Tag Archive for: अहंकार

आध्यात्मिकता ४६

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.

– श्रीमाताजी : Conversations with disciple, July 15, 1964

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

साधनेची मुळाक्षरे – १९

कुटुंब, समाज, देश हे अधिक विस्तारित अहंकार आहेत – ते म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत. व्यक्ती जर ‘ईश्वरी आदेशा’बाबत जागरूक असेल आणि त्यानुसार कार्य करत असेल किंवा स्वतःमध्ये ‘ईश्वरी शक्ती’च कार्यरत आहे अशी जर व्यक्तीला जाणीव असेल तर, कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’ साठी कार्य करत आहे, असे ती व्यक्ती म्हणू शकते; अन्यथा, देश वगैरे म्हणजे जणू देवच, ही मनाची कल्पना असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 438)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)