Tag Archive for: साधना

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.

जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.

योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे असे दिसते. जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण करतो त्या प्रत्येकाला जसा अनुभव येतो तसाच तुमचा हा अनुभव आहे. एखादी व्यक्ती संरक्षणासाठी जेव्हा अगदी हृदयापासून धावा करते तेव्हा तो धावा कधीच निष्फळ ठरत नाही.

तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे कधीच विचलित होऊ देऊ नका. कारण सर्व प्रकारच्या प्रसंगांमधून, अडचणींमधून वाट काढत, ध्येयाप्रत घेऊन जाण्याचे सामर्थ्य या श्रद्धेशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. ज्ञान आणि तपस्येमध्ये कितीही ताकद असली तरीही, ती श्रद्धेपेक्षा काकणभर उणीच ठरते. श्रद्धा ही साधकासाठी त्याच्या योगमार्गावरील वाटचालीसाठी सर्वात मजबूत असा आधार असते.

तुमच्यावर श्रीमाताजींची प्रेममय दृष्टी आहे आणि त्यांचे संरक्षक-छत्र तुमच्यावर आहे. त्यावर भरवसा ठेवा आणि त्याप्रत अधिकाधिक खुले व्हा. तसे केलेत तर ते संरक्षक-छत्र तुमच्यावरील सर्व आघात पळवून लावेल आणि तुम्हाला कवेत घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 308)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

(मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन का देत नाहीये? असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही असे म्हटले पाहिजे की, “मला फक्त ईश्वरच हवा आहे, त्यामुळे मला यशाची खात्री आहे. मी फक्त त्याकडे पूर्ण विश्वासाने वाटचाल केली पाहिजे म्हणजे मग तो माझ्याही नकळत मला, स्वतःच्या हाताने त्याच्या स्वतःच्या मार्गावर आणि त्याने निर्धारित केलेल्या वेळी निश्चितपणे घेऊन जाईल.” हा तुमचा नित्य-मंत्र असला पाहिजे. आणि खरे तर, करण्यासारखी हीच एकमेव तर्कशुद्ध आणि सयुक्तिक गोष्ट आहे. कारण या व्यक्तिरिक्त कोणतीही गोष्ट करणे म्हणजे लक्षणीय स्वरूपाचा तर्कहीन विरोधाभास असतो.

हे जग म्हणजे कायम मानवसमूहांची युद्धभूमीच राहणार का, त्याव्यतिरिक्त हे जग दुसरे काही असूच शकणार नाही का? यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींबाबत व्यक्ती शंका उपस्थित करू शकते. कारण या शंका तर्कसंगत असू शकतात. पण जी व्यक्ती केवळ एका ईश्वराचीच आस बाळगते ती व्यक्ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

प्रत्येक साधकाच्या हृदयाच्या तळाशी ही श्रद्धा असणे आवश्यकच आहे. कारण या वाटचालीमध्ये साधक जर समजा अडखळून पडला, त्याला काही आघात सहन करावा लागला, त्याला जर अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले तर, त्या प्रत्येक वेळी ही श्रद्धाच त्याला साहाय्य करून, तारून नेते.

(पण) तुमच्या मनावर अजूनही मिथ्या संकल्पनाचे सावट आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण होण्यामध्ये अडचण येत आहे. या मिथ्या संकल्पना एकदाच कायमच्या दूर करा आणि या साध्यासरळ आंतरिक सत्याकडे अगदी साधेपणाने व सरळपणाने पाहा, म्हणजे मग, तुमच्या अडचणीच्या मूळ कारणाचाच बिमोड होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 97)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

(उत्तरार्ध)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याविरुद्ध झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ईश्वर अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ईश्वर हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, जिवामध्ये उपजत असणारी ही श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. जे सत्य मनाला अजूनपर्यंत ज्ञान म्हणून कवळता आलेले नाही त्या सत्याची एक झलक म्हणजे श्रद्धा.

