Tag Archive for: साधना

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ६२

उत्स्फूर्त निश्चल-निरव (silent) स्थिती ही (साधनेच्या सुरुवातीच्या काळात) नेहमी एकदमच टिकून राहणे शक्य नसते, पण आंतरिक निश्चल-निरवता नित्य स्वरूपात टिकून राहीपर्यंत ही स्थिती वृद्धिंगत झाली पाहिजे. ही अशी निरवता असते की जी कोणत्याही बाह्य कृतीने विचलित होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर, (कोणत्याही अनिष्ट वृत्तींनी किंवा शक्तींनी) गडबड-गोंधळ करण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ती विचलित होऊ शकत नाही… सरतेशेवटी हीच स्थिती, सर्व आध्यात्मिक अनुभूतींचा आणि कृतींचा आधार म्हणून स्थिर करण्याची आवश्यकता असते. या निश्चल-निरवतेच्या पाठीमागे अंतरंगामध्ये काय चालू आहे हे व्यक्तीला ज्ञात झाले नाही तरी त्यामुळे फारसे काही बिघडत नाही.

कारण योगामध्ये दोन स्थिती असतात. एक स्थिती अशी असते की, जिच्यामध्ये सारे काही निश्चल-निरव असते आणि व्यक्ती बाह्यतः इतरांप्रमाणेच वावरताना दिसत असली, कृती करताना दिसत असली तरी, तिच्यामध्ये कोणताही विचार, भावना, गतीविधी नसते. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये एक नवीनच चेतना (consciousness) सक्रिय झालेली असते. ती स्वतःसोबत ज्ञान, मोद, प्रेम आणि तत्सम इतर आध्यात्मिक भावना आणि आंतरिक कृती घेऊन येते, परंतु असे असून देखील, त्याचवेळी तेथे एक मूलभूत निश्चल-निरवता (silence) किंवा अविचलता (quietude) असते.

आंतरिक अस्तित्वाच्या विकसनासाठी या दोन्हींची आवश्यकता असते. परिपूर्ण निश्चल-निरवतेची म्हणजे तरलता, रिक्तता आणि मुक्ती यांची जी स्थिती असते, ती दुसऱ्या स्थितीची तयारी करून देत असते आणि जेव्हा दुसरी स्थिती येते तेव्हा निश्चल-निरवतेची स्थिती तिला आधार पुरवीत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162-163)

जेव्हा मन निश्चल-निरव (silent) असते तेव्हा तेथे शांती असते आणि ज्या ज्या गोष्टी दिव्य असतात त्या शांतीमध्ये अवतरू शकतात. जेथे मनाचे मनपण शिल्लक उरत नाही तेव्हा, तेथे मनाहून महत्तर असणारा आत्मा असतो.

*

मन निश्चल-निरव होणे, निर्विचार होणे, अचल होणे (still) ही काही अनिष्ट गोष्ट नाही, कारण बरेचदा जेव्हा मन अशा रितीने निरव होते तेव्हा, ऊर्ध्वस्थित व्यापक शांतीचे पूर्ण अवतरण घडून येते आणि त्या तशा व्यापक अचलतेमध्ये मनाच्या वर असणाऱ्या शांत ‘आत्म्या’चा साक्षात्कार त्याच्या विशालतेसह सर्वत्र पसरतो.

एवढेच की, शांती आणि मानसिक निश्चल-निरवता जेव्हा तेथे असते तेव्हा प्राणिक मन (vital mind) घाईने आत शिरून, ती जागा व्यापून टाकण्याची धडपड करते किंवा मग त्याच उद्देशाने, यांत्रिक मन (mechanical mind) स्वतःच्या क्षुल्लक सवयींचे विचार-चक्र पुन्हा एकदा वर काढण्याचा प्रयत्न करते.

अशा वेळी साधकाने काय केले पाहिजे? तर, या बाहेरच्यांना नकार देण्याबाबत आणि त्यांना गप्प करण्याबाबत साधकाने सतर्क असले पाहिजे, म्हणजे मग निदान ध्यानाच्या वेळी तरी मन व प्राणाची शांती आणि अविचलता टिकून राहील. तुम्ही जर एक दृढ आणि शांत संकल्प बाळगू शकलात तर हे उत्तम रितीने करता येऊ शकते.

हा संकल्प, मनाच्या पाठीमागे असणाऱ्या ‘पुरुषा‌’चा संकल्प असतो. मन जेव्हा शांतिपूर्ण अवस्थेत असते, ते जेव्हा निश्चल-निरव असते तेव्हा व्यक्तीला या (सक्रिय) ‘पुरुषा‌’ची, तसेच प्रकृतीच्या कार्यापासून अलग असलेल्या अक्रिय ‘पुरुषा’चीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162 & 160)

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)

रिक्त मन (vacant mind) आणि स्थिर मन (calm mind) यामध्ये फरक आहे. तो असा की, मन जेव्हा रिक्त असते तेव्हा त्यामध्ये कोणताही विचार नसतो, धारणा नसते, कोणत्याच प्रकारची कोणतीही मानसिक कृती तेथे नसते, कोणत्याही रचलेल्या कल्पना नसतात, तर गोष्टींचा एक मूलभूत बोध तेथे असतो. मात्र स्थिर मनामध्ये, मानसिक अस्तित्वाचे द्रव्य (substance) स्थिर झालेले असते; ते इतके स्थिर झालेले असते की त्यास कोणीही विचलित करू शकत नाही.

