Tag Archive for: साधना

नैराश्यापासून सुटका – ३७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जे काही घडत आहे ते घडणे एक प्रकारे आवश्यकच होते आणि तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ईश्वराला चांगले माहीत आहे, अशी चढतीवाढती श्रद्धा जर तुमच्यामध्ये असेल तर, ही मुळातच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय तुम्ही जर कायम ध्येयाभिमुख राहण्याची इच्छा आणि कितीही अडीअडचणी आल्या किंवा वरकरणी कितीही नकार मिळाले तरी त्या सगळ्यातून तुम्हाला त्या ध्येयाच्या दिशेने नेले जात आहे, असा विश्वास यांची भर त्यामध्ये घातलीत तर, साधनेसाठी यापेक्षा अन्य कोणतेच अधिक चांगले मानसिक अधिष्ठान असू शकणार नाही. तसेच फक्त मानसिकच नव्हे तर, प्राणिक व शारीरिक चेतनेमध्येदेखील (vital and physical consciousness) हीच श्रद्धा बाणवता आली तर, निराशा येणेच एकतर शक्य नाही किंवा ती चेतनेचा भाग नसून, ती बाहेरून लादण्यात आलेली एक बाह्य गोष्ट आहे, हे तुम्हाला इतके स्पष्टपणे जाणवेल की, त्यामुळे निराशा तुमचा अजिबात ताबा घेऊ शकणार नाही.

अशा प्रकारची श्रद्धा असणे हे अतिशय उपयुक्त असे पहिले पाऊल असते. चेतनेच्या ज्या प्रतिक्रमणामुळे (reversal of consciousness) व्यक्ती गोष्टींच्या बाह्यवर्ती दृश्यमान वैशिष्ट्यांकडे पाहण्याऐवजी, त्यांच्या आंतरिक सत्याकडे पाहू लागते, त्या प्रतिक्रमणाच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 195)

नैराश्यापासून सुटका – ३६

(योगमार्गाचे अनुसरण करणाऱ्या साधकाने हास्य-विनोद करता कामा नयेत; किंवा त्याने नेहमी गंभीरच असले पाहिजे; असा काही नियम नाही. मात्र त्याने योगमार्गाचे आचरण गांभीर्यानेच केले पाहिजे, अशा आशयाचे काही बोलणे आधी झाले असावे असे दिसते. त्या संदर्भातील एका प्रश्नावर श्रीअरविंद यांनी एका साधकाला दिलेले हे उत्तर…)

हसत-खेळत असणे आणि मजेत राहणे यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे काहीच नाही; उलट, तसे (प्रसन्नचित्त) असणे ही योग्य गोष्ट आहे. संघर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ते प्रगतीसाठी अपरिहार्य नसतात; पण अशी अनेक माणसं असतात की, ज्यांना भांडण-तंट्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे, ते सदानकदा झगडाच करत राहतात. मात्र ते काही फारसे इष्ट नाही.

जसा एक अंधारलेला, झाकोळलेला मार्ग असतो तसाच एक ‘सूर्यप्रकाशित’ मार्गसुद्धा असतो आणि दोहोंपैकी (अर्थातच) सूर्यप्रकाशित मार्ग हा अधिक चांगला असतो. सूर्यप्रकाशित मार्गावरून व्यक्ती श्रीमाताजींवरील संपूर्ण विश्वासाने वाटचाल करत असते. अशा वेळी व्यक्तीला ना कशाचे भय असते, ना कशाचे दुःख! येथेही तळमळ, आस आवश्यकच असते पण प्रकाश, श्रद्धा, विश्वास व हर्ष यांनी परिपूर्ण अशी एक सूर्यप्रकाशित अभीप्सादेखील (sunlit aspiration) असू शकते; आणि जर समजा अडचणी आल्याच तर, त्यांना (त्या अभीप्सेच्या आधारे) हसतमुखाने सामोरे जाणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173)

नैराश्यापासून सुटका – ३५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही कायम प्रसन्न राहावे, असे आम्हाला अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की, अंतरात्म्याच्या आनंदाला आता त्याचा स्वतःचा मार्ग सापडला आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी तो आनंदच (आता तुम्हाला) मार्गप्रवण करेल आणि ध्येयाप्रत घेऊन जाईल, हे निश्चित. एखाद्या साधकामध्ये जेव्हा अशी प्रसन्नता सातत्याने आढळून येते, तेव्हा आम्हाला माहीत असते की, तो साधक त्याच्या अत्यंत कठीण अशा अडचणीमधून बाहेर पडला आहे आणि आता तो सुरक्षित मार्गावरून दृढतापूर्वक वाटचाल करू लागला आहे.

