उठा, स्वत:च्या अतीत जा, तुम्ही स्वत: जे आहात ते बना. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची संपूर्ण प्रकृतीच अशी आहे की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मनुष्य-प्राणी होता, आता तो पशु-मानवापेक्षा वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण तो विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनू शकतो, तो ज्ञान-द्रष्टा बनावा, तो कारागीरापेक्षा अधिक काही बनावा. तो निर्माणकर्ता बनावा आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी बनावा; त्याला सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा लाभ घेता यावा म्हणून, त्याने निव्वळ सौंदर्याची उपासना करण्यापेक्षा अधिक काही बनावे.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य द्रव्य मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या प्राणमय अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे, आणि त्याच्याकडे आंशिक (Partial) ज्ञान असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि दिव्य दृष्टी ह्यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे होय; कारण हे बनणे म्हणजे मनामधून अतिमनाकडे उन्नत होणे होय. त्याला दिव्य मन वा दिव्य ज्ञान किंवा अतिमन काहीही नाव द्या; ती दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती आणि प्रकाश आहे. आत्म्याने अतिमनाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने स्वत:साठी ही विश्वं निर्माण केली, अतिमनाच्याद्वारेच तो त्यांच्यामध्ये राहतो आणि शासन करतो. अतिमनामुळेच तो स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे.

अतिमन म्हणजे अतिमानव; त्यामुळे मनाच्या वर उठणे ही महत्त्वाची अट आहे.

अतिमानव असणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव असणे म्हणजे देवाचे शक्तिसामर्थ्य असणे. तुम्ही मानवामधील देवाचे सामर्थ्य बना.

दिव्य अस्तित्वामध्ये ठाण मांडून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेने, आनंदाने, संकल्पशक्तीने आणि ज्ञानाने तुमचा ताबा घेणे आणि तुमच्या बरोबर आणि तुमच्या माध्यमातून लीला करणे हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण होय. स्वत:मध्ये देवाचा शोध घेणे आणि त्याचे प्रकटीकरण प्रत्येक गोष्टीमध्ये करणे, हे तुमचे सर्वोच्च रूपांतरण आहे. त्याच्या अस्तित्वामध्ये जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीने कृती करा, त्याच्या आनंदाने आनंदी व्हा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

तुम्ही ह्यापैकी अंशभाग जरी करू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या पहिल्या पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 151-152)

परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि ह्याचसाठी तुम्ही इथे आहात.

या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते दुसरे तिसरे काही नसून, एकतर तुमची तयारी करून घेणे आहे, किंवा मार्गावरील आनंद आहे, किंवा हेतूपासून स्खलन, ध्येयच्युती आहे.

या मार्गाधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे.

तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे, कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तोदेखील या मार्गावर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत, यासाठीच आरोहणाची ही शक्ती तुम्हाला देण्यात आली आहे.

जर तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच होय; जर तुम्ही असे विचारत असाल की, तुमचे ध्येय काय असावे, तर ते ध्येय हेच असावे. जर तुम्ही सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर, उपरोक्त गोष्टीपेक्षा अधिक दुसरा कोणताच आनंद नाही; कारण स्वप्नाचा आनंद असो किंवा झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे इतर आनंद तोडकेमोडके वा मर्यादित असतात. पण हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आनंद आहे.

जर तुम्ही असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय, तर ईश्वर हे तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ भग्न वा विपर्यस्त रूपे आहेत.

जर तुम्ही सत्य शोधू पाहात असाल, तर ते सत्य हेच होय. तेच तुमच्यासमोर सातत्याने असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 150)

अतिमानव म्हणजे चढाई करून, स्वत:च्या प्राकृतिक शिखरावर जाऊन पोहोचलेला कोणी मानव नव्हे किंवा अतिमानव म्हणजे माणसाच्या महानतेची, ज्ञानाची, उर्जेची, बुद्धिमत्तेची, संकल्पशक्तीची, चारित्र्याची, विद्वतेची, गतिमान शक्तीची, संतपणाची, प्रेमाची, शुद्धतेची वा पूर्णत्वाची अधिक श्रेष्ठ अशी श्रेणीही नाही. अतिमानस हे मनोमय मानव आणि त्याच्या मर्यादांच्या अतीत असणारे असे काही आहे; मानवी प्रकृतीला मानवेल अशा उच्चतम चेतनेपेक्षादेखील ही अतिमानस चेतना अधिक महान आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 158)

