Tag Archive for: साधना

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आध्यात्मिक अनुभव यावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. त्यासाठी तुमची अजून तयारी झालेली नाही. आणि त्यामुळे योग्य अनुभव येण्याऐवजी अन्य काहीतरी भलतेच अनुभवास येईल. तुम्ही तुमचा प्राण शुद्ध आणि शांत केला पाहिजे म्हणजे मग या अशा प्रकारच्या गतिप्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. झोपायचे नाही, जेवायचेच नाही असले काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा प्राण काहीतरी असामान्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्यामुळे साधना वेगाने घडेल अशी त्याची कल्पना आहे. आणि तो काहीतरी उच्च दर्जाचे करत आहे असेही तुमच्या प्राणाला वाटत आहे. (तुम्ही असे वागता कामा नये कारण) पूर्णयोगासाठी विशुद्ध, साधासरळ, शांत आणि समतोल प्राण आवश्यक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 34)

असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते.” पण मला तरी हा सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही. कारण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो.

या देहाद्वारेच (वासनामुक्तीची) ही समस्या जर सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने साधेपणाने, पूर्णपणे, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्ती‌प्रत, परमोच्च अस्तित्वा‌प्रत स्वतःला समर्पित केले; त्याच्या हाती, स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाला सर्व अंगांनिशी संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग असतो. लोकं म्हणतील की, तो मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु तेथे किमान एक प्रकारची आत्मीयता तरी आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान असते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (Positive way) असे म्हणते. स्वत:च्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता, स्व-केंद्रित न होता, स्वत:शी काहीही निगडित न करता; सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्येच निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

(उत्तरार्ध)

आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित होऊ दिले पाहिजे आणि मग तुम्हाला असे आढळेल की तिथे सुसंवादी, प्रकाशमान, सूर्यप्रकाशित हास्याचा जणू झरा वाहत आहे आणि त्याच्यापुढे कोणत्याही सावटाला किंवा दुःखवेदनेला थाराच उरत नाही. वास्तविक, अगदी कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठी दुःखं असू देत किंवा कितीही भयंकर शारीरिक वेदना असू देत, तुम्ही जर त्यांच्याकडे तेथून, त्या दृष्टिकोनातून पाहू शकलात, तर तुम्हाला त्या अडचणीची, त्या दुःखाची, त्या वेदनेची असत्यता दिसून येईल आणि तिथे अन्य काही नाही, तर केवळ एक हर्षभरित आणि प्रकाशमय स्पंदन असल्याचे आढळून येईल.

खरेतर, अडचणींचे निराकरण करण्याचा, दुःखाचा परिहार करण्याचा आणि वेदना नाहीशी करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. यातील पहिल्या दोन गोष्टी (अडचणींचे निराकरण, दुःखाचा परिहार) या तुलनेने सोप्या आहेत. पण शारीरिक वेदना नाहीशी करणे ही गोष्ट काहीशी अधिक कठीण आहे. कारण देह आणि त्याच्या जाणिवा या अत्यंत खऱ्या व मूर्त असतात असे मानण्याची आपल्याला सवय लागलेली असते. परंतु आपला देह हा एक द्रव आहे; तो घडणसुलभ (plastic) आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो वर्धनशील आहे असे समजण्याची आपल्याला सवय नसते. कारण ते आपण शिकलेलो नसतो इतकेच. सर्व अंधकार, सर्व अडीअडचणी, सर्व ताणतणाव, सर्व विसंवाद नाहीसे करणारे हे जे प्रकाशमान हास्य असते, आडकाठी निर्माण करणाऱ्या, शोक आणि विलाप करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निरास करणारे, हे जे प्रकाशमान हास्य असते ते हास्य शरीरामध्ये उतरविण्यास आपण शिकलेलो नसतो.

आणि हा सूर्य, दिव्य हास्याचा हा सूर्य, प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतो. तो त्या सर्व गोष्टींमागील सत्य असतो. हा आंतरिक सूर्य कसा पाहायचा, तो कसा अनुभवायचा आणि तो कसा जगायचा हे आपण शिकलेच पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 10 : 156)

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती कोणत्याही क्षमतेपेक्षा अधिक मूलभूत महत्त्वाची व अधिक परिणामकारक असते.