*

साधकाने आध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवावी अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते; पण ती श्रद्धा अज्ञानमय नव्हे तर प्रकाशमय असणे अपेक्षित असते. त्याने अंधकारावर नव्हे तर, प्रकाशावर श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. ही श्रद्धा बाह्य रंगरूपांकडून किंवा दृश्यमान तथ्यांकडून मार्गदर्शन घेण्यास नकार देते (ही श्रद्धा बाह्य रंगरूपांना किंवा दृश्यमान तथ्यांना भुलून, त्यांच्या आधारे निर्णय घेत नाही.) कारण त्या पाठीमागे असणारे सत्य तिला दिसत असते. ही श्रद्धा साक्षी, पुरावे यांच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि म्हणून शंकेखोर बुद्धीला ती अंधश्रद्धा आहे असे वाटत असते.

(वास्तविक) ती श्रद्धा म्हणजे अंतर्ज्ञान असते. अनुभवाने तिला समर्थन पुरवावे म्हणून हे अंतर्ज्ञान वाट पाहते आणि हे अंतर्ज्ञानच (साधकाला) त्या अनुभवाप्रत घेऊन जाते. मी जर स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवत असेन तर, कालांतराने का होईना पण त्याचे मार्ग माझे मला सापडतील. त्याचप्रमाणे, माझी जर रूपांतरणावर श्रद्धा असेल तर, रूपांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची उकल करून घेऊन, मी ते साध्य करून घेऊ शकेन.

पण मी जर मनात शंका उपस्थित करूनच (साधनेला) प्रारंभ केला आणि ती शंका मनात तशीच बाळगून वाटचाल केली तर त्या मार्गावर मी कुठवर प्रगत होऊ शकेन? हा प्रश्नच आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91), (CWSA 28 : 349)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे अगदी साधनेतील प्रयत्नांमध्येसुद्धा तुमची इच्छा मिसळलेली आहे, यात शंकाच नाही आणि तीच तुमची अडचण आहे. इच्छा आली की तिच्यासोबतच, प्रयत्नांच्या बाबतीत एक प्रकारची अधीरतेची वृत्ती येते. (म्हणजे त्या प्रयत्नांचे फळ लगेच मिळावे असे व्यक्तीला वाटू लागते.) तसेच, जेव्हा कधी अडचण जाणवते किंवा परिणाम तत्काळ होताना दिसत नाहीत तेव्हा निराशेची व बंडखोरीची प्रतिक्रिया आणि त्यासारख्या गोंधळ व अस्वस्थ करणाऱ्या अन्य भावना निर्माण होतात.

इच्छेच्या या भेसळीपासून पूर्णतः सुटका करून घेणे हे निश्चितच सोपे नाही, ते तसे कोणासाठीच सोपे नसते; परंतु अशी सुटका व्हावी म्हणून एखाद्या व्यक्तीने संकल्प केला असेल तर ही गोष्टसुद्धा शाश्वत शक्तीच्या साहाय्याने प्रत्यक्षात येऊ शकते.

अभीप्सा ही इच्छेचे किंवा अभिलाषेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याची निकड असली पाहिजे. ईश्वराभिमुख होण्याचा आणि ईश्वराचा शोध घेण्याचा शांत, स्थिर संकल्प तेथे असला पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 60-61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे (व्यक्तीमध्ये) बदल घडून येतो.

*

अभीप्सेमध्ये शब्दांची आवश्यकता नसते. अभीप्सा शब्दांद्वारे किंवा शब्दांवाचूनही व्यक्त होऊ शकते.

*

अभीप्सा ही विचारांच्या रूपातच असली पाहिजे असे काही गरजेचे नसते. ती आंतरिक भावनेच्या रूपातदेखील असू शकते. मन कामामध्ये गुंतलेले असतानासुद्धा ती टिकून राहू शकते.

*

स्वतःसाठी काही मिळविण्याच्या इच्छेमधून सहसा (दिव्य शक्ती) खेचून घेणे (Pulling) ही प्रक्रिया घडू लागते; पण अभीप्सेमध्ये मात्र, उच्चतर चेतना अवतरित व्हावी आणि तिने आपल्या अस्तित्वाचा ताबा घ्यावा म्हणून, तिच्याप्रत केलेले आत्मदान (self-giving) असते. जेवढी साद उत्कट असते, तेवढे हे आत्मदान अधिक असते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 59-60, 58, 58, 61)