*

चेष्टामस्करी, थट्टा यामधील सुख हे प्राणिक (vital) स्वरूपाचे असते. ते असता कामा नये असे मी म्हणत नाहीये; पण त्यापेक्षाही एक अधिक गभीर अशी प्रसन्नता असते, एक आंतरिक ‘सुखहास्य‌’ असते आणि ते सुखहास्य ही प्रसन्नतेची आध्यात्मिक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 173, 174)

नैराश्यापासून सुटका – ३३

(व्यक्तीमध्ये मनोरचना करण्याचे आणि त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे सामर्थ्य कसे असते, ते श्रीमाताजींनी सविस्तर सांगितले आहे. परंतु मनोरचना करण्याचे उत्तम सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जर विखुरलेले असेल, त्यामध्ये परस्परविरोधी इच्छा-आकांक्षा असतील तर कसे नुकसान होते, तसेच कल्पनाशक्तीवर नियंत्रण कसे ठेवता येते, ते त्या इथे सांगत आहेत…)

मला अशी काही लोकं माहीत आहेत की, ज्यांच्या प्रकृतीमध्ये अगदी दोन विरूद्ध बाजू एकाच वेळी विद्यमान असतात. त्यांच्यामधील त्या बाजू इतक्या परस्परविरोधी असतात की, एक दिवस त्या व्यक्ती अतिशय अद्भुत, प्रकाशमान आणि प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने शक्तिशाली अशा मनोरचना (formation) तयार करू शकतात पण लगेच दुसऱ्याच दिवशी पराभूत, काळोख्या, अंधाऱ्या, विषण्णतायुक्त अशा मनोरचना तयार करतात आणि त्या दोन्ही प्रकारच्या मनोरचना वातावरणात बाहेर पडतात. आणि तो सगळा घटनाक्रम मी पाहू शकत असे.

(मला असे दिसले की) त्यातील एक मनोरचना अतिशय मनोहारी होती आणि ती प्रत्यक्षात येऊ पाहत होती. जेव्हा आता ती मनोहारी मनोरचना प्रत्यक्षात उतरणार होती अगदी नेमक्या त्याच वेळी, त्या मनोरचनेला दुसऱ्या अंधकारमय मनोरचनेने उद्ध्वस्त केले. हे जसे या उदाहरणात छोट्या गोष्टीबाबतीत घडले तसेच जीवनामध्ये मोठ्या गोष्टींबाबतीतही घडून येते.

आणि हे असे का होते? तर व्यक्ती विचार करत असताना स्वतःचे निरीक्षण करत नाही. व्यक्तीला असे खात्रीपूर्वक वाटत असते की, अशा परस्परविरोधी घडामोडींची ती गुलाम आहे. ती व्यक्ती म्हणते, “अरे देवा! आज मला बरे वाटत नाहीये. आज सारे काही उदास उदास वाटतंय.” व्यक्ती असे म्हणत असते कारण तिला असे वाटत असते की, जणू काही ती ज्याबाबत काहीच करू शकत नाही असे ते अटळ दैव आहे.

परंतु व्यक्ती जर दोन पावले मागे उभी राहून पाहील किंवा एक पायरी वर चढेल, तर व्यक्ती या साऱ्या गोष्टी पाहू शकते, त्या गोष्टींना त्यांच्या योग्य त्या स्थानी ठेवू शकते. तसेच व्यक्तीला त्यातील ज्या गोष्टी नको आहेत त्या ती नष्ट करू शकते किंवा त्यांपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकते. स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने या सर्व गोष्टी ती करू शकते. याला ‘कल्पनात्मकता’ (imaginative) असे म्हणतात. व्यक्तीला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि ज्या तिच्या सर्वोच्च अभीप्सेशी सुसंवादी असतात अशाच गोष्टींबाबत ती व्यक्ती कल्पनाशक्ती उपयोगात आणू शकते. यालाच मी व्यक्तीने ‘कल्पनेवर नियंत्रण ठेवणे‌’ असे म्हणते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 388)

नैराश्यापासून सुटका – ३२

(प्रत्येक व्यक्ती नकळतपणे वातावरणामध्ये स्वत:च्या मनोरचना पाठवत असते. त्या मनोरचनांचे विश्व कसे असते याचे वर्णन कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्याचा हा उत्तरार्ध…)

आपण स्वतः विचार करत असताना, स्वतःकडे पाहणे आणि (मनोरचना प्रत्यक्षात कशा येतात यासंबंधी) घटना पाहणे, स्वतःला आविष्कृत करू पाहणाऱ्या या छोट्याछोट्या जिवंत आकृत्यांचे वातावरणामध्ये सातत्याने जे प्रक्षेपण चालू असते, त्याबाबत जागरूक होणे ही प्रबुद्धतेची (wisdom) सुरूवात असते. आपण आपल्यामध्येच जे मानसिक वातावरण बाळगत असतो त्यामधून या मनोरचना बाहेर पडत असतात.

