Tag Archive for: अवतरण

 

शांती किंवा शक्ती शरीरात अवतरित होऊ लागल्यामुळे शरीर ग्रहण-सुलभ होते. तेव्हा काही जणांना शरीर डोलत असल्याचा किंवा शरीरात स्पंदने निर्माण झाल्याची जाणीव होते. शरीराला जेव्हा हे शांतीचे किंवा शक्तीचे अवतरण सवयीचे होऊन जाते तेव्हा त्याचे हे हलणे-डुलणे थांबते. ध्यानाच्या वेळी शांती पूर्णपणे अवतरित होते कारण त्या वेळी श्रीमाताजींप्रति केलेल्या एकाग्रतेमुळे उच्चतर चेतनेची शक्ती खाली अवतरित होते आणि व्यक्ती जर सक्षम असेल तर, ती त्या शक्तीचा स्वीकार करू शकते.

एकदा का त्या शक्तीचे अवतरण सुरू झाले की, सहसा तिचे बळ वाढत जाते आणि त्याबरोबर साधकाची ग्रहणशीलतादेखील वाढत राहते. पुढे ती शक्ती सदा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये अवतरित होऊ शकते आणि अधिकाधिक काळ टिकून राहू शकते. ती स्थिर होईपर्यंत हे असे चालू राहते.

साधकाने मात्र त्याच्या बाजूने एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे, ती शक्ती ग्रहण करण्यासाठी म्हणून त्याने स्वतःची चेतना शक्य तितकी अविचल आणि स्थिर ठेवली पाहिजे. उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद या साऱ्या गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्यांच्या अवतरणासाठी एक प्रकारची उन्मुखता (opening) असली पाहिजे. मनाची अविचलता आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या दिव्य प्रभावाला खुली असणारी एकाग्र क्रियाविरहितता (concentrated passivity) या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 481-482)

 

(ईश्वराचे माध्यम झाल्याचा अनुभव कसा असतो, ते श्रीमाताजींनी विशद केले. त्यानंतर साधक आणि त्यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला आहे… )

साधक : या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही त्यासाठी अभीप्सा बाळगली पाहिजे. ती अवस्था प्राप्त व्हावी असे तुम्हाला वाटले पाहिजे. त्यासाठी तुम्ही अधिकाधिक निःस्वार्थी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला विसरणे किंवा इतरांशी अधिक भलेपणाने वागणे म्हणजे नि:स्वार्थी होणे, असा अर्थ येथे मला अभिप्रेत नाही. तर तुम्ही एक व्यक्ती आहात, एक स्वतंत्र अस्तित्व आहात, इतरांपासून वेगळे, स्वतंत्र असे तुमचे काही अस्तित्व आहे, ही तुमच्यामधली जाणीव हळू हळू कमी होत गेली पाहिजे.

आणि या पेक्षाही एक अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरिक ज्योत, जिला दिव्य प्रकाशाची आवश्यकता जाणवत आहे अशी अभीप्सा! ज्यामुळे तुम्ही एक प्रकारच्या प्रकाशमान उत्साहाने भारले जाता. तेव्हा आत्मदान करावे, केवळ ईश्वरामध्येच जीवन जगावे, त्यामध्ये विलीन व्हावे अशी एक आत्यंतिक ओढ तुम्हाला जाणवू लागते आणि त्या क्षणी तुम्हाला तुमच्या अभीप्सेचा अनुभव येतो. पण तो क्षण मात्र अगदी पूर्णपणे प्रामाणिक आणि शक्य तितका समग्र असला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींची आवश्यकता केवळ डोक्यालाच नव्हे, तर शरीरातल्या सर्व पेशींनादेखील जाणवली पाहिजे. चेतनेला समग्रपणे ही आत्यंतिक ओढ जाणवली पाहिजे.

ही गोष्ट सुरुवातीला अगदी क्षणभर जाणवते, मग क्षीण होते आणि नाहीशी होते. अशा गोष्टी दीर्घ काळ टिकवून ठेवता येत नाहीत. परंतु मग असे होते की, काही क्षणांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी किंवा कालांतराने, अचानकपणे तुम्हाला याच्या बरोबर उलट असा अनुभव येतो. म्हणजे तुम्हाला आरोहण (ascent) जाणवण्याऐवजी आणि आत्ता सांगितले त्याप्रमाणे सर्व गोष्टींची जाणीव होण्याऐवजी तुम्हाला अवतरणाची (Descent) जाणीव होते, म्हणजे ईश्वरी शक्तीकडून प्रतिसाद मिळत आहे, याची तुम्हाला जाणीव होते. अशा वेळी अन्य काहीही शिल्लक राहत नाही, तर फक्त तो प्रतिसादच शिल्लक राहतो. केवळ दिव्य विचार, दिव्य संकल्प, दिव्य ऊर्जा, दिव्य कृती शिल्लक राहते. इतर काहीही शिल्लक राहत नाही. एवढेच नव्हे तर, तिथे तुमचे स्वतंत्र अस्तित्वसुद्धा शिल्लक राहिलेले नसते. म्हणजे, तो तुमच्या अभीप्सेला मिळालेला प्रतिसाद असतो.

