Tag Archive for: साधना

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

नैराश्यापासून सुटका – २३

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमची ही अडचण अविश्वास आणि अवज्ञेतूनच आलेली दिसते. कारण अविश्वास आणि अवज्ञा (distrust and disobedience) या गोष्टी मिथ्यत्वासारख्याच असतात. (त्या स्वतःही मिथ्या असतात आणि मिथ्या कल्पना व आवेगांवर आधारित असतात.) त्या ‘ईश्वरी शक्ती‌’च्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतात. त्या गोष्टी व्यक्तीला ईश्वरी शक्तीची जाणीव होऊ देत नाहीत; तसेच ईश्वरी शक्तीचे व्यक्तीमध्ये जे कार्य चालू असते ते पूर्ण करण्यामध्ये त्या गोष्टी आडकाठी आणतात आणि त्यांच्यामुळे (तुम्हाला लाभलेली) ईश्वरी संरक्षणा‌ची शक्ती क्षीण होते.

फक्त आंतरिक एकाग्रतेच्या वेळीच नव्हे तर, तुमच्या बाह्य कृती आणि जीवनव्यवहार यांमध्येही तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही जर तसे केलेत आणि सारेकाही श्रीमाताजींच्या मार्गदर्शनानुसार केलेत तर, अडचणी कमी कमी होत चालल्या आहेत किंवा त्या अधिक सहजतेने सुटत चालल्या आहेत आणि गोष्टी अधिक सुरळीत होत चालल्या आहेत, असे तुम्हाला आढळून येईल.

तुम्ही एकाग्रचित्त होण्याच्या वेळी जे काही करता तेच तुम्ही तुमच्या कर्मामध्ये आणि कृतींमध्येही केले पाहिजे. श्रीमाताजींप्रति खुले व्हा, तुमच्या सर्व कृती त्यांच्या मार्गदर्शनानुसार करा; शांती, साहाय्यक शक्ती‌, संरक्षण लाभावे यासाठी त्यांना आवाहन करा आणि त्यांना तुमच्यामध्ये कार्य करता यावे म्हणून सर्व चुकीच्या प्रभावांना नकार द्या. (अन्यथा) हे प्रभाव चुकीच्या, निष्काळजी किंवा चेतनारहित गतीविधींद्वारे मार्गामध्ये अडथळा ठरू शकतात. या तत्त्वाचे अनुसरण करा म्हणजे मग तुमचे समग्र अस्तित्व एकसंध होईल आणि मग ते शांती व आश्रयदायी ‘शक्ती‌’ आणि ‘प्रकाश’ यांच्या एकछत्री अंमलाखाली येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 143)

नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

नैराश्यापासून सुटका – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्यामध्ये शक्ती व शांती अवतरित होत आहेत आणि तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी त्या अधिकाधिक कार्य करत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. उदास राहावेसे वाटणे, आनंदी असण्याची भीती वाटणे यांसारख्या भावना, तसेच आपण अक्षम आहोत किंवा अपात्र आहोत अशा सूचना ही प्राणिक रचनेची (vital formation) नेहमीचीच आंदोलने असतात, पण ती आंदोलने म्हणजे तुम्ही नाही (हे ओळखा.) ती तुम्हाला अजमावण्यासाठी किंवा तुमच्यामधील परिवर्तन रोखण्यासाठी निर्माण होत आहेत. या ज्या सूचना येत आहेत त्यांचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा आणि तुम्हाला मुक्त व आनंदी करणाऱ्या तुमच्यामधील ‘सत्या’च्या बाजूने तुम्ही चिकाटीने उभे राहायचे, एवढेच तुम्हाला करायचे आहे. तसे केलेत तर सारे काही ठीक होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180)

नैराश्यापासून सुटका – १८

 

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुमच्या प्राणामधील जो भाग बंड करू इच्छित आहे त्याच्याकडे, त्या बंडाचे समर्थन करण्यासारखी खरंतर कोणतीही कारणं नाहीयेत; त्यामुळे तो अडचणीत सापडल्याची किंवा अपेक्षाभंगाची तीव्र वेदना यांपैकी कोणत्यातरी एका मनोदशेला (mood) कवटाळून बसला आहे. प्राणामधील हा भाग अस्वस्थ, इच्छा-वासनामय, उतावळ्या, उदासीन, चंचल अशा सर्व प्रकारच्या मानवी प्रकृतीमधील एक घटक असतो. त्यापासून स्वतःला वेगळे करा आणि त्याला तुम्ही, तुमच्यावर शासन करण्याची किंवा तुम्हाला संचालित करण्याची मुभा देऊ नका.

प्राणाचा एक सुयोग्य भाग देखील असतो. तो उत्कट असतो, उच्चतर गोष्टींबाबत तो संवेदनशील असतो, त्याच्याकडे महान प्रेमाची आणि भक्तीची क्षमता असते. त्याचा उपयोग केलाच पाहिजे. प्राणाच्या त्या भागाला सामर्थ्यवान बनवा. अंतरात्म्याचा आणि वरून येणाऱ्या शांतीचा व विशालतेचा त्याला आधार द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 142)

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

नैराश्यापासून सुटका – १४

 

उद्वेग, असंतोष यांसारख्या भावावेगांना सावधपणे नकार द्या. अन्यथा त्यातून पुन्हा गोंधळ आणि नैराश्य निर्माण होते. हे भावावेग येण्यापूर्वीच त्यांना परतवून लावणे व्यक्तीला प्रत्येक वेळी जमेलच असे नाही, मात्र मनात ते भावावेग निर्माण झाल्याबरोबर लगेचच व्यक्ती ते काढून टाकू शकते. ते जितके जास्त नाकारले जातील, तितके त्यांचे पुन्हा पुन्हा येणे अवघड होत जाईल. किंवा जर ते भावावेग उत्पन्न झालेच तर, ते अगदी क्षणिक काळासाठीच तुमचा ताबा घेतील आणि नंतर नाहीसे होतील. त्यांना थारा देणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना खरी चेतना झाकोळू देण्याची संधी देण्यासारखे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)