Posts

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

प्रश्न : चैत्य व्यक्तिमत्त्वाचा विकास व्यक्तीने कसा घडवावा?

श्रीमाताजी : अनेकानेक जीवनानुभवामधून चैत्य व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते, ते वृद्धिंगत होत असते, विकसित होत असते आणि अंतत: ते एक परिपूर्ण, जागृत आणि मुक्त अस्तित्व बनते. असंख्य जन्मांमधून ही विकासाची प्रक्रिया अथकपणे चालू असते आणि जर व्यक्तीला त्याची जाणीव नसेल तर, ती याचमुळे असत नाही कारण की, व्यक्ती स्वत:च्या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत नसते. – चैत्य अस्तित्वाविषयी जागृत असणे हा अटळ असा आरंभबिंदू असतो.

अंतरंगात वळणे आणि एकाग्र होणे यातून व्यक्तीने स्वत:च्या चैत्य अस्तित्वाच्या जागृत संपर्कात यावयास हवे. चैत्य अस्तित्वाचा प्रभाव नेहमीच बाह्यवर्ती अस्तित्वावर पडत असतो, परंतु हा प्रभाव बहुधा नेहमीच गूढ असतो, तो दिसत नाही, त्याचे आकलन होत नाही, जाणवत नाही; जाणवलाच तर तो अगदी खरोखर अपवादात्मक परिस्थितीत जाणवतो.

हा संपर्क आणि त्याचे साहाय्य बळकट करण्यासाठी आणि शक्य झाल्यास, जागृत चैत्य व्यक्तिमत्त्वाच्या विकसनासाठी, व्यक्तीने एकाग्रतेच्या वेळी लक्ष तिकडे वळविले पाहिजे, त्याला जाणून घेण्याची, संवेद्य करण्याची आस बाळगली पाहिजे; त्याचा प्रभाव स्वीकारण्यासाठी स्वत:ला खुले केले पाहिजे आणि जेव्हा कधी त्याच्यापासून कोणते संकेत, संदेश मिळतील तेव्हा प्रत्येक वेळी ते संदेश अगदी काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.

थोर अभीप्सा बाळगत जीवन जगणे, आंतरिकरित्या शांत बनण्याची, आणि शक्य तितक्या वेळी नेहमीच तसे शांत राहण्याची काळजी घेणे, व्यक्ती ज्या कोणत्या कृती करते त्या प्रत्येक कृतीबाबत परिपूर्ण प्रामाणिकता जोपासणे – या चैत्य पुरुषाच्या अभिवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 221-222)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)

सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि केवळ ईश्वराभिमुख होण्याची इच्छा – ही चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची सर्वाधिक उत्तम साधने आहेत, हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा; शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाशी संपर्क साधायचा आहे अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा विचार करा. जरी तुम्हाला त्यात ताबडतोब यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 363)