उच्चतर अशा अतिमानसिक स्थितीप्रत उत्क्रांतीला घेऊन जाणाऱ्या, अतिमानसिक किंवा विज्ञानमय जीवांचे जीवन, म्हणजे ‘दिव्य जीवन’ असे यथार्थपणे म्हणता येईल. कारण ते जीवन दिव्यत्वामधील जीवन असेल; भौतिक जीवनामध्ये आविष्कृत झालेल्या, आध्यात्मिक दिव्य प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या प्रारंभाचे ते जीवन असेल. हे जीवन मानसिक मानवी पातळी ओलांडून पलीकडे जात असल्यामुळे, ‘आध्यात्मिक आणि अतिमानसिक अतिमानवाचे जीवन’ असे या जीवनाचे वर्णन करता येईल.

परंतु अतिमानवत्वाच्या भूतकालीन किंवा वर्तमान संकल्पनांशी, त्याची गल्लत करता कामा नये. कारण, आजवरच्या सर्व संकल्पना या अतिमानवत्वाबद्दल असलेल्या ‘मानसिक कल्पनां’मध्ये मोडतात.

अतिमानवत्वाच्या ‘राक्षसी’ कल्पना :

विस्तारित झालेल्या व्यक्तिमत्त्वाच्या साहाय्याने, सामान्य मानवी पातळी ओलांडून वर जाणे, केवळ प्रतलाच्या दृष्टीनेच नव्हे तर, एकाच प्रतलावरील श्रेणींमध्येसुद्धा मानवी पातळी ओलांडून जाणे; पुष्ट झालेला आणि अतिशयोक्त अहंकार, मनाची वाढलेली शक्ती, प्राणिक शक्तीची वाढलेली ताकद, मानवी अज्ञानाच्या शक्तींचे अधिक सुधारित किंवा सघन आणि प्रचंड अतिशयोक्त असे रूप या साऱ्याचा समावेश अतिमानवत्वाच्या या ‘मानसिक’ कल्पनांमध्ये होतो. या गोष्टींप्रमाणेच, मानवावर अतिमानवाने बलपूर्वक वर्चस्व गाजविण्याची कल्पना देखील सामान्यतः यामध्ये अंतर्भूत केली जाते. परंतु, ही तर अतिमानवत्वाची नित्शेची (जर्मन तत्त्वज्ञ) संकल्पना ठरेल. फारफार तर त्यातून, (नित्शेने वर्णन केलेल्या) गोऱ्या कातडीच्या पशुचे किंवा काळ्या पशुचे किंवा कोणत्याही आणि सर्वच पशुंचे राज्य; एक प्रकारे, रानवट ताकदीकडे, बळाकडे आणि क्रौर्याकडे परतणे असा अर्थबोध होईल. परंतु मग ही उत्क्रांती असणार नाही; तर ते पुन्हा एकदा जुन्या आवेशयुक्त क्रूराचाराकडे वळणे ठरेल.

अन्यथा, मानवाचे स्वतःला ओलांडून, स्वतःच्या अतीत जाण्याचे जे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, त्या प्रयत्नामधून राक्षसाचा किंवा असुराचा उदय होण्यामध्ये त्याची परिणती होईल. मानवत्वाला
ओलांडण्याचे, त्याच्या अतीत जाण्याचेच प्रयत्न पण चुकीच्या दिशेने झालेले प्रयत्न असे त्याचे वर्णन करावे लागेल. स्वतःच्या तृप्तीसाठी, आत्यंतिक जुलमी किंवा अराजक शक्ती पणाला लावणारा, अत्यंत हिंसक आणि शिरजोर झालेला, मदोन्मत्त झालेला प्राणिक अहंकार, अशी ही अतिमानवाची ‘राक्षसी कल्पना’ ठरेल. परंतु महाकाय, पिशाच्च किंवा जगाचे भक्षण करणारा, राक्षस, जरी आजही अस्तित्वात असला, तरी तो गतकालीन युगधर्माचा भाग आहे. अशा प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर उदय होणे म्हणजे सुद्धा प्रतिगामी उत्क्रांती ठरेल.

