विचार शलाका – २०
मानवी प्रकृतीमध्ये असलेली – निष्क्रियता, जडत्व, आळस, अल्पसंतुष्टता, सर्व प्रयत्नांबद्दल असेलेले वैर – यांविरुद्ध लढा दिला पाहिजे असे श्रीअरविंद येथे (Thoughts and Glimpses मधील उताऱ्यात) सांगत आहेत. बरेचदा संघर्षाची भीती वाटते म्हणून शांतीचे भोक्ते बनलेल्या आणि ही शांती प्राप्त करून घेण्यापूर्वीच विश्रांतीची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती आपण जीवनांत पाहतो. अशा व्यक्ती अल्पशा प्रगतीमुळेच संतुष्ट होतात आणि त्यानंतर अर्ध्या वाटेवरच विसावा घेता यावा म्हणून, आपल्या कल्पना आणि इच्छा यांद्वारे ते त्या अल्पस्वल्प प्रगतीलाच अद्भुत साक्षात्कार ठरवून मोकळे होतात.
सामान्य जीवनांत तर असा अनुभव अधिकच येतो. त्याची सुरुवात वास्तविक पाहता समाजाच्या सुखवस्तू, गर्भश्रीमंत वर्गामध्ये झालेली दिसते. या सुखवस्तू ध्येयाचा त्यांनी मानवतेसमोर जो आदर्श ठेवला त्यामुळेच आजच्या मानवाला मृतवत बनवले आहे आणि मनुष्य आज असा झाला आहे. “तारुण्य आहे तोपर्यंत तुम्ही काम करा. पैसा व मानसन्मान मिळवा, दूरदर्शीपणाने काही कमाई बाजूला ठेवा, बरेचसे भांडवल साठवा. एखाद्या हुद्द्याची जागा मिळवा म्हणजे साधारण चाळीशीच्या सुमारास तुम्हास स्वस्थपणे बसता येईल; साठवलेल्या संपत्तीचा उपभोग घेता येईल, पुढे मग पेन्शन आहेच.” म्हणजेच निढळ्या घामाने मिळविलेल्या विश्रांतिसुखाचा आस्वाद तुम्ही घ्या, असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी बसून राहणे, वाटेतच थांबणे, पुढे पाऊल न टाकणे, झोपी जाणे, उतरणीस लागणे व अकालीच परलोकाच्या वाटेस लागणे व शेवटी या जगापासून स्वत:ची सुटका करून घेणे हेच जीवनाचे उद्दिष्ट सांगितले जाते. खाली बसायचे, पुढे पाऊलही टाकायचे नाही!
ज्या क्षणी प्रगती करणे तुम्ही थांबवता, त्याक्षणी तुमचा अध:पात सुरू होतो. ज्या क्षणी तुम्ही, आहे त्यात संतोष मानता व अधिक काही मिळविण्याची आकांक्षा सोडून देता, त्या क्षणापासून तुमचा मृत्यू सुरू होतो. जीवन ही गती आहे, धडपड आहे. जीवन म्हणजे सतत पुढे पुढे कूच करत राहणे, जणू गिर्यारोहण करणे. भावी अनुभव व साक्षात्कार यांकरता सतत उंच उंच चढत जाणे म्हणजे जीवन. विश्रांतीची गरज भासणे, विश्रांतीची इच्छा धरणे यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट नाही. कर्मामध्ये, प्रयत्नामध्ये, पुढे पुढे कूच करण्यातच तुम्हाला विश्रांती लाभली पाहिजे. ‘ईश्वरी कृपे’वर संपूर्ण भार टाकल्यामुळे जिवाला जी विश्रांती व स्वस्थता लाभते, वासना-विरहिततेमुळे व अहंकारावरील विजयामुळे जी विश्रांती मिळते तीच खरी विश्रांती होय.
सतत विशाल होण्यात, विश्वाला व्यापणारी चेतना प्राप्त करून घेण्यात खरे स्वास्थ्य, खरी विश्रांती असते. अखिल जगाएवढे व्यापक, विस्तृत व्हा म्हणजे नेहमीच विश्रांत स्थितीत तुम्ही विराजमान व्हाल. कर्मबाहुल्यांत, युद्धाच्या धुमश्चक्रीत, प्रयत्नसातत्यामध्येच तुम्हाला अनंत व शाश्वतकाळची विश्रांती आढळून होईल.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 65-66)