कधीकधी ही गोष्ट अगदी त्वरित घडून येऊ शकते. हे अगदीच दुर्मिळ असते, पण असे घडू शकते. तुम्हाला जर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडताना जाणवल्या तर ती अगदी परिपूर्ण अवस्था असते. सहसा आरोहण आणि अवरोहण या क्रिया एका आड एक अशा पद्धतीने घडून येतात. मात्र कधीकधी त्या इतक्या एका पाठोपाठ घडतात की, कालांतराने त्या दोन्ही क्रिया एकमेकींमध्ये मिसळून गेल्यासारख्या होतात आणि मग त्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही.

– श्रीमाताजी (CWM 05 : 56-57)

(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

मस्तकाच्या वर स्थित असणारी शक्ती ही अर्थातच श्रीमाताजींची शक्ती आहे. ती उच्चतर चेतनेची शक्ती आहे आणि ती तिच्या अवतरणासाठीचा मार्ग तयार करत आहे. ही उच्चतर चेतना तिच्यासोबत व्यापकता, अमर्याद अस्तित्व, प्रकाश, शक्ती, शांती, आनंद इत्यादी गोष्टींची जाणीव घेऊन येत असते. ती नेहमीच मस्तकाच्या वरच्या बाजूस असते. जेव्हा आध्यात्मिक शक्तींपैकी कोणती तरी एखादी गोष्ट साधकाच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी खाली अवतरत असते तेव्हा ती शक्ती तेथूनच येत असते. परंतु जोपर्यंत साधकाची तयारी झालेली नसते तोपर्यत शांती, आनंद इत्यादींसारख्या कोणत्याच गोष्टीचे संपूर्ण अवतरण होत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 458)

 

एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन (inner mind) खुले होते; हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते.

मात्र मस्तकामध्ये चेतनेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे येथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती कदाचित स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये (spiritual transcendence) उन्नत होऊन, तेथे जीवन जगण्याऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित सत्याचे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

म्हणून एकदा का मस्तकामध्ये एकाग्रता साध्य झाली की मग मात्र, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित, शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केले पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि सरतेशेवटी, आजवर चेतना ज्या झाकणामुळे शरीरामध्येच बद्ध होऊन राहिली होती, त्या झाकणाच्या पलीकडे ती चढून जाते. आणि मग मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते आणि तेथे ती स्वातंत्र्य अनुभवू लागते. तेथे ती चेतना विश्वात्म्याच्या, दिव्य शांतीच्या, दिव्य प्रकाशाच्या, दिव्य शक्तीच्या, दिव्य ज्ञानाच्या, दिव्य आनंदाच्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येदेखील या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, ती स्वतःच ते होऊन जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 07)

 

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले आहे, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या कल्पना आणि जाणिवा नवजात आंतरात्मिक स्वरूपाच्या आहेत. विचार नाहीसे होत असल्याची आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी ऊर्ध्वमुख होत, डोक्यामधून बाहेर पडून, वर जात असल्याची तुम्हाला जी जाणीव होत होती, ती जाणीव आपल्या साधन-प्रक्रियेचा एक भाग आहे.

तुमच्या वर म्हणजे तुमच्या शरीरात नव्हे, तर तुमच्या मस्तकाच्या वर उच्चतर चेतना असते, तिला आम्ही ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे संबोधतो किंवा तिला ‘श्रीमाताजींची चेतना’ असे आम्ही संबोधतो. जेव्हा तुमचे अस्तित्व खुले होते तेव्हा, तुमच्यामधील सर्व घटक म्हणजे तुमचे मन (मस्तक), तुमचे भावनिक अस्तित्व (हृदय), प्राण, एवढेच नव्हे तर, तुमच्या शारीर-चेतनेमधील काही गोष्टी त्या महत्तर, उच्चतर चेतनेशी जोडल्या जाण्यासाठी म्हणून आरोहण (ascend) करू लागतात. आणि तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे, व्यक्ती डोळे मिटून ध्यानस्थ बसली की मग तिला या आरोहणाचे संवेदन होते. याला ‘कनिष्ठ चेतनेचे आरोहण’ असे म्हटले जाते.

