Posts

अमृतवर्षा २०

कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. कारण ‘कर्म करणारी व्यक्ती’ असे तुम्ही राहिलात आणि त्यातही तुमचे विचार भरकटत असतील तर निश्चितपणे असे होईल की, तुम्ही जर काही नाजूक गोष्टी हाताळत असाल तर त्या मोडतील, तुटतील; तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या हातून एखादा पदार्थ करपून जाईल, तुम्ही जर खेळत असाल तर तुम्ही हराल. तेव्हा कर्मामध्ये मोठी साधना असते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला ती साधना चांगल्या रीतीने करायची असेल तर (कर्म करत असताना स्वत: कर्मरूप होणे) हाच एक मार्ग आहे.

…अगदी सगळ्या गोष्टींबाबत हे असेच असते. कोणतीही गोष्ट जर ती योग्य प्रकारे केली तर ती योग-साधनेचा भाग बनू शकते. आणि योग्य प्रकारे केली नाही तर अगदी (तुमच्या) तपस्येचादेखील काही उपयोग होऊ शकणार नाही आणि परिणामी तुमची प्रगतीसुद्धा होणार नाही. कारण परत तेच! तुम्ही जर तपस्या करत असाल आणि ती करत असताना सदासर्वकाळ स्वत:कडे पाहात असाल आणि मनातल्या मनात स्वत:शीच बोलत असाल, ‘माझी प्रगती होत आहे ना? माझे भले होईल ना? मी यशस्वी होईन ना?” तर तेव्हा तो तुमचा अहंकार असतो, तो हळू हळू वाढत जातो आणि सर्व जागा व्यापून टाकतो, मग तो अन्य कशालाच जागा उरू देत नाही. आध्यात्मिक अहंकार हा सर्वात वाईट असतो कारण तो त्याच्या स्वत:च्या हीनपणाबद्दल पूर्णपणे बेसावध असतो, त्याला असे वाटत असते की, मी अगदी दैवी नसलो तरी मी खूप श्रेष्ठ आहे….

(वर उल्लेख केल्याप्रमाणे, व्यक्ती स्वत: कर्मरूप बनून न जाता, कर्म करणारी आणि ते करताना सातत्याने स्वत:कडेच बघत राहणारी व्यक्ती म्हणून शिल्लक राहिली आणि) पुन्हापुन्हा स्वत:कडे मागे वळून बघत राहिली, म्हणजेच ती अगदी कोत्या अहंकाराच्या मर्यादांमध्ये स्वत:ला कोंडून घेत राहिली तर त्यातून न्यूनगंड, स्वत:च्या मर्यादा, स्वतःचा क्षुद्रपणा, अक्षमता या सर्व गोष्टी निर्माण होतात. व्यक्तीने आपली दारे खुली केली पाहिजेत, स्वत:ला व्यापक केले पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, व्यक्ती जे काही कर्म करत असते त्या कर्मावर लक्ष केंद्रित करायला तिला जमले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 362-364]

विचारशलाका ३६

 

सर्वसाधारणपणे आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती दिव्य शक्ती आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल. ‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे – त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 07-08]

विचारशलाका ३४

आळस आणि निष्क्रियता यांचा परिणाम म्हणजे तमस, तामसिकता. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा खरी ‘चेतना’प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 13 : 212]

आध्यात्मिकता ४६

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.

– श्रीमाताजी : Conversations with disciple, July 15, 1964

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]