आंतरिक हाक, आंतरिक अनुभूती येण्यासाठी आणि आंतरिक उपस्थितीची जाणीव होण्यासाठी बहिर्मुख न राहता, चेतना अंतरंगामध्ये वळविणे हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 55)

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!

*

खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.

*

विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 153)

आपल्या ‘मी’ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये खरी विनम्रता सामावलेली असते.
*
विनम्र असणे म्हणजे, ईश्वरा‌विना आपल्याला काहीच कळत नाही, आपण कोणीच नाही आणि त्याविना आपण काहीही करू शकत नाही हे मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे. ईश्वरा‌विना आपण अक्षम आहोत, आपण म्हणजे जणू अज्ञान व गोंधळ आाहोत; आपण कोणीच नाही हे आपल्या मन, प्राण आणि शरीर यांनी कधीही न विसरणे म्हणजे विनम्र असणे. केवळ ईश्वर हाच सत्य असतो. तोच जीवन, शक्ती, प्रेम आणि आनंद असतो.

आणि म्हणून, मन, प्राण व शरीर यांनी एकदाच आणि कायमसाठी हे शिकले पाहिजे, अनुभवले पाहिजे की, ईश्वराला समजून घेण्यास आणि त्याचे मूल्यमापन करण्यास ते (मन, प्राण आणि शरीर) सर्वथा अक्षम आहेत; ईश्वराच्या केवळ सारतत्त्वाला जाणून घेण्यात नव्हे तर, त्याला त्याच्या कृतीमध्ये आणि आविष्करणामध्ये जाणून घेण्यातही ते अक्षम आहेत, (याची त्यांना जाणीव असणे) हीच खरी विनम्रता होय. या विनम्रतेसोबत अविचलता आणि शांती येते. सर्व विरोधी हल्ल्यांपासून संरक्षण करणारे खात्रीशीर चिलखत हेच असते.

खरंच, शत्रू नेहमी मनुष्यामधील गर्वाचे दारच ठोठावत राहतो, कारण हे गर्वाचे दारच शत्रुला आत शिरकाव करण्याची संधी देते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 152-153)

 

तुमच्यापैकी बहुतेक जण तुमच्या व्यक्तित्वाच्या पृष्ठस्तरावर जीवन जगत असता आणि त्यामुळे तुमच्यावर बाह्य प्रभावांचा सहज परिणाम होतो. तुम्ही जणू तुमच्या स्वतःच्या शरीराबाहेर प्रक्षेपित (projected) होऊन, जीवन जगत असता आणि तशाच तऱ्हेने प्रक्षेपित झालेला दुसरा कोणी त्रासदायक माणूस तुम्हाला भेटला की तुम्ही अस्वस्थ होता. हा सगळा त्रास उद्भवतो कारण तुम्हाला दोन पावलं मागे घेण्याची, अंतरंगात वळण्याची (stepping back) सवय नसते.

तुम्ही नेहमी स्वतःमध्ये, स्वतःच्या आतमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर जाण्यास शिकले पाहिजे. अंतरंगामध्ये प्रवेश करा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित व्हाल. तुम्ही बाह्य जगामध्ये वावरत असणाऱ्या वरकरणी शक्तींच्या आहारी जाऊ नका. अगदी जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याच्या घाईगडबडीत असता तेव्हासुद्धा क्षणभर अंतरंगात वळा आणि मग तुमचे तेच काम किती लवकर आणि किती चांगल्या रितीने करता येते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्यावर जर कोणी रागावले तर, त्याच्या त्या रागाच्या स्पंदनांचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका; केवळ अंतरंगामध्ये वळा म्हणजे मग त्या व्यक्तीच्या रागाला कोणताही आधार न मिळाल्यामुळे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे, तिचा राग मावळून जाईल. कायम शांती बाळगा, तिचा भंग करणाऱ्या साऱ्या प्रलोभनकारी आवेगांचा प्रतिकार करा.

अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय एक शब्ददेखील बोलू नका. अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय घाईगडबडीने कोणतीच कृती करू नका.