कालांतराने मग वरून शांती, हर्ष, प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान इत्यादी गोष्टींचे अवतरण (descend) व्हायला लागते आणि मग व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये मोठे परिवर्तन घडायला लागते. यालाच आम्ही ‘उच्चतर चेतनेचे अवतरण किंवा ‘श्रीमाताजींच्या चेतनेचे अवतरण ’ असे संबोधतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 384-385)

 

साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?

श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)

 

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे दिसत नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते हानिकारकच ठरले आहे.

प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टींची आवश्यकता असते. कर्माविना प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनानंतर लोकांच्या संपर्कामध्ये आल्यावरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये (खरंच) परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असू दे, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. श्रीमाताजींना अर्पण केली जाणारी आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या शक्तिनिशी केली जाणारी सर्व कर्मं एकसमान (मोलाची) असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

ईश्वराकडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग (short cut) आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, जरी तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जोवर ईश्वरी शक्तीचे अवतरण (descent) घडून येत नाही तोवर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही; आणि तसे झाल्यानंतरही फक्त पायाच तेवढा लवकर रचला जातो; पण नंतर त्यावर ध्यानाद्वारे मोठ्या परिश्रमाने एक भव्य इमारत उभारावी लागते. ध्यान अगदी आवश्यक असते; पण ध्यान हा जवळचा मार्ग आहे असे काही म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि हृदयामध्ये ईश्वरी उपस्थितीची जाणीव व्हावी या दृष्टीने व्यक्तीची तयारी करून घेण्यासाठी होत असते. जे अवतरित होणार आहे ते धारण करता यावे यासाठी आधी मानवी प्रकृतीमधील बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते. व्यक्तीचे मन अक्षम असते; ते सीमित, मर्यादित असते. व्यक्तीच्या हृदयामध्ये आणि इतर घटकांमध्ये पुरेशी विशुद्धता नसते, त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. (यासारख्या अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते.) होणारे अवतरण धारण करण्यासाठी अविचल मन आणि विशुद्ध हृदय यांची आवश्यकता असते.

आणि म्हणूनच ‘क्ष’ या साधिकेला तिच्यामध्ये असलेली अस्वस्थता जाणवत आहे, तिला तिच्या अक्षमतेची जाणीव होत आहे. हा असा अनुभव बहुतेक सगळ्यांनाच येतो. तिला प्रगतीसाठी जर पुढची वाटचाल करायची असेल तर तिने तिच्या मानसिक व भावनिक अस्तित्वामध्ये स्थिरता, शांती, विशुद्धता इत्यादी गोष्टींची आस बाळगली पाहिजे आणि तिच्यामध्ये ज्या गोष्टींचे अवतरण होत आहे त्या गोष्टी स्थिरस्थावर होऊ दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 488)

अचंचल, अविचल मन (quiet mind) ही पहिली पायरी होय, त्यानंतरची खूप पुढची पायरी म्हणजे निश्चल-निरवता (silence). परंतु त्यासाठी (व्यक्तीमध्ये) आधी अविचलता असलीच पाहिजे. ‘अविचल मन’ असे म्हणत असताना, मला अशी एक मानसिक चेतना अभिप्रेत आहे की, ज्या चेतनेमध्ये विचार आत प्रविष्ट होताना दिसतील आणि तेथे ते इतस्ततः वावरताना दिसतील; परंतु आपण स्वतः विचार करत आहोत असे व्यक्तीला वाटणार नाही किंवा ते विचार आपले स्वतःचे आहेत किंवा ते विचार म्हणजेच आपण आहोत असेही त्या व्यक्तीला वाटणार नाही.

एखाद्या शांत प्रदेशामध्ये वाटसरू यावेत, काही काळ तेथे राहून नंतर तेथून निघून जावेत त्याप्रमाणे, मनामध्ये विचारतरंग येतील आणि निघून जातील. अविचल मन त्यांचे निरीक्षण करेल किंवा करणारही नाही, परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये ते सक्रिय होणार नाही किंवा ते स्वतःची अविचलता देखील गमावणार नाही.

निश्चल-निरवतेमध्ये अविचलतेपेक्षा अधिक असे काही असते; आंतरिक मनामधून विचारांना पूर्णपणे हद्दपार करत, त्याला नि:शब्द करून किंवा विचारांना सीमेच्या बाहेरच ठेवून, ही अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते. परंतु वरून होणाऱ्या अवतरणाद्वारे (descent) ही अवस्था अधिक सुलभतेने प्रस्थापित करता येते. ही निश्चल-निरवता वरून खाली अवतरत आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेमध्ये प्रवेश करून, ती तिला व्यापून टाकत आहे किंवा तिला ती कवळून घेत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते, आणि मग ती चेतना स्वतःला विशाल अशा अवैयक्तिक (impersonal) निश्चल-निरवतेमध्ये विलीन करू पाहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 141-142)