मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे.

आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे आणि त्या सत्य-तत्त्वाला हे शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; आणि तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “व्यक्तीमध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.

या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय. जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आपण नजर टाकली तर असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे प्रकृतीचा एक व्यापक योग आहे. स्वत:मधील विविध शक्ती सतत वाढत्या प्रमाणात प्रकट करत, स्वत:चे पूर्णत्व गाठण्यासाठी आणि स्वत:च्या दिव्य सत्य स्वरूपाशी एकत्व पावण्यासाठी, प्रकृती चेतन आणि अर्ध-चेतनामध्ये हा जीवनरूपी योग अभ्यासत आहे.

मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे एक साधन म्हणजे ‘योग’ होय. प्रकृती तिच्या ऊर्ध्वगामी दिशेने चाललेल्या या प्रयासामध्ये ज्या साधारण पद्धती अगदी सैलपणे, विपुलपणे आणि आरामशीर पद्धतीने, रमतगमत, सढळपणे उपयोगात आणत असते, त्यामध्ये वरकरणी पाहता, द्रव्याचा आणि ऊर्जेचा अपव्यय दिसत असला तरी त्यातून ती अधिक परिपूर्ण अशी संगती लावत जात असते, त्याच पद्धती योगामध्ये अधिक आटोपशीरपणे, अधिक तीव्रतेने, अधिक ऊर्जापूर्ण रीतीने उपयोगात आणल्या जातात. योगाची एखादी विशिष्ट प्रणाली म्हणजे त्या पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड वा दाबयुक्त संकोचन (compression) याशिवाय दुसरे तिसरे काही असत नाही. योगाविषयी हा दृष्टिकोन बाळगला तर आणि तरच, विविध योगपद्धतींच्या तर्कशुद्ध समन्वयास बळकट अधिष्ठान लाभू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 06)

हे माते दुर्गे, सिंहवाहिनी, सर्वशक्तिदायिनी माते, शिवप्रिये, तुझ्या शक्तीपासून उत्पन्न झालेले आम्ही भारताचे तरुण, तुझ्या मंदिरामध्ये बसून प्रार्थना करीत आहोत. माते, ऐक, पृथ्वीवर अवतीर्ण हो, या भारतामध्ये आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, युगानुयुगे आणि जन्मोजन्मी मानवी शरीर धारण करून, तुझे कार्य करून आम्ही आनंदधामास परत जातो. आणि यावेळीहि जन्म घेऊन, तुझ्याच कार्यासाठी आम्ही आमचे जीवन देऊ केले आहे. माते, ऐक; या भूतलावर आविर्भूत हो, आम्हांला साह्य करण्यासाठी ये.

हे माते दुर्गे, सिंहवाहिनी, त्रिशूलधारिणी, वीरशस्त्रधारिणी, सुंदर शरीरधारिणी, जयदात्री माते, तुझी मंगलमय मूर्ती पाहण्यासाठी हा भारत आतुर आहे. भारत तुझी प्रतीक्षा करीत आहे. माते ऐक, पृथ्वीवर अवतीर्ण हो, ह्या भारतभूमीमध्ये आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, शक्तिदायिनी प्रेमदायिनी, ज्ञानदायिनी, शक्तिस्वरूपिणी, सौंदर्यमूर्ती आणि रौद्ररुपिणी हे माते, जेव्हा तू स्वत:च्या शक्तिरुपात असतेस तेव्हा, तू किती भयंकर असतेस. जीवनसंग्रामामध्ये आणि भारताच्या संग्रामामध्ये तुझ्याकडून नियुक्त करण्यात आलेले योद्धे आम्ही आहोत. आमच्या मनाला आणि हृदयाला असुराचे बल दे, असुराची ऊर्जा दे; आमच्या बुद्धीला आणि आत्म्याला देवांचे चारित्र्य आणि ज्ञान दे.

हे माते दुर्गे, भारत, जगांत श्रेष्ठ असलेला भारत वंश, घोर अंध:कारांत बुडून गेला आहे. हे माते, तू पूर्वक्षितिजावर उगवतेस आणि तुझ्या दिव्य गात्रांच्या प्रभेबरोबरच उषा येऊन, अंधकाराचा नाश करते. हे माते, तिमिराचा नाश कर आणि प्रकाशाचा विस्तार कर.

