Tag Archive for: साधना

 

साधक : अहंभावात्मक व अज्ञानी शक्ती आणि श्रीमाताजींची दिव्य शक्ती यामध्ये एखाद्या साधकाला जर पूर्णतः फरक करता येत नसेल आणि तो कनिष्ठ शक्तींना नकार देऊ शकत नसेल, तर त्या साधकाची अवस्था कशी होईल? त्या साधकाने योगमार्गाचा अवलंब करण्यासाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे?

श्रीअरविंद : कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीलाच दिव्य शक्ती आणि अदिव्य व कनिष्ठ शक्तींमध्ये पूर्णपणे फरक करू शकत नाही किंवा त्या कनिष्ठ शक्तींना लगेचच पूर्णपणे नकारही देऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण यश येईपर्यंत त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणे, ही गोष्ट अनिवार्य असते. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगी संपूर्ण प्रामाणिकपणा असतो तोपर्यंत ईश्वरी कृपा निश्चितपणे व्यक्तीसोबत असते आणि ती कृपा त्या व्यक्तीला योगमार्गावर प्रत्येक क्षणी साहाय्य करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 225)

साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे हजार मार्ग असतात. मग अशा वेळी व्यक्तीने तिचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : सावकाशपणे करायचे हे एक दीर्घकालीन कार्य आहे. व्यक्तीमध्ये जर परिपूर्ण प्रामाणिकपणा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने सतत सावध असणे आणि सतत जागता पहारा ठेवणे आवश्यक असते; त्यासाठी तिने स्वतःच्या भावभावना-तरंगांचे आणि प्राणिक प्रतिक्रियांचे निरीक्षण करत राहिले पाहिजे; स्वतःच्या दुर्बलतेची कोडकौतुकं करण्याच्या नादात त्या गोष्टींकडे कधीच डोळेझाक करता कामा नये. (पण एवढी सतर्कता बाळगूनही) जेव्हा कधी एखादी चूक तिच्या हातून घडेल तेव्हा, मग भलेही ती चूक कितीही लहानशी असली तरीपण, प्रत्येक वेळी त्या चुकीसाठी व्यक्तीने स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. व्यक्ती असे जर सातत्याने करत राहिली तर, ही गोष्ट खूपच स्वारस्यपूर्ण होते आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक सोपी होत जाते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 295–296)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

(जीवनाच्या रूपांतरणासाठी खुलेपणा कसा आवश्यक आहे ते कालच्या भागात आपण पाहिले. आणि या रूपांतरणासाठी खुलेपणाबरोबरच अभीप्सा आणि नकार या दोन गोष्टी किती मोलाच्या आहेत, हे येथे श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्ही जे जाणता असे तुम्हाला वाटते त्या गोष्टींवर अडून राहणे; तुम्हाला जे संवेदित होते, तुम्हाला जे आवडते त्यालाच चिकटून राहणे; तुमच्या सवयींना आणि तथाकथित गरजांना धरून राहणे; हे जग आत्ता जसे आहे तशा त्या जगाशीच संबंधित राहणे; हे चिकटून राहणेच (to cling) तुमचे हातपाय जखडून टाकते. या सर्व गोष्टींचे बंध तुम्ही एकेक करून सोडून दिले पाहिजेत. सर्व बंधने तुम्ही मोकळी केली पाहिजेत. हे आत्तापर्यंत अनेकदा सांगितले गेले आहे पण लोकं त्याच त्याच गोष्टी कुरवाळत राहतात.

…अगदी अशी माणसे असतात की जी अतिशय वाक्चतुर असतात, जी इतरांना शिकवण देतात, अशी माणसेदेखील कशाला ना कशाला तरी चिकटून असतात. ती त्यांच्या दृष्टिकोनाला, त्यांच्या भावनापद्धतींना चिकटून असतात. त्यांना ज्या पद्धतीने प्रगती करण्याची सवय लागलेली असते त्या पद्धतीला ती माणसे चिकटून राहतात. त्यांच्या दृष्टीने प्रगती करण्याची त्यांची सवय हीच जणू काही एकमेव पद्धत असते.

तुमच्यावर कोणतेही बंध असता कामा नयेत. तुम्ही अगदी मुक्त असले पाहिजे…अगदी मुक्त! अभीप्सेव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टीत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेहमीच सज्ज असले पाहिजे.

आपल्याला परिपूर्णते‌ची, दिव्य प्रकाशा‌ची, दिव्य प्रेमा‌ची, सत्याची आवश्यकता असली पाहिजे. आपल्याला परम परिपूर्णत्व‌ मिळवायचे आहे. तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे, आस लागली पाहिजे…

फक्त परमेश्वरच तुमची ही आस पूर्ण करू शकतो.

पुढे चालत राहा, वाटचाल करत राहा.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

 

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलून, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) ताकदीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती ताकद ही कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो कारण तिच्यामुळे तुम्हाला तात्काळ परिणामांची चव चाखता येते. कर्म चांगले करण्याच्या आपल्या पहिल्या उत्साहाच्या आणि उत्सुकतेच्या भरात, त्या ताकदीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र त्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे व प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष, अंतरात्मा (Psychic Being) पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण असेल किंवा प्रेरणेमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन साधना केली जात असेल किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची ऊर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य पुरुष मुक्त होणार नाही किंवा तो जर मुक्त झालाच तर तो अंशत:च किंवा काही काळासाठीच मुक्त होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण तो प्राणिक कृतींनी झाकला गेलेला असेल. आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, साधनेमध्ये फक्त मनच पुढाकार घेत असेल आणि अंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया अंतरात्मिक रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते. शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाची किंवा मागणीची ज्यामध्ये भेसळ झालेली नाही अशी निरहंकारी आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)