मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते. मात्र, बरेचदा मोठी माणसं त्यांना जीवनाचा जो कटू अनुभव आलेला असतो, त्या आधारे मुलांच्या या आदर्शवादी स्वप्नांवर पाणी फिरवतात. पण तसे केल्याने मुलं अशी आदर्शवादी स्वप्नं पाहणेच सोडून देण्याची शक्यता असते. उलट, लहानपणीच्या स्वप्नांना रुजू दिले तर पुढे मोठेपणी ती स्वप्नं कदाचित वास्तवात उतरू शकतात, असा श्रीमाताजींच्या म्हणण्याचा आशय आहे. आणि याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या स्वतःच्या बाबतीतलेच आहे. त्या काय सांगतात ते पाहू, “मी अशा अनेक व्यक्तींच्या संपर्कात आले होते की ज्यांच्यामध्ये जे सखोल व सत्यतर आहे अशाविषयी एक उत्कट आंतरिक आस होती, एक तळमळ होती, परंतु जीवन जगण्यासाठी म्हणून जी धडपड करावी लागते त्यामुळे ते अगदी जखडले गेले होते आणि त्यांचा सगळा वेळ व ऊर्जा त्यामध्येच खर्च होत असे आणि त्यामुळेच ते आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकत नसत. तेव्हा मी खूपच लहान होते. मी तेव्हा नेहमी माझ्या मनाशी म्हणत असे की, जर मला तशी संधी मिळाली तर मी एक लहानसे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. भलेही ते जग अगदी छोटे असेल, परंतु त्या जगातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या व यांसारख्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी दिवसभर गुंतून पडावे लागणार नाही. भौतिक जीवनाच्या गरजांची सारी पूर्तता झाल्यानंतर तरी व्यक्ती अगदी सहजस्वाभाविकपणे तिच्या सर्व ऊर्जा आंतरिक साक्षात्काराकडे आणि दिव्य जीवनाच्या दिशेने वळवू शकते का, हे मला पाहायचे होते. माझ्या जीवनाच्या मध्यावर, मला तशी साधनं देण्यात आली आणि मग मला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळाली. ”
श्रीमाताजींना मिळालेली ही संधी म्हणजे श्रीअरविंद आश्रमाच्या निर्मितीची संधी! या आश्रमातील साधकांना स्वतःच्या भौतिक गरजांबाबत, सुखसुविधांबाबत कोणतीही काळजी करावी लागत नाही आणि ते त्यांचा वेळ ईश्वरोपासना, आत्मसाक्षात्कार आणि श्रीअरविंद- कार्य यासाठी देऊ शकतात, हे आपल्याला माहीत आहे.
- आधारित (CWM 08 : 160-161)