अतिमानवात्वाची ‘आसुरी’ कल्पना :

उग्र शक्तीचे प्रचंड प्रदर्शन, आत्म-जयी, आत्मधारक, अगदी ती तपस्व्याची आत्म-नियंत्रित मनःशक्ती आणि प्राणशक्ती का असेना, सामर्थ्यशाली, शांत किंवा थंड किंवा एकवटलेल्या ताकदीमुळे दुर्जयी झालेला, सूक्ष्म, वर्चस्ववादी, एकाच वेळी मानसिक व प्राणिक अहंकाराही उंचावलेला – हा अतिमानवात्वाचा ‘आसुरी’ प्रकार ठरेल.

परंतु भूतकाळामध्ये पृथ्वीने असे प्रकार पुरेसे अनुभवले आहेत आणि त्यांची पुनरावृत्ती करणे म्हणजे जुन्याच गोष्टी लांबविण्यासारखे होईल. या असुरांकडून किंवा राक्षसांकडून, तिला स्वतःच्या अतीत होण्याची कोणतीही शक्ती, तिच्या भविष्यासाठी खराखुरा लाभ होईल अशी कोणतीही शक्ती मिळण्याची शक्यता नाही. अगदी त्यातील महान किंवा असामान्य शक्तीसुद्धा पृथ्वीला केवळ तिच्या जुन्या कक्षेमध्येच अधिक विस्तृत परिघातच फिरवत राहतील. परंतु, आता जे उदयाला यावयास हवे ते अधिक कठीण पण अधिक सहज असे काही असावयास हवे.

खरे अतिमानवत्व :

तो आत्मसाक्षात्कार झालेला एक जीव असेल, आध्यात्मिक स्वची बांधणी झालेला जीव असेल, त्यामध्ये आत्माची प्रेरणा, आणि आत्म्याची गहनता असेल, त्यामध्ये त्याच्या प्रकाश, शक्ती आणि सौंदर्याची मुक्ती आणि सार्वभौमता असेल. तो मानवतेवर मानसिक आणि प्राणिक वर्चस्व गाजवू पाहणारा अहंकारी अतिमानव असणार नाही. अशा जीवाची स्वतःच्याच साधनांवर आत्मशक्तीची प्रभुता असेल. त्याचा स्वतःचा स्वतःवर ताबा असेल आणि आत्मशक्तीच्या योगे त्याचे जीवनावर प्रभुत्व असेल. उदयाला येण्यासाठी धडपडू पाहणाऱ्या दिव्यत्वेच्या प्रकटीकरणाद्वारे, एका नवीनच चेतनेच्या योगे, की ज्यामध्ये खुद्द मानवतेलाच, स्व-अतीत होणे गवसू शकेल; तिला आत्मपरिपूर्ती लाभू शकेल अशा एका चेतनेच्या योगे, त्याचे स्वतःवर आणि जीवनावर प्रभुत्व असेल. हेच एकमेव खरे अतिमानवत्व असेल आणि प्रकृतीच्या उत्क्रांतीमधील शक्यतेच्या कोटीतील हे एक खरेखुरे पुढचे पाऊल असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 22 : 1104 -1105)