काही विचार आलेच किंवा काही कृती उदयाला आल्याच तर, त्या आता मनामधून उगम पावलेल्या नसतात; त्या बाहेरून आलेल्या असतात आणि निर्वात हवेमध्ये आकाशामधून पक्ष्यांचा थवा इकडून तिकडे भरारी घेऊन जावा त्याप्रमाणे ते विचार किंवा कृती मनामध्ये प्रवेश करतात आणि तशाच बाहेर निघून जातात. या गोष्टी (स्थिर) मनात फक्त येऊन जातात, त्या कशालाही धक्का लावत नाहीत किंवा त्या स्वतःची कोणती खूणही मागे सोडून जात नाहीत. अशा मनामध्ये अगदी हजारो प्रतिमा तरळून गेल्या किंवा प्रचंड उलथापालथ झाल्याच्या घटना जरी मनासमोरून तरळून गेल्या तरी ही स्थिर-अचलता तशीच टिकून राहते, जणू काही त्या मनाचा पोतच शाश्वत आणि अविनाशी शांतीच्या द्रव्याचा बनलेला असतो.

अशा प्रकारची स्थिरता प्राप्त झालेल्या मनाकडून कर्म करायला सुरुवात केली जाऊ शकते, अगदी अविरतपणे आणि जोरकसपणेही त्या कर्माचा प्रारंभ केला जाऊ शकतो, परंतु त्या परिस्थितीमध्येदेखील असे मन स्वतःची मूलभूत स्थिरता टिकवून ठेवते. (आता) त्या कर्माचा उगम हा त्या मनामधून होत नसतो तर असे मन फक्त, जे ऊर्ध्वस्थित आहे ते त्याच्याकडून ग्रहण करत असते आणि त्यामध्ये स्वतःचे असे काही न मिसळता, स्थिरचित्ताने, निरपेक्षपणे, पण तरीही सत्याच्या आनंदानिशी, त्यांना मानसिक रूप देत असते. मनाच्या माध्यमातून पुढे जात असताना त्या मार्गाचा प्रकाश आणि आनंदी शक्तीदेखील त्याच्या सोबत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

अचंचल, अविचल मन (quiet mind) ही पहिली पायरी होय, त्यानंतरची खूप पुढची पायरी म्हणजे निश्चल-निरवता (silence). परंतु त्यासाठी (व्यक्तीमध्ये) आधी अविचलता असलीच पाहिजे. ‘अविचल मन’ असे म्हणत असताना, मला अशी एक मानसिक चेतना अभिप्रेत आहे की, ज्या चेतनेमध्ये विचार आत प्रविष्ट होताना दिसतील आणि तेथे ते इतस्ततः वावरताना दिसतील; परंतु आपण स्वतः विचार करत आहोत असे व्यक्तीला वाटणार नाही किंवा ते विचार आपले स्वतःचे आहेत किंवा ते विचार म्हणजेच आपण आहोत असेही त्या व्यक्तीला वाटणार नाही.

एखाद्या शांत प्रदेशामध्ये वाटसरू यावेत, काही काळ तेथे राहून नंतर तेथून निघून जावेत त्याप्रमाणे, मनामध्ये विचारतरंग येतील आणि निघून जातील. अविचल मन त्यांचे निरीक्षण करेल किंवा करणारही नाही, परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये ते सक्रिय होणार नाही किंवा ते स्वतःची अविचलता देखील गमावणार नाही.

निश्चल-निरवतेमध्ये अविचलतेपेक्षा अधिक असे काही असते; आंतरिक मनामधून विचारांना पूर्णपणे हद्दपार करत, त्याला नि:शब्द करून किंवा विचारांना सीमेच्या बाहेरच ठेवून, ही अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते. परंतु वरून होणाऱ्या अवतरणाद्वारे (descent) ही अवस्था अधिक सुलभतेने प्रस्थापित करता येते. ही निश्चल-निरवता वरून खाली अवतरत आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेमध्ये प्रवेश करून, ती तिला व्यापून टाकत आहे किंवा तिला ती कवळून घेत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते, आणि मग ती चेतना स्वतःला विशाल अशा अवैयक्तिक (impersonal) निश्चल-निरवतेमध्ये विलीन करू पाहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 141-142)

अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरा‌पासून, स्वतःपासून किंवा सद्गुरू‌पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वर‌प्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)