सामान्य जगाशी संबंधित असणारे सारेकाही अस्थायी आणि क्षणभंगुर असते आणि त्यामुळे त्यामध्ये अस्वस्थ होण्यासारखे काहीच नसते. जे टिकाऊ आहे, जे शाश्वत आहे, जे अमर्त्य आणि अनंत आहे तेच खरेतर प्राप्त करण्यायोग्य असते, तेच विजय प्राप्त करून घेण्यायोग्य आणि तेच हस्तगत करण्यायोग्य असते. ते म्हणजे ‘दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम, दिव्य जीवन’ आहे. तेच परम शांती, परिपूर्ण हर्ष आणि संपूर्ण आविष्करण‌ यांसहित या पृथ्वीवरील सर्व-प्रभुत्व‌सुद्धा आहे; ते शिखरस्थानी आहे. जेव्हा तुम्हाला वस्तुंच्या सापेक्षतेची जाणीव होते तेव्हा काहीही घडले तरी, तुम्ही दोन पावलं मागे होऊन, अंतरंगात डोकावून बघू शकता; तुम्ही अविचल राहून, दिव्य शक्ती‌ची आळवणी करू शकता आणि तिच्या प्रतिसादाची वाट पाहू शकता. तेव्हा नक्की काय केले पाहिजे ते तुम्हाला नेमकेपणाने उमगेल.

म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही अगदी शांतचित्त असल्याशिवाय तुम्हाला दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे आकलन होणार नाही. आंतरिक शांतीचा अभ्यास करा, किमान थोडीतरी सुरुवात करा आणि जोवर ती सवय तुमच्या अंगवळणी पडत नाही तोवर तुमचा सराव चालूच ठेवा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 160)

(उत्तरार्ध)

तुम्ही ज्यावेळी एकाएकी आपसूकपणे ध्यानात शिरता तेव्हा ते इतके स्वाभाविक असते की ते टाळताच येत नाही, असे ध्यान हे सर्वोत्तम ध्यान असते. अशा वेळी तुम्हाला कोणता पर्यायच नसतो, एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. ध्यानामध्ये अशी तुमची पकड घेतली जाण्यासाठी तुम्ही अरण्यामध्ये एकांतवासात असणे गरजेचे नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तुम्हाला खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ईश्वरी कृपा तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि त्यामुळे आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. बाह्य परिस्थिती कशीही असली तरीदेखील, त्या शाश्वत‌, अनंत अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या परमेश्वराला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

(पूर्वार्ध)

बरेचदा असे आढळते की, ध्यानधारणादी करण्यासाठी जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या पशुपक्ष्यांशी, झाडांशी मैत्री होते. म्हणजे केवळ एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची आणि परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, असे अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला अन्य काहीच करण्यासारखे नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित योगयुक्त राहणे सोपे असेलही पण मला काही ते तितकेसे पटत नाही. कारण व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढते. (आणि त्यात गुंतून पडू शकते.) मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींना ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते; ईश्वरी कृपे‌ने जी बाह्य परिस्थिती प्रदान केली आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील शाश्वत अस्तित्वा‌सोबत एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा पर्याय आकर्षक असला तरी, तो त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेपोटी ते म्हणत असतात, ”झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे आणि बोलण्याची किंवा काहीतरी करण्याची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल नाही?” या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे मी तुम्हाला सुचवेन. ती अशी की, ‘दिवसातून फक्त एक तास, अगदी अनिवार्य आवश्यक शब्दांव्यतिरिक्त काहीही बोलायचे नाही. एक शब्द अधिक नाही की उणा नाही. तुमच्या दैनंदिन जीवनातील, तुमच्या सोयीची अशी एक तासाभराची वेळ निवडा आणि त्या तासाभरात स्वतःचे अगदी जवळून निरीक्षण करा आणि अगदी आवश्यक तेवढेच शब्द उच्चारा.’

(असे म्हटल्याबरोबर) पहिली अडचण निर्माण होते ती अशी की, अगदी अनिवार्य, आवश्यक असे शब्द कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे ओळखायचे कसे? खरंतर, हाच एक स्वयमेव अभ्यासाचा विषय आहे आणि (तुम्ही सातत्याने त्याचा अभ्यास करत राहिलात तर) दर दिवशी तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रगती होत राहील. नंतर, तुमच्या असे लक्षात येईल की, जोपर्यंत तुम्ही काहीच बोलत नसता तोपर्यंत पूर्णपणे शांत राहणे तितकेसे अवघड नसते. परंतु एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही नेहमीच दोन, तीन, दहा, बारा, वीस निरुपयोगी शब्द बोलत राहता, की जे शब्द उच्चारण्याची (वास्तविक) अजिबात आवश्यकता नसते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 259)