हे माते दुर्गे, आम्ही तुझी मुले आहोत, तुझ्या कृपाशीर्वादाने, तुझ्या प्रभावाने, आम्ही महान कार्य आणि महान ध्येय यासाठी सुपात्र ठरू शकू, असे आम्हाला घडव. हे माते, आमची क्षुद्रता, आमची स्वार्थबुद्धी आणि आमची भीती नष्ट करून टाक.

हे माते दुर्गे, दिगंबरी, नरशीर्षमालिनी हातांत तरवार घेऊन, असुरांचा विनाश करणारी तू कालीमाता आहेस. हे देवी, आमच्या अंतरंगात ठाण मांडून बसलेल्या शत्रूंचा तुझ्या निर्दय आरोळीने निःपात कर; त्यांच्यापैकी एकाही शत्रूला जिवंत ठेवू नकोस; अगदी एकालाही जिवंत ठेवू नकोस. आम्ही निर्मळ आणि निष्कलंक व्हावे, एवढीच आमची प्रार्थना आहे. हे माते, तू आपले रूप प्रकट कर.

हे माते दुर्गे, स्वार्थ, भीती आणि क्षुद्रता यामध्ये भारत बुडून गेला आहे. हे माते, आम्हास महान बनव, आमचे प्रयत्न महान कर, आमची अंत:करणे विशाल कर आणि आम्हास सत्य-संकल्पाशी एकनिष्ठ रहाण्यास शिकव. येथून पुढे तरी आता आम्ही क्षुद्रता व शक्तिहीनता यांची इच्छा बाळगू नये, आम्ही आळसाच्या आहारी जाऊ नये आणि भीतीने ग्रस्त होऊ नये, अशी कृपा कर.

हे माते दुर्गे, योगाची शक्ती विशाल कर. आम्ही तुझी आर्य बालके आहोत; आमच्यामध्ये पुन्हा एकवार गत शिकवण, चारित्र्य, बुद्धी-सामर्थ्य, श्रद्धा आणि भक्ती, तप:सामर्थ्य, ब्रह्मचर्याची ताकद आणि सत्य-ज्ञान विकसित कर; त्या साऱ्याचा या जगावर वर्षाव कर. मानववंशाला साहाय्य करण्यासाठी, हे जगत्जननी तू प्रकट हो.

हे माते दुर्गे, अंतस्थ शत्रूंचा संहार कर आणि बाह्य विघ्नांचे निर्मूलन कर. विशालमानस, पराक्रमी आणि बलशाली असा हा भारतवंश प्रेम आणि ऐक्य, सत्य आणि सामर्थ्य, कला आणि साहित्य, शक्ती आणि ज्ञान यामध्ये वरिष्ठ असलेला हा भारतवंश भारताच्या पुनीत वनात, सुपीक प्रदेशात, गगनचुंबी पर्वतरांगांमध्ये आणि पवित्र-सलिल नद्यांच्या तीरावर, सदा निवास करो; हीच आमची मातृचरणी प्रार्थना आहे. हे माते, तू आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, तू तुझ्या योगबलाच्या द्वारे आमच्या शरीरामध्ये प्रवेश कर. आम्ही तुझ्या हातातील साधन होऊ, अशुभविनाशी तरवार होऊ; अज्ञान-विनाशी प्रदीप होऊ. हे माते, तुझ्या लहानग्या बालकांचे हे आर्त पूर्ण कर. स्वामिनी होऊन हे साधन कार्यकारी कर. तुझी तरवार चालव आणि अशुभाचा विनाश कर. दीप हाती घे आणि ज्ञानप्रकाश वितरण कर. हे माते, आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, एकदा का तू आम्हास गवसलीस की, आम्ही तुझा कधीही त्याग करणार नाही. प्रेम व भक्ती यांच्या धाग्यांनी आम्ही तुला आमच्यापाशी बांधून ठेवू. हे माते, ये. आमच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि देहामध्ये तू प्रकट हो; आविर्भूत हो.