एकदा आपण त्यांच्याकडे पाहू शकलो, त्यांचे निरीक्षण करू लागलो की मग आपल्याला त्यांचे वर्गीकरण करता येते. तसे करता आले की मग, आपल्या उच्चतर संकल्पाशी किंवा आपल्या अभीप्सेशी मिळत्याजुळत्या नसणाऱ्या मनोरचनांना आपण बाजूला सारू शकतो आणि आपल्या प्रगतीसाठी व सुरळीत विकसनासाठी आपल्याला ज्या साहाय्यक होतील केवळ अशाच मनोरचनांना आविष्कृत होण्याच्या मार्गावर प्रगत होण्यासाठी आपण मुभा देऊ शकतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 387)

नैराश्यापासून सुटका – ३१

आपण सदासर्वकाळ मनोमय प्रतिमा, मनोरचना (formation) निर्माण करत असतो. आपल्याही नकळतपणे आपण अशा प्रकारच्या प्रतिमा वातावरणामध्ये पाठवत असतो. मग त्या प्रतिमा, त्या मनोरचना वातावरणात इतस्तत: फिरत राहतात. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्या मनोरचनांना त्यांचे सहचर भेटतात, कधीकधी त्या एकत्रित येतात आणि आनंदाने एकत्र राहू लागतात. कधीकधी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात; तर कधी त्यांच्यामध्ये लढायासुद्धा होतात. कारण बऱ्याचदा या मानसिक प्रतिमांमध्ये इच्छेचा एक लहानसा घटक मिसळलेला असतो आणि तो स्वतःला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग, प्रत्येकजणच तशा मनोरचना वातावरणात पाठविण्याचा प्रयत्न करत राहतो, जेणेकरून ती मनोरचना कृती करू शकेल आणि मग त्या व्यक्तीला हव्या त्यानुसार गोष्टी घडून येऊ शकतील. पण प्रत्येकजणच अशा रितीने वागत असल्याने त्यातून सर्वसाधारणपणे एक गोंधळ निर्माण होतो.

वातावरणातील या सर्व मनोरचना पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर, आपल्याला अगदी आश्चर्यकारक गोष्टी दिसून येतील. युद्धभूमी, मनोलहरी, छोट्या छोट्या मनोमय अस्तित्वांच्या झुंडी जिथे दाटीवाटीने राहत आहेत अशी आश्रयस्थानं, अशा अनेक गोष्टी तिथे तुम्हाला दिसतील. ही मनोमय अस्तित्वं सारखी बाहेर हवेमध्ये फेकली जात असतात आणि ती अस्तित्वं सतत मूर्त रूपात येण्याचा प्रयत्न करत असतात.

या सर्व मनोरचनांमध्ये एक समान प्रवृत्ती आढळून येते आणि ती म्हणजे त्यांना मूर्त रूप धारण करण्याची इच्छा असते, त्यांना शारीरिक रूपामध्ये प्रत्यक्षात येण्याची इच्छा असते आणि या मनोरचना अगणित असल्याने – या सर्व मनोरचना येथे पृथ्वीवर आविष्कृत व्हायच्या असतील तर त्यासाठी येथील जागा अपुरी पडेल इतकी त्यांची संख्या प्रचंड असते – या मनोरचना ढकलाढकली करतात, ढोपरांनी एकमेकांना ढोसतात, त्यांच्याशी सहमत नसलेल्या मनोरचनांना त्या मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात किंवा कधीकधी तर त्या रचना आपापली सैन्यदलंसुद्धा स्थापन करतात आणि चाल करून येतात. काळ आणि अवकाश या दोन्ही ठिकाणी त्या स्वतःसाठी जागा मिळवू पाहतात. या मनोरचनांची संख्या पाहता त्याच्या तुलनेत येथे उपलब्ध असणारी जागा अगदीच अल्पशी असते आणि म्हणून, व्यक्तिशः हे असे होत राहते.

