Tag Archive for: साधना

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसंचय आणि त्याच्याकडे असणारे अगदी अंतर्ज्ञानदेखील त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नसते. तसेच जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते, हे सुद्धा त्याला माहीत नसते. जोपर्यंत स्वत:मध्ये असलेल्या या ‘आद्या’विषयी (origin) तो जागृत होत नाही तोवर माणसाला विश्वाच्या ‘आद्या’विषयी ज्ञान कसे बरे होईल?

– श्रीमाताजी [CWM 02 : 40]

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व.
*
सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी पेलूशकतो.) पण ती ‘समता’ नव्हे;तर ती ‘तितिक्षा’ असते. सहन करण्याची ही शक्ती समतेची पहिली पायरी आहे किंवा समतेचे पहिले तत्त्व आहे.
*
समता म्हणजे अहंकाराचा अभाव नव्हे तर, इच्छेचा आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समत्व.
*
इतर लोक काय बोलतात किंवा काय सुचवितात याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावित न होण्यास शिकले पाहिजे. खरे संतुलन प्राप्त करून घेण्यासाठी, एक विशिष्ट अशी समता आवश्यक असते. ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130,135,133),(CWSA 31 : 314)

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते.

– श्रीमाताजी
(Conversation with a Disciple, August 9, 1969)

*

समता हा या योगाचा (पूर्णयोगाचा) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समता बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ईश्वरी संकल्पावर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे.मात्र समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. एखाद्या वेळी साधनेतील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडता कामा नयेत. उलट, तुम्ही त्यामागचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही. त्यासाठी व्यक्तीकडे प्रथमतः काय असावयास हवे तर, ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा! आणि हे असे कसे हे मनाला कळले नाही तरीही, ही धारणा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट व्यक्तीला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येऊ शकली नाही, ती गोष्ट तिने संन्यस्त वृत्तीने स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने एका स्थिर समत्वाकडे जाऊन पोहोचले पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या हालचाली कदाचित असू शकतील परंतु तेव्हाही या स्थिर समत्वापासून विचलित होता कामा नये. आणि एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले, की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ अपयश आलेले दिसत असले तरीही, तो ‘ईश्वरी संकल्प’ आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून, त्या अंतिम साक्षात्काराकडेच घेऊन जात आहे, अशी श्रद्धा आपण बाळगली पाहिजे. ही श्रद्धा आपल्याला समत्व प्रदान करेल; आणि ही श्रद्धाच, जे काही घडते ते अंतिम स्वरूपाचे नसून, मार्गावर वाटचाल करत असताना, या सर्व गोष्टींमधून जावेच लागते, या गोष्टीचा स्वीकार करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 91)

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास प्रवृत्त करणे म्हणजे समत्व. आत्म्याची आपल्या अस्तित्वावर सत्ता प्रस्थापित झाल्याचे हे पहिले मर्म आहे. हे समत्व आपल्याला पूर्णतेने साध्य झाले की मग, दिव्य आध्यात्मिक प्रकृतीच्या मूळ भूमिमध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 721)

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात?

श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, अगदी शांत असते, तेव्हा व्यक्तीचा पाया मजबूत असतो आणि मग अशी व्यक्ती मोठ्या संख्येने शक्तींचा स्वीकार करू शकते.

तुमच्यापैकी कोणी आजवर जर आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली असेल तर, उदाहरणार्थ दिव्य आनंदाची शक्ती ग्रहण केली असेल तर, त्याच्या हे अनुभवास आले असेल की, त्याचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तो ते अनुभव साठवून ठेवू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. तो रडू लागतो, ओरडू लागतो, जे काही त्याला प्राप्त झाले आहे ते खर्च करण्यासाठी तो अगदी उतावीळ होऊन जातो. ते करण्यासाठी त्याला हसावे लागते, बोलावे लागते, त्याला हावभाव, हातवारे करावे लागतात अन्यथा तो ती शक्ती राखू शकत नाही, त्याचा कोंडमारा झाल्यासारखे त्याला वाटते. आणि अशा रीतीने हसत राहिल्यामुळे, रडत राहिल्यामुळे, इकडे तिकडे हिंडत राहिल्यामुळे त्याने जे काही प्राप्त केले असते ते, त्या साऱ्या गोष्टी तो गमावून बसतो.

उत्तम संतुलित स्थितीत राहण्यासाठी, जे प्राप्त होत आहे ते आत्मसात करता येण्यासाठी, व्यक्तीने अगदी शांत, अचंचल आणि स्थिर असले पाहिजे. व्यक्तीचा पाया मजबूत असला पाहिजे, आरोग्य उत्तम असले पाहिजे. पाया अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे. ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)