ये, वीरमार्गप्रदर्शिनी, आम्ही तुझा कधीच परित्याग करणार नाही. आमचे अखिल जीवन म्हणजे मातेचे अखंड पूजन व्हावे; आमच्या प्रेममय, शक्तिसंपन्न सर्व कृती म्हणजे मातेचीच अविरत सेवा बनावी, हीच आमची प्रार्थना आहे. हे माते, पृथ्वीवर अवतीर्ण हो, या भारतामध्ये तू प्रकट हो; आविर्भूत हो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 03-05)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०२

दया आणि करुणा या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. माणसांच्या वाट्याला जे दुःखभोग आलेले असतात ते दूर करण्यासाठीची तीव्र उर्मी म्हणजे ‘करुणा’. दुसऱ्याचे दुःख पाहून वा इतरांच्या दुःखाबद्दलच्या विचाराने असहाय्य दुर्बलतेची भावना निर्माण होणे म्हणजे ‘दया’.

करुणा हा बलवंतांचा मार्ग आहे, भगवान बुद्धांच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, आप्तांना विरहदुःख सहन करावे लागले; त्यांचे जणू सर्वस्व गमावले गेले होते पण करुणार्द्र होऊन, या जगातील दुःखांचा निरास करण्यासाठी भगवान बुद्ध घराबाहेर पडले…

पूर्णमानव, सिद्ध किंवा बुद्ध हा विश्वव्यापी होतो, सहानुभूतीने व एकतेने सर्व अस्तित्वाला कवटाळतो, स्वत:मध्ये वसणाऱ्या ‘स्व’चा स्वत:मधल्याप्रमाणेच इतरांमध्येही शोध घेतो. आणि असे करून, तो विश्वशक्तीच्या अनंत सामर्थ्याला कमीअधिक प्रमाणात स्वत:च्या ठिकाणी आणतो, हे भारतीय संस्कृतीचे विधायक ध्येय आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 153-154) (CWSA 20 : 254)

जीवाची उत्क्रांती किंवा जडाच्या पडद्यामधून बाहेर पडून क्रमश: आत्मशोध घेतघेत विकसित होणे, फुलून येणे हा पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा खरा आधार आहे……

पण या उत्क्रांतीचे प्रयोजन काय ? ….दिव्य ज्ञान, सामर्थ्य, प्रेम आणि शुद्धता यांच्या दिशेने होणारा सातत्यपूर्ण विकास हे ह्या उत्क्रांतीचे प्रयोजन असून ह्या गोष्टी हेच खरे तर गुण आहेत आणि हे गुण हेच त्याचे खरे बक्षीस होय.

आत्म्याच्या सर्वसमावेशक आलिंगनातील परमानंद आणि विश्वाविषयीचा जिव्हाळा यांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल अशी सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी क्षमता आणि प्रेमानंद हेच प्रेमाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस असते. योग्य ज्ञानाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अनंत अशा प्रकाशामध्ये हळूहळू, क्रमाक्रमाने विकसित होत राहणे; योग्य शक्तीच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे दिव्य शक्तीमध्ये स्वत: अधिकाधिकपणे तळ ठोकणे आणि शुद्धतेच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अहंकारापासून अधिकाधिक मोकळे होत होत, जेथे सर्व गोष्टी रूपांतरित होत, दिव्य समतेशी सममेळ पावतात त्या निष्कलंक व्यापकतेप्रत जाऊन पोहोचणे हे होय. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वत:ला एक प्रकारच्या मूर्खतेशी आणि पोरकट अज्ञानाशी जखडून ठेवणे होय; वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींना बक्षीस समजणे हे अपरिपक्वतेचे आणि अपूर्णतेचे लक्षण आहे.

