Tag Archive for: साधना

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

योगमार्गाच्या वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी पुढील तीन गोष्टी अनिवार्य असतात –

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करत राहायचे आणि त्याच वेळी, परिपूर्ण अविचल शांती व समत्व स्थिरावेल असा विजय संपादन करायचा.

• श्रीमाताजी (CWM 14 : 41)

 

कोणत्या गुणामुळे व्यक्ती (योगमार्गासाठी) सुपात्र ठरते किंवा कोणत्या गुणाच्या अभावामुळे ती अपात्र ठरते हे सांगणे तसे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र कामवासना असेल, किंवा तिच्यामध्ये शंकाकुशंका असतील, किंवा तिची वृत्ती बंडखोर असेल आणि असे असूनदेखील तिला अंतिमतः यश मिळू शकते; तर दुसरी एखादी व्यक्ती अपयशी ठरू शकेल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे जर मूलभूत प्रामाणिकपणा असेल, सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्ती असेल आणि मार्गदर्शन घेण्याची त्या व्यक्तीची तयारी असेल, तर साधनेमधील ते सर्वोत्तम संरक्षण ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 33)

फक्त दिव्य सत्याचीच इच्छा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एका अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती म्हणजे ईश्वराने दिलेले कार्य आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे आणि ते ईश्वराला समर्पित करणे म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक असणे. हाच ‘दिव्य जीवना‌’चा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर तिने सातत्याने तशी अभीप्सा बाळगली आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून साध्यासरळ इच्छेने नेहमी आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिचा धावा केला तर, या (दिव्य) चेतनेमध्ये व्यक्ती अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

योगमार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरा प्रामाणिकपणा सामावलेला असतो कारण तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी आणि दिव्य प्रकाशामध्ये उदय पावण्यासाठी धडपडता, कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे मूळ प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 15 : 378)

प्रामाणिकपणा म्हणजे काय? आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या स्तरापर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाभोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

अस्तित्वाच्या विविध घटकांमध्ये परस्परांमध्ये दुफळी असणे हा अप्रामाणिकपणा असतो. तुमचा देह आणि तुमच्या अस्तित्वाचे सत्य या दोहोंमध्ये खोल दरी असणे हा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा या दरीमुळे तुमचे खरे अस्तित्व तुमच्या देहापासून विलग होते तेव्हा प्रकृती ती दरी सर्व प्रकारच्या विरोधी सूचनांच्या मदतीने तत्काळ भरून टाकते. भीती ही त्यातील सर्वात भयानक सूचना असते तर शंका ही त्यातील सर्वात घातक सूचना असते. कोठेही कोणत्याच गोष्टीमुळे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याला नकार न देणे, हा प्रामाणिकपणा असतो.

– श्रीमाताजी (Growing up with the Mother by Tara Jauhar : 165)

 

प्रामाणिकपणामध्ये (sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या संकल्पामध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याची आणि ईश्वराचे साधन बनण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, त्याला त्याच्या अभीप्सेबाबत खरोखरच गांभीर्य असते व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

 

साधक : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नकोय, फक्त ईश्वरच हवा आहे. पण मी जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो किंवा साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेला असतो, तेव्हा साहजिकच मला माझ्या ध्येयाची म्हणजे ईश्वराची आठवण राहत नाही. हा ‘अप्रामाणिकपणा‌’ आहे का?

श्रीमाताजी : होय. हा अप्रामाणिकपणा आहे. ज्यावेळी व्यक्तीच्या एका घटकाला ईश्वर हवा असतो आणि दुसऱ्या घटकाला मात्र निराळेच काहीतरी हवे असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणाच असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक बनते. परंतु इच्छाशक्ती दृढ असेल आणि ईश्वरी कृपेवर संपूर्ण विश्वास असेल तर, हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68)

 

प्रामाणिकपणा ही ईश्वराप्रत जाणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे.
*
प्रामाणिक व्हा. प्रामाणिकपणा हे दिव्यत्वाचे‌ महाद्वार आहे.
*
तुम्ही प्रामाणिक राहा आणि मग जर आवश्यकता पडलीच तर हजार वेळासुद्धा तुमच्या चुका सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक-कवच आहे.
*
साधासरळ प्रामाणिकपणा हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा प्रारंभ असतो.
*
तुमचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता, प्रामाणिक व्हा, म्हणजे असे की, प्रामाणिकपणाला तुमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनवा.
*
पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.
*
प्रामाणिकपणा व निष्ठा हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.
*
जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते व ईश्वराकडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकपणा असतो तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.
*
जेथे प्रामाणिकपणा आणि सदिच्छा असते तेथे ईश्वरी साहाय्यसुद्धा असते.
*
प्रत्येकालाच संधी देण्यात आलेली असते आणि सर्वांसाठी ईश्वरी साहाय्यदेखील उपलब्ध असते. पण प्रत्येकाला त्याचा किती लाभ होणार हे त्याच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 68, 86)