धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते.

श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे किंवा प्रकृतीच्या नियमांचे किंवा तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकता त्याबाबतीतले अज्ञान नव्हे; तर वस्तुमात्राच्या गूढतम सत्याबद्दल असलेले अज्ञान, आपल्या अस्तित्वाच्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल, आपल्या जीवितसाराबद्दल असणारे अज्ञान, धर्माबद्दल असणारे अज्ञान.

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मसंयमाचा अभाव व सत्यनिष्ठेचा अभाव या दोन दोषांवर येथे भर देण्यात आलेला आहे. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी; धम्मपदाने सर्वाधिक धिक्कार ढोंगीपणाचा केला आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवन जगावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे जगावयाचे नाही, आपल्याला सत्यशोधन करावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे करावयाचे नाही, दिव्य जीवनासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले असल्याचे ज्यातून दिसून येईल अशा बाह्य गोष्टी धारण करावयाच्या (उदा. पीत वस्त्रे परिधान करावयाची) पण आंतरिकरित्या मात्र स्वत:, स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च्या गरजा यातच गुंतलेले असावयाचे, ह्या सर्व गोष्टींची धम्मपद निंदा करते.

धम्मपदाने आत्मसंयमावर किती भर दिला आहे हे पाहण्यासारखे आहे. कारण बुद्धाच्या शिकवणीनुसार, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बुद्धाने मध्यममार्गावर, सुवर्णमध्यावर नेहमीच भर दिला आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला अधिक झुकलेले असता कामा नये, किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा, परिमितता हवी.

म्हणूनच, आंतरिक समतोल असणे, कृतीमध्ये समतोल असणे, प्रत्येक बाबतीत परिमितता असणे, प्रामाणिक असणे, सचोटी व निष्ठा असणे, हे गुण तुम्हाला आध्यात्मिक जीवन आचरण्यासाठी पात्र बनवितात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 190)

धम्मपद : बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या खुरामागोमाग ज्याप्रमाणे बैलगाडीची चाके जातात त्याचप्रमाणे, व्यक्ती जर दुष्ट मनाने बोलत वा वागत असेल तर, त्याच्या पाठी दुःखभोग लागतात.

श्रीमाताजी : सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण धम्मपदातील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय.

निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी, हे सारे करावयाचे कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे की, नांगरणाऱ्या बैलाच्या खुरांच्या पाठोपाठ बैलगाडीची चाके जातात त्याप्रमाणे जी व्यक्ती वाईट मनाने बोलत वा वागत असते, तिच्यापाठोपाठ दुःखभोग चालत येतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०२

दया आणि करुणा या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. माणसांच्या वाट्याला जे दुःखभोग आलेले असतात ते दूर करण्यासाठीची तीव्र उर्मी म्हणजे ‘करुणा’. दुसऱ्याचे दुःख पाहून वा इतरांच्या दुःखाबद्दलच्या विचाराने असहाय्य दुर्बलतेची भावना निर्माण होणे म्हणजे ‘दया’.

करुणा हा बलवंतांचा मार्ग आहे, भगवान बुद्धांच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, आप्तांना विरहदुःख सहन करावे लागले; त्यांचे जणू सर्वस्व गमावले गेले होते पण करुणार्द्र होऊन, या जगातील दुःखांचा निरास करण्यासाठी भगवान बुद्ध घराबाहेर पडले…

पूर्णमानव, सिद्ध किंवा बुद्ध हा विश्वव्यापी होतो, सहानुभूतीने व एकतेने सर्व अस्तित्वाला कवटाळतो, स्वत:मध्ये वसणाऱ्या ‘स्व’चा स्वत:मधल्याप्रमाणेच इतरांमध्येही शोध घेतो. आणि असे करून, तो विश्वशक्तीच्या अनंत सामर्थ्याला कमीअधिक प्रमाणात स्वत:च्या ठिकाणी आणतो, हे भारतीय संस्कृतीचे विधायक ध्येय आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 153-154) (CWSA 20 : 254)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०१

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्या जीवनात सर्वच पारंपरिक योगांचा, तत्त्वज्ञानांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. श्रीअरविंदांनी तर त्यावर आधारित ‘Synthesis of Yoga’ या नावाचा ग्रंथराजच संपन्न केला. श्रीमाताजी गीतेच्या योगाच्या तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्याही अभ्यासक आणि उपासक होत्या. त्यांना ध्यानावस्थेमध्ये भगवान बुद्धांचा संदेश प्राप्त झाला होता. श्रीमाताजींनी केलेल्या उपासनेच्या आधारावर, पूर्णयोगाच्या प्रकाशात, बौद्ध तत्त्वज्ञानाचे सारच शिष्यवर्गासमोर खुले केले. त्यांनी पूर्णयोगाच्या प्रकाशात, ‘धम्मपद’ या ग्रंथातील एकेक वचनाच्या आधारे, त्याचे स्पष्टीकरण केले.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांना कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही तत्त्वज्ञानाचे, कोणत्याही संप्रदायाचे वावडे नव्हते. वैश्विक व्यवस्थेमध्ये, प्रत्येक अवताराचे त्याचे त्याचे म्हणून एक विशिष्ट असे कार्य असते. आणि हे सारे अवतार म्हणजे वैश्विक उत्क्रांतीच्या मार्गावरील विविध टप्पे असतात, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे या सर्वच विचारधारांमधील सार ग्रहण करण्याची स्वीकारशीलता आणि त्या विचारधारांमधील कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची विचक्षणता त्यांच्यापाशी होती. सर्वच तत्त्वज्ञानांमधील सार घेऊन, त्याच्या आधारावर पुढे पूर्णयोगाची मांडणी श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केलेली दिसते.

‘धम्मपद’ या ग्रंथाला बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी कशी करावी यासंबंधी, तसेच दैनंदिन जीवनामध्ये आचरण कसे असावे यासंबंधी, अनेक मौलिक विचार या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेले आहेत. तेव्हा धम्मपदामधील मूळ वचने आणि त्याचे श्रीमाताजीकृत स्पष्टीकरण यांतील काही निवडक भाग आपण नव्याने सुरु होणाऱ्या लेखमालिकेमध्ये विचारार्थ घेणार आहोत.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लिखाणामधून, आपल्या पूर्णयोगाच्या वाटचालीमध्ये बौद्धविचाराचे नेमके स्थान कोणते, ह्याचाही बोध जाणकारांना होईल, असा विश्वास वाटतो. वाचक त्याला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही….

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की, जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत कारण, तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरतो.

श्रीमाताजी : मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो, त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिना लाभल्यासारखेच वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे योगसाधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तिही त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव ह्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. कारण तसे करणे ह्याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सामर्थ्य आले नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही, अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता.

कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)