आणि मग दु:खभोग आणि आनंद, दुर्दैव आणि समृद्धी ह्यांचे काय ? ह्याचे उत्तर असे की : हे सर्व जीवाच्या प्रशिक्षणातील अनुभव असून ते त्याला त्याच्या घडणीमध्ये साहाय्य करतात, त्या गोष्टी टेकूसारख्या असतात, ती साधने असतात, त्या परीक्षा असतात, त्या अग्निपरीक्षा असतात आणि समृद्धी ही तर दुःखभोगापेक्षाही अधिक दुष्कर अशी अग्निपरीक्षा असते. खरेतर, आपत्ती, दुःखभोग याकडे पापाची शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा, त्यांच्याकडे गुणांचे पारितोषिक म्हणून पाहिले गेले पाहिजे. कारण उमलून येण्याची धडपड करू पाहणाऱ्या जीवाच्या दृष्टीने या गोष्टी त्याचे शुद्धीकरण घडविणाऱ्या आणि अत्यंत साहाय्यक ठरतात. दुःखभोग म्हणजे जणू न्यायाधीशाने दिलेले कठोर पारितोषिक किंवा दुःखभोग म्हणजे वैतागलेल्या सत्ताधीशाचा संताप आहे असे समजणे किंवा दुःखभोग म्हणजे वाईट कृत्याचा परिणाम म्हणून वाईट फळ मिळणे असे समजणे म्हणजे या विश्व-उत्क्रांतीच्या कायद्याविषयी आणि ईश्वराच्या जीवाबरोबरच्या संभाव्य व्यवहाराविषयी अगदीच वरवरचा दृष्टिकोन बाळगणे होय.

आणि मग ही भौतिक समृद्धी, वैभव, मुलेबाळे, कला, सौंदर्य, सत्ता ह्यांचा उपभोग ह्यांचे काय? तर, आपल्या आत्म्याला हानी न पोहोचता, जर त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या भौतिक अस्तित्वावर दिव्य आनंद व कृपा यांचा वर्षाव या भूमिकेतून त्यांचा आनंद घेतला तर त्या चांगल्या आहेत. त्या आपण प्रथमत: इतरांसाठी, खरंतर सर्वांसाठी मिळविण्याचा प्रयत्न करूयात; आपल्यासाठी त्या वैश्विक परिस्थितीचा केवळ एक अंशभाग असतील किंवा पूर्णत्व अधिक जवळ आणण्याचे ते केवळ एक साधन असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 267-268)

(पुनर्जन्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा असते अशी समजूत असणारी माणसं कसा विचार करतात याविषयी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

एखादा माणूस भला दिसतो आहे पण त्या माणसाकडे श्रीमंती, पैसे, भाग्य नसेल तर सर्वसामान्य माणसं असा समज करून घेतात की, तो गत जन्मामध्ये नीच असला पाहिजे; तो त्याच्या गुन्ह्यांची सजा ह्या जन्मामध्ये भोगत असला पाहिजे. पण केवळ अचानकपणे मातेच्या उदरात असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि तो भला म्हणून या जन्मात जन्माला आला आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे, जर एखाद्या दुष्ट माणसाची भरभराट होत आहे आणि जग त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असे दिसले, तर (वरीलप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांच्या लेखी,) तो त्याच्या गतजन्मातील चांगुलपणाचा परिणाम असतो. वास्तविक, एकेकाळी तो संतसत्पुरुष असणार पण त्याने सद्गुणांच्या मोठेपणाच्या क्षणिकतेचा अनुभव घेतला असेल आणि म्हणून तर त्याने ह्या जन्मी हा पापाचा पंथ स्वीकारला नसेल ना? (असा ते विचार करतात.) त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण असते, त्यांना सगळ्या गोष्टींचे समर्थन करता येते. आपण मागच्या जन्मात केलेल्या पापांमुळे दुःख भोगतो, ह्या जन्मातील गुणांचे आपल्याला पुढील जन्मी बक्षीस मिळणार आहे आणि हे असे अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे; असे त्यांचे मत असते.

तत्त्वज्ञानी लोकांना मात्र ह्यात काही राम आढळत नाही आणि ते पाप आणि पुण्य या दोन्हींपासून स्वत:ची सुटका करून घ्यायला सांगतात आणि इतकेच नव्हे तर अद्भुतरित्या चालविल्या जाणाऱ्या या विश्वापासून सुटका करून घेणे, ह्यातच आपले भले आहे असे ते सांगतात, पण ह्यात काही नवल नाही.

हे उघड आहे की, ही विचारसरणी ही जुन्याच लौकिक-पारलौकिक लालूच आणि धमकी यांचे एक वेगळे रूप आहे; चांगल्या वागणुकीसाठी स्वर्गीय सुखांच्या लयलूटीची लालूच आणि दुष्प्रवृत्त माणसासाठी नरकातील शाश्वत आगीची वा पाशवी नरकयातनांची धमकी !

