Tag Archive for: साधना

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्राचा हा अंशभाग…)
‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि ‘ईश्वर’ हीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, तिच्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, ‘योगमार्गा’मधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या ‘योगा’कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि स्थायी झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळ्यांनी भरलेली असली, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असली आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असला तरीसुद्धा, त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.

…तर्क आणि सामान्य जाणीव यांच्याशी सुसंगत असणारी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे – ती अशी की, जर ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या ‘मार्गा’ची हाक दिली आहे आणि ती आलेली आहे हे निश्चित, तर मग या सगळ्या पाठीमागे ईश्वरी मार्गदर्शन असेल आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणींमधून पार होऊन सुद्धा, किंवा त्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही या मार्गावर येऊन पोहोचालच. अपयशाची आशंका व्यक्त करणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या उतावळ्या, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. मोठमोठ्या अडचणी आहेत आणि त्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता नाही किंवा ‘ईश्वरा’ने आजवर स्वतःला कधीही प्रकट केले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा म्हणण्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. उलट, ज्यांनी ज्यांनी आपले मन हे एका अतिशय महान आणि अवघड ध्येयावर केंद्रित केलेले असते, अशा लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा अशी भूमिका घ्या की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन आणि मग भले कितीही अडचणी येवोत, मी यशस्वी होईनच होईन.” यामध्ये ईश्वरनिष्ठ मनुष्य अजून एक भर घालतो, ती अशी की, ”ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर का तो अस्तित्वात आहेच तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये कधीही अपयश येऊ शकणार नाही. मला जोवर तो गवसत नाही, तोवर कितीही दुःखसंकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93-94)

साधनेची मुळाक्षरे – १६

जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांना हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की, तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ‘’ही परिस्थिती खूपच कठीण आहे,’’ असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, ”माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही;” तर ते योग्य आहे.

आणि मग ‘ईश्वरी दिव्यकृपा’ तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करू लागता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. ‘दिव्य कृपे’बद्दलच्या पूर्ण विश्वासामधून जे हास्य उमलते, तशाच हसतमुखाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

साधनेची मुळाक्षरे – १५

तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी तिला तुमच्या प्रयत्नांची नव्हे तर, तुमच्या अस्तित्वाने दिलेल्या सहमतीची आवश्यकता असते.

*

‘श्रीमाताजीं’प्रत स्वत:ला उन्मुख ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि अन्य सर्व प्रभावांना नकार देत, श्रीमाताजींच्या ‘शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या – हा या (पूर्ण)योगाचा नियम आहे.

*

‘श्रीमाताजीं’समोर आंतरात्मिकरित्या उन्मुख राहिल्याने, कार्यासाठी वा साधनेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व क्रमश: विकसित होत जाते, महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 721), (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)

साधनेची मुळाक्षरे – १४

संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास सक्षम होणे असा त्याचा अर्थ आहे.

*

‘श्रीमाताजीं’प्रत उन्मुख असणे म्हणजे सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे, त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये करू देणे, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करू देणे, तुम्हाला ज्ञान, शांती आणि ‘आनंद’ प्रदान करू देणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले राखू शकत नसाल तर, उन्मुख होण्यासाठी तुम्ही सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.

*

उन्मुखतेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समर्पण; पण जोपर्यंत समर्पण झालेले नाही तोवर, अभीप्सा आणि स्थिरता यांद्वारे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उन्मुखता येऊ शकते.

*

तुमच्या चेतनेची जेव्हा तयारी होईल तेव्हा ‘श्रीमाताजीं’प्रति असलेल्या विश्वासामुळे, आवश्यक असणारे खुलेपण येईल. ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचे नियोजन करण्यास काहीच हरकत नाही, पण जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्यासाठी केवळ ध्यान पुरेसे नाही. तर तेथे ‘श्रीमाताजीं’प्रति असणारी उन्मुखता आणि श्रद्धा आवश्यक आहे; त्यामुळेच ती गोष्ट प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 105), (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 106), (CWSA 29 : 109)

साधनेची मुळाक्षरे – १३

तुमच्यामध्ये ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीचे कार्य कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे यासाठी श्रीमाताजींकडे वळलेले असणे म्हणजे उन्मुख असणे, खुले असणे. मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि जर का त्याने ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ आणण्यास श्रीमाताजींना नकार दिला; जर प्राण त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती – जी खरी प्रेरणा आणि आवेग घेऊन येत असते – तिला प्राणाने प्रवेश करू दिला नाही; जर शरीर त्याच्या स्वतःच्या इच्छा, सवयी आणि जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने संमती दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख असत नाही. एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया उन्मुखता आढळणे शक्य नाही, परंतु प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा किंवा संकल्पशक्ती असली पाहिजे, उरलेल्या साऱ्या गोष्टी क्रमशः होत राहतील.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151)

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

साधनेची मुळाक्षरे – ११

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर, प्रतिमेवर किंवा नामावर, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी म्हणून आणि त्यांनी आपले मन, प्राण व कर्म यांचे नियंत्रण करावे म्हणून अभीप्सा बाळगणे.

परंतु मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रथम प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 225-226)

साधनेची मुळाक्षरे – १०

…हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, शांतता याच गोष्टी नव्हेत तर प्रकाश, शक्ती, ज्ञान, उच्चतर दृष्टी आणि विचार, आनंद या साऱ्याच गोष्टी वरून येतात. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या अंतरंगातून येणेसुद्धा शक्य असते; परंतु ते यामुळे शक्य होते कारण चैत्य पुरुष त्यांच्याप्रत थेटपणे खुला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, अस्तित्वाच्या इतर साऱ्या अंगांमध्येदेखील त्या स्वतःला प्रकट करतात. अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे योगसिद्धीचे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या योगामध्ये ‘उन्मुखते’ वर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो – आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, खुलेपण – या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य आहेत.
– श्रीअरविंद
(CWSA 30 : 324)

साधनेची मुळाक्षरे – ०९

(अहंभावात्मक मानसिक कल्पना, धारणा यांची व्यर्थता स्पष्ट करताना श्रीअरविंद एका साधकाला उद्देशून लिहितात…)
दिव्य मातेच्या हाती तुम्ही तुमचे आत्मदान मुक्तपणे आणि सहजसाधेपणाने कधीच केलेले नाही, तुम्ही कधीच खरेखुरे समर्पण केलेले नाही. आणि अतिमानसिक ‘योगा’मध्ये यशस्वी होण्याचा तोच तर एकमेव मार्ग आहे. ‘योगी’ बनणे, ‘संन्यासी’ बनणे किंवा ‘तपस्वी’ बनणे हे येथील योगाचे उद्दिष्ट नाही. रूपांतरण हे उद्दिष्ट आहे, आणि तुमच्या स्वतःपेक्षा अनंतपटीने महान असणाऱ्या शक्तिद्वारेच हे रूपांतरण घडणे शक्य असते; खरोखर ‘दिव्य माते’चे जणू बालक झाल्यानेच केवळ हे रूपांतरण शक्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 143)

साधनेची मुळाक्षरे – ०८

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च त्याच्या ‘शक्ति’द्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’ने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

‘योगा’मध्ये ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’देखील असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांच्यावर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच.

हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिवृत्तींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांचा त्याग, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांचा त्याग, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात प्रकाश, शक्ती आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपल्याजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक स्पंदनाचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)