लोकांना हे काही माहीत नसते आणि तरीही लोकं अशा मनोरचना तयार करत राहतात, बहुधा प्रत्येकजणच अशा रचना तयार करत असतो. आणि ते सातत्याने एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर आदळत राहतात, ते कधी आशावादी असतात, ते कधी इच्छावासना बाळगतात, कधी त्यांचा अपेक्षाभंग होतो, तर कधी ते आनंदी असतात, कधी ते हताश होतात, कारण त्यांचे या मनोरचनांवर कोणतेच नियंत्रण नसते किंवा प्रभुत्व नसते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 386-387)

नैराश्यापासून सुटका – ३०

(साधकांनी पत्राच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना श्रीअरविंद पत्रोत्तरे देत असत. परंतु कधीकधी या कामाचा व्याप इतका वाढत असे की, त्यांना स्वतः पत्र लिहिणे अवघड होत असे, अशा वेळी ते आपल्या निकटवर्तीयाला पत्राचा मजकूर तोंडी सांगत असत आणि त्या बरहुकूम तो, संबंधित पत्रलेखकाला पत्रोत्तर पाठवीत असे. येथेही श्रीअरविंद तोंडी मजकूर सांगत असावेत, असे दिसते.)

नाउमेद होणे ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये साधकाने कधीही अडकून पडता कामा नये, असे त्याला सांगा. प्रगती अगदी वेगवान आणि सुकरतेने होत असेल किंवा प्रगतीचा वेग मंद असेल किंवा प्रगती खुंटलेली असेल, तरीही व्यक्तीने नेहमीच स्थिरपणाने वाटचाल करत राहिले पाहिजे. व्यक्ती नेहमीच योग्य वेळी तिच्या ध्येयाप्रत जाऊन पोहोचते. अडीअडचणी आणि अंधकाराचे कालावधी टाळता येण्यासारखे नसतात; त्यांना स्थिरचित्ताने आणि धैर्याने सामोरे जात, त्यांच्या पार जायचे असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 182)

नैराश्यापासून सुटका – २९

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमामध्ये कायमच्या वास्तव्यास येऊ इच्छिणाऱ्या पण परिस्थितीमुळे तसे करणे शक्य होत नसलेल्या एका साधकाला श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

तुमच्यावर निराशेचे, निरुत्साहाचे मळभ कधीही येऊ देऊ नका आणि ‘ईश्वरी कृपे‌’बाबत कधीही अविश्वास बाळगू नका. बाह्यत: कितीही अडचणी असू देत किंवा तुमच्या स्वत:मध्येसुद्धा कोणत्याही दुर्बलता असू देत पण, तुम्ही जर दृढ श्रद्धा आणि अभीप्सा बाळगलीत तर, ती अदृश्य ‘शक्ती‌’ तुम्हाला त्या साऱ्यामधून पार करेल आणि परत येथे (आश्रमात) घेऊन येईल.

तुम्ही विरोधामुळे आणि अडचणींमुळे अगदी खचून गेलात, जरी तुम्ही डळमळीत झालात, तुम्हाला जरी मार्ग खुंटल्यासारखा वाटला तरीसुद्धा तुमची अभीप्सा (मात्र सदोदित) जागती ठेवा. कधी तुमची श्रद्धा झाकोळल्यासारखी झाली तर, अशा वेळी नेहमीच मनाने आणि अंतःकरणातून आमच्याकडे वळा; म्हणजे ते झाकोळलेपण दूर केले जाईल. …पण मार्गावर दृढपणे वाटचाल करत राहा. मग गोष्टी स्वतःहून उलगडत जातील आणि सरतेशेवटी परिस्थिती आंतरिक चैतन्याला शरण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 101)

नैराश्यापासून सुटका – २८

(एका साधकाला ‘सत्या’ची हाक आलेली आहे. त्या मार्गावर वाटचाल करताना त्याची वृत्ती कशी असली पाहिजे हे श्रीअरविंद त्या साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत.)

मनामध्ये शंकाकुशंका आल्या किंवा नैराश्य आले तर असे म्हणावे की, ”ईश्वर माझा पाठीराखा आहे, मला अपयश कसे बरे येईल?” तुम्ही पुरेसे शुद्ध नाही किंवा पात्र नाही अशा सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, “मी अमृतपुत्र आहे आणि स्वत: ईश्वराने माझी निवड केली आहे. मी स्वत:शी व ईश्वराशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे आणि मी तसा प्रामाणिक राहिलो तर विजय निश्चित आहे; अगदी मी पडलो, धडपडलो तरी मी निश्चितपणे पुन्हा उभा राहीन.”

या उच्चतर ध्येयाकडे (सत्याच्या हाकेकडे) पाठ फिरवून, कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करू पाहणाऱ्या सर्व उर्मींना उत्तर द्या की, “माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे ज्यामुळे समाधान होऊ शकेल असे हे सर्वात महान ध्येय आहे, एकमेव ‘सत्य’ आहे; दिव्यत्वाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीमध्ये मला कोणत्याही कसोट्यांना आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने त्या ध्येयापर्यंत पोहोचेनच.”

‘दिव्य प्रकाश आणि दिव्य हाक यांच्याप्रत निष्ठा‌’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 99)

नैराश्यापासून सुटका – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन‌’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.

ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)