अतिमानवतेविषयीचे गैरसमज : अतिमानवाच्या ध्येयाविषयी अलीकडेच लोकांचे विशेष लक्ष वेधले जाऊ लागले आहे. त्यामध्ये निष्फळ चर्चेचाच भाग अधिक आहे आणि मोठ्या प्रमाणात कुचेष्टेचा सूर आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये त्याबद्दल एक प्रकारची अढी असणे स्वाभाविकच आहे, कारण त्यांना असे सांगण्यात आले आहे किंवा त्यापाठीमागे अशी एक छुपी जाणीव आहे की, जेथवर बहुसंख्य लोक जाऊन पोहोचण्यासाठी सक्षम नाहीत, अशा उंचीवर आम्ही काही थोडे जणच चढू शकतो; नैतिक आणि आध्यात्मिक विशेषाधिकार आमच्याकडे एकवटलेले आहेत; प्रसंगी मानवजातीच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकतील आणि मानवाच्या विस्मृत सन्मानाला हानिकारक ठरू शकेल असे वर्चस्व भोगण्याचा आम्हाला अधिकार आहे; इतकी सत्ता आमच्या हाती एकवटली आहे आणि त्यांचा उपभोग घेण्याचा आम्हाला विशेषाधिकार आहे, असा काही जण दावा करीत असतात. तसे पाहिले तर मग, सामान्यत: मानवी गुणांच्या आधारावर, जो अहंकार फुलतो, त्यालाही मागे टाकणारा, अतिमानवपणा हा एक प्रकारचा एक विरळा किवा एकमेवाद्वितीय असा अहंकारच आहे, त्यापेक्षा अधिक काही महत्त्वाची गोष्ट नाही, असा समज होईल. परंतु ही मांडणी खूप संकुचित आहे; किंबहुना ते एक प्रकारचे विडंबन आहे असे म्हणावे लागेल.

अतिमानवतेचे सत्य : वास्तविक, खऱ्याखुऱ्या अतिमानवतेचे पूर्णसत्य आपल्या प्रागतिक मानववंशाला एक उदार ध्येय पुरविते; पण त्याचे पर्यवसान एखाद्या वर्गाच्या किंवा काही व्यक्तींच्या उद्दाम दाव्यामध्ये होता कामा नये.

निसर्गाच्या विचारमग्नतेचा परिणाम म्हणून विश्व-संकल्पनेचा जो सातत्यपूर्ण चक्राकार विकास चालू आहे त्यामध्ये, मानवाच्या पुढची जी अधिक श्रेष्ठ अशी श्रेणी उत्क्रांत होणार आहे, तिचे अर्धेमुर्धे दर्शन आधीच झालेले आहे.

आपल्याहून अधिक श्रेष्ठ अशी जी प्रजाती उत्क्रांत व्हावयाची आहे त्यामध्ये स्वत:हून जाणिवपूर्वकतेने सहभागी व्हायची हाक आजवर या पार्थिव जीवनाच्या इतिहासात कोणत्याही प्रजातींना आलेली नाही, किंवा तसे करण्याची आकांक्षाही कोणी आजवर बाळगली नाही. मानवाला मात्र ही हाक आलेली आहे.

ह्या (अतिमानवाच्या) संकल्पनेचा आपण जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा लक्षात येते की, आपल्या मानववृद्धीच्या भूमीमध्ये, विचाराच्या माध्यमातून, जेवढे सकस बियाणे पेरणे शक्य होते, त्यापैकी सर्वात जास्त सकस बियाणे ते हेच; ही संकल्पना हेच ते सकस बियाणे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 151)

कनिष्ठ प्रतीच्या मानवप्रजातीमध्ये मनाकडून प्राणाकडे व शरीराकडे असे अधोमुखी गुरुत्वाकर्षण असते.

साधारण प्रतीच्या मानवप्रजातीचा मुक्काम हा, प्राण व शरीराने मर्यादित केलेल्या आणि त्यांच्याकडेच लक्ष ठेवून असणाऱ्या अशा मनामध्ये असतो.

सरस अशी मानवप्रजाती ही आदर्शवत् मनोवस्थेकडे, किंवा एखाद्या विशुद्ध संकल्पनेकडे, ज्ञानाच्या साक्षात् सत्याकडे आणि अस्तित्वाच्या उत्स्फूर्त सत्याप्रत उत्थापित होते.

परमोच्च मानवप्रजाती ही दिव्य परमानंदाप्रत उन्नत होते आणि तेथून ती त्याहून वर असलेल्या केवल सत् अणि परब्रह्माकडे ऊर्ध्वगामी होते अन्यथा, तिच्या कनिष्ठ सदस्यांना हा परमानंद लाभावा; तसेच स्वत:ला आणि मानवी जीवनातील इतरांना हे दिव्यत्व लाभावे म्हणून कार्यरत राहते.

