकडे असलेल्या आत्यंतिक शारीरिक क्षमता ह्या माणसांमध्ये आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मानवाकडे असलेली आत्यंतिक मानसिक क्षमता, अतिमानवाने गमावलेली असेल.

आजवर मानवाने जे काही विकसित केले आहे, – अगदी त्यामध्ये, जिच्या बद्दल त्याला सार्थ आणि तरीही उगीचच अभिमान असतो अशी बुद्धीदेखील आली; – ते सारे आता त्याला पुरेसे वाटत नाही, असे जाहीर करण्याचे धाडस जेव्हा मानव करेल आणि त्याच्या अंतरंगांत असलेल्या महत्तर शक्ती खुल्या करणे, त्यांचे अनावरण करणे, त्या बाहेर काढणे, हाच जेव्हा त्याचा मोठ्यातला मोठा उद्यम होईल, तेव्हा मानवाचा अतिमानत्वाकडे जाणारा मार्ग खुला होईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 163-64)