या जगताचे नियमन कोणा एका बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या योजकाकरवी होत असते, ही यामागील कल्पना आहे. परमेश्वर हा जणू काही न्यायाधीश आहे, पिता आहे, किंवा परमेश्वर म्हणजे जणूकाही, वर्गातील गुणी मुलांना नेहमी लॉलिपॉप देणारा व खोडकर, वात्रट मुलांना दमात घेणारा कोणी शाळाशिक्षक आहे, ह्या कल्पनेशी सादृश्य राखणारी वरील कल्पना आहे.

सामाजिक गुन्हा केला की, त्याला अवमानित करणारी शिक्षा द्यावयाची, कधीकधी तर अगदी अमानुष अशी शिक्षा द्यावयाची, या रानटी आणि अविचारी विचारप्रणालीशी साधर्म्य राखणारी ही कल्पना आहे.

देवाच्या प्रतिमेनुसार स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपल्या स्वत:च्या प्रतिमेमध्ये देवाला बसविण्यावर माणसाचा नेहमी भर असतो; परंतु या सर्व कल्पना म्हणजे आपल्यातील बालबुद्धीचे, आपल्यामध्ये असणाऱ्या रानटीपणाचे वा पशुचे प्रतिबिंब असते. आपण अजून त्यापलीकडे गेलो नाही किंवा आपल्यामध्ये रूपांतर घडवून आणू शकलो नाही, ह्याचेच ह्या कल्पना निदर्शक असतात….

ज्याअर्थी ह्या कल्पना इतक्या ठाशीवपणे आढळतात त्याअर्थी त्यांचा मानवाला घडविण्यामध्ये काही एक उपयोग असणार हे निश्चित. कदाचित असेदेखील असू शकेल की, अप्रगत जीवदशेतील लोकांबरोबर परमेश्वर त्यांच्या त्यांच्या बालीशतेला धरून व्यवहार करीत असेल; आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या वा पुनर्जन्माविषयीच्या, स्वर्गनरकाच्या त्यांच्या ज्या काही रोमांचकारी कल्पना असतात त्या कल्पना त्यांना बाळगू देण्यास तो संमती देत असेल. कदाचित मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या आणि पुनर्जन्माविषयीच्या या बक्षीस व शिक्षेच्या कल्पना आवश्यक असतील, कारण त्या आपल्या अर्ध-मानसिक पशुतेशी मिळत्याजुळत्या होत्या. पण खरंतर, एका विशिष्ट दशेनंतर ही प्रणाली तितकीशी परिणामकारक ठरत नाही. माणसं स्वर्ग व नरक या कल्पनांवर विश्वास ठेवतात पण ….मृत्युशय्येवर पश्चात्ताप होईपर्यंत किंवा गंगातीरी जाऊन स्नान करेपर्यंत किंवा बनारसमध्ये पवित्र मरण येईपर्यंत खुशाल पापं करीत राहतात; (बालीशपणापासून सुटका करून घेण्याची ही सारी बालीश साधनं आहेत.)

पण सरतेशेवटी, मन परिपक्व बनते तेव्हा मग ह्या बालीश, शाळकरी उपायांना ते तिरस्काराने दूर करते. कारण ज्याच्यामध्ये दैवी क्षमता सामावलेली असते अशा मानवाने, केवळ बक्षीस मिळते म्हणून गुणवान होणे किंवा भयामुळे पापापासून दूर राहणे हे मानवण्यासारखे नाही…. कृपणा: फलहेतव: असे गीतेमध्ये यथार्थपणे म्हटले आहे. ह्या एवढ्या विशालकाय, प्रचंड अशा जगाची व्यवस्था ह्या असल्या क्षुद्र, क्षुल्लक प्रेरणांवर बसवली असेल, हे न पटण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 265-268)

जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

जेव्हा ज्ञानामुळे शांत झालेले, प्रेमाने काठोकाठ भरलेले हृदय परमानंदित होते आणि सामर्थ्याने स्पंदित होऊ लागते; जेव्हा शक्तीच्या सामर्थ्यशाली भुजा, विश्वासाठी आनंद आणि प्रकाशाच्या ज्योतिर्मयी पुर्णत्वामध्ये परिश्रम घेतात; जेव्हा ज्ञानाचा दीप्तिमान मेंदू, हृदयाकडून आलेल्या धूसर अंत:प्रेरणा ग्रहण करतो आणि त्या रूपांतरित करतो आणि उच्चासनस्थित अशा संकल्पशक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला स्वाधीन करतो; जो जीव सर्व विश्वाच्या एकत्वामध्ये जीवन जगत असतो आणि रुपांतरित करण्याच्या भूमिकेतूनच विश्वातील सर्व गोष्टींचा स्वीकार करत असतो, अशा त्यागी जीवाच्या अधिष्ठानावर जेव्हा हे सर्व देव, एकत्रितपणे सुप्रतिष्ठित होतात; हीच ती अवस्था असते जेव्हा मनुष्य समग्रतया स्व-अतीत होतो.

… हाच तो अतिमानवत्वाकडे जाण्याचा दिव्य मार्ग !

*

अतिमानव कोण?

मनोमय मानवी अस्तित्व भंगलेले आहे हे जाणून, जो या जडभौतिकाच्या वर उठून; वैश्विकतेने स्वत:ला भारून घेतो आणि दिव्य शक्तीसामर्थ्य, दिव्य प्रेम व आनंद आणि दिव्य ज्ञान यामध्ये देवसायुज्यत्व साधतो, तोच अतिमानव !

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 157), (CWSA 12 : 439)

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, या पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामध्ये आपल्या (मनुष्याच्या) जन्म घेण्याचे गुप्त सत्य असेल तर, आज आहे तसा मनुष्य हा या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. आणि मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे; व ते केवळ साधनभूत आहे. चेतनेची केवळ एक मधली पायरी म्हणजे मन आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि जर का मनुष्य अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

परंतु मनाच्या अतीत असणाऱ्या अशा गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनाचीच क्षमता असेल तर मग मनुष्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानत्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्या उत्क्रांतीला आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

परमोच्चाकडून पृथ्वी ज्या कोणत्या महत्तम गोष्टीची अपेक्षा करू शकेल, ते वरदान आम्ही परमश्रेष्ठाकडे मागितलेले आहे ; आम्ही असे परिवर्तन मागितले आहे की, जे प्रत्यक्षात उतरविणे खूप कठीण आहे; ज्याच्या अटी, शर्ती ह्या खूप कष्टप्रद असणार आहेत. परमसत्य आणि त्याच्या शक्तीचे जडामध्ये अवतरण; जडाच्या पातळीवर, जडचेतनेमध्ये, भौतिक विश्वामध्ये अतिमानसाची प्रस्थापना आणि जडतत्त्वाच्या अगदी मूळापर्यंत झालेले संपूर्ण रुपांतरण, ह्यापेक्षा कोणतीही निम्नतर गोष्ट आम्ही मागितलेली नाही. केवळ परमोच्च कृपेद्वारेच हा चमत्कार घडून येऊ शकतो.

ती परमशक्ती अगदी जडचेतनेमध्येदेखील अवतरलेली आहे; पण तिचे आविष्करण होण्यापूर्वी, तिच्या महान कार्याला उघडपणाने सुरुवात होण्यापूर्वी, प्रभावशाली, परमश्रेष्ठाची कृपा असलेली परिस्थिती येथे असावी अशी तिची मागणी आहे; आणि त्याची वाट पाहत, ती जडभौतिकाच्या घनदाट पडद्याआड उभी आहे. या प्रकृतीमध्ये आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे आविष्करण होण्यासाठीची पहिली अट ही आहे की, सत्य हे तुमच्यामध्ये संपूर्णतया आणि काहीही हातचे राखून न ठेवता स्वीकारले गेले पाहिजे.

संपूर्ण समर्पण; केवळ दिव्य प्रभावासाठीच स्व-चे उन्मीलन; सातत्याने व संपूर्णपणे सत्याची निवड आणि असत्याचा त्याग, केवळ ह्याच अटी आहेत. पूर्णतया, कोणताही अंगचोरपणा न करता, कोणतीही कुचराई व ढोंगीपणा न करता; जडभौतिक जाणिवेच्या आणि तिच्या कार्याच्या अगदी खोलवरपर्यंत ह्या अटींचे पालन प्रामाणिकपणे केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 372-373)