ज्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ गोलार्धामध्ये असलेला पडदा भेदला आहे; जो मानव त्याच्यामध्ये सद्यस्थितीत गुप्त असलेल्या उच्चतर वा दिव्य गोलार्धात वसती करतो, तो खरा अतिमानव आहे आणि तो या विश्वामधील क्रमश: होणाऱ्या ईश्वराच्या आत्माविष्करणाची शेवटची उत्पत्ती असेल; जडामधून चेतनेचा उदय होण्याची, ज्याला आज उत्क्रांतितत्त्व म्हणून संबोधले जाते त्याची ही शेवटची उत्पत्ती असेल.

या दिव्य अस्तित्वामध्ये, शक्तीमध्ये, प्रकाशामध्ये, आनंदामध्ये उन्नत होणे आणि त्याच्या साच्यामध्ये सर्व सांसारिक (mundane) अस्तित्व पुन्हा ओतणे, ही धर्माची सर्वोच्च अशी आकांक्षा आहे आणि हेच योगाचे व्यावहारिक ध्येय आहे. विश्वामध्ये ईश्वराचा साक्षात्कार घडविणे हे उद्दिष्ट आहे पण विश्वातीत असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय, ते साध्य होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 102)

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या दिव्य सत्याशी एकत्व, हे या योगाचे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ईश्वरासाठी अंगीकारलेला आहे.

आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेखातर नाही; तर आपण प्रयत्नशील असतो ते दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे यासाठी ! ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतेनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतेनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्यतेनिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर, तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो.

अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे, असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील; पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे.

ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 280)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक परवानगी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे. मात्र ही महानता त्याच्या देहामध्ये प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. मानवाची अभीप्सा ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी साद घालेल आणि तो परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

मनुष्य हा एक संक्रमणशील जीव आहे, तो अंतिम नव्हे; कारण त्याच्यामध्ये आणि त्याच्या पलीकडे आरोहण करणाऱ्या अशा कितीतरी तेजोमय श्रेणी आहेत की, ज्या दिव्य अतिमानवतेकडे चढत जातात.

मनुष्याकडून अतिमानवाप्रत पडणारे हे पाऊल म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीतील येऊ घातलेली पुढची उपलब्धी आहे. तीच आमची नियती आहे आणि आमच्या अभीप्सा बाळगणाऱ्या पण त्रस्त व मर्यादित मानवी अस्तित्वाला मुक्त करणारी किल्लीदेखील तीच आहे. – हे अटळ आहे कारण ते आंतरिक आत्म्याचे प्रयोजन आहे आणि त्याचवेळी ते प्रकृतीच्या व्यवहाराचे तर्कशास्त्र आहे.

जडभौतिकामध्ये आणि पशु जगतामध्ये मानवाच्या उदयाची शक्यता प्रकट झाली; ती दिव्य प्रकाशाच्या आगमनाची पहिलीवहिली चमक होती – जडामधून जन्मास येणाऱ्या देवत्वाची ती पहिली दूरस्थ सूचना होती. मानवी जगतामध्ये अतिमानवाचा उदय ही त्या दूरवर चमकणाऱ्या वचनाची परिपूर्ती असेल.

वनस्पती आणि प्राणी यांच्या जाणिवेच्या दृष्टीने, विचारी मन हे जेवढे पल्याडचे होते; तेवढेच अंतर मानवाचे मन आणि अतिमानवी चेतना यांमध्ये असेल. मानव आणि अतिमानव यांतील फरक हा मन आणि जाणीव यांमधील फरक असेल. माणसाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला प्राणीजगतापासून वेगळे करणारे लक्षण) जसे मन हे आहे, तसे अतिमानवाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला मानवापासून वेगळे करणारे लक्षण) अतिमन किंवा दिव्य विज्ञान हे असणार आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 157)

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल.

हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील.

तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)