विचार शलाका – ३९

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल की, ‘देव’च तुमचा गुरु आहे. योगाची स्वाभाविक प्रक्रिया घडून यावी म्हणून, अनंत प्रज्ञेने तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान आंतरिक आणि बाह्य परिस्थिती कशी सूक्ष्मपणाने नियोजित केली आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आंतरिक व बाह्य प्रवृत्तींना परस्परांवर कार्य करता यावे म्हणून, त्या कशा रीतीने रचल्या आहेत, कशा रीतीने एकत्रित आणल्या आहेत, जेणेकरून त्या प्रवृत्ती, पूर्णत्वामध्ये अपूर्णतांवर काम करू शकतील, हे तुम्हाला उमगेल. तुमच्या उन्नतीसाठी सर्वशक्तिमान प्रेम आणि प्रज्ञा कार्यरत आहेत. त्यामुळे जरी खूप वेळ लागताना दिसत असला तरी त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही, परंतु जेव्हा अपूर्णता आणि अडथळे उद्भवताना दिसतील तेव्हा अप्रमत्त (सावध) राहा, धीर धरा आणि उत्साह टिकवून ठेवा आणि इतर सारे काही ‘देवा’वर सोपवून द्या.

काळ आवश्यक आहे. तुमच्यामध्ये प्रचंड कार्य चालू आहे, तुमच्या समग्र मानवी प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविण्याचे, उत्क्रांतीच्या अनेक शतकांचे कार्य काही थोड्या वर्षांमध्ये घडविण्याचे कार्य तुमच्यामध्ये सुरु आहे, त्यामुळे काळ आवश्यकच आहे. तुम्ही काळाविषयी कुरकूर करता कामा नये. इतरही काही मार्ग असतात की, ज्यामधून तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येतात; तुम्ही स्वतःच करू शकाल, अशा काही निश्चित क्रिया ते मार्ग तुम्हाला देतात; तुम्ही काही (साधना) करत आहात, आज इतके अधिक प्राणायाम केले, आज इतक्या जास्त वेळ आसन स्थिर केले, आज इतक्या अधिक वेळा जप केला, इतके इतके केले, त्यातून तुम्ही निश्चित अशी किती प्रगती केली ते कळून येते आणि या भावनांच्या माध्यमातून तुमच्या अहंकाराला समाधान लाभते. त्या साऱ्या मानवी पद्धती झाल्या, परंतु अनंत ‘शक्ती’ अशा पद्धतीने कार्य करत नाही. ती सावकाशपणे वाटचाल करते, कधीकधी तर ती तिच्या ध्येयाप्रत अव्यक्त गतीने वाटचाल करते, कुठे ती प्रगती करताना दिसते, तर कधी मध्येच थांबलेली दिसते, आणि पुढे मग केव्हातरी अगदी जोरकसपणाने आणि विजयी रीतीने, तिने जे भव्य कार्य उभारले आहे ते आपल्यासमोर उघड करते.

उपरोक्त कृत्रिम मार्ग हे मानवी बुद्धीने काढलेल्या कालव्यांप्रमाणे असतात; त्यामधून तुम्ही सुलभपणे, सुरक्षितपणे आणि खात्रीपूर्वक प्रवास करू शकता पण तो प्रवास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत अशा प्रकारचा असतो. पण एकदा का तुम्ही पूर्णयोगाचा मार्ग निवडलात की, मग तुम्ही त्या मार्गालाच धरून राहिले पाहिजे. हा मार्ग मात्र विस्तृत आणि पथविरहित समुद्रासारखा आहे की, ज्यामध्ये अनंताच्या स्वातंत्र्यामध्ये तुमचा प्रवेश झालेला असतो आणि तुम्ही या जगातील विविध प्रांतांमध्ये मुक्तपणे विहार करू शकता. तुम्हाला जर का कशाची आवश्यकता असेल, तर ती एका जहाजाची, त्याला दिशा देणाऱ्या चक्राची, दिशादर्शक यंत्राची, प्रेरक शक्तीची आणि कुशल कप्तानाची!

‘ब्रह्मविद्या’ हे आहे तुमचे जहाज, श्रद्धा म्हणजे दिशा देणारे चक्र, आत्म-समर्पण हे आहे तुमचे दिशादर्शक यंत्र, ईश्वराच्या आज्ञेनुसार जगताची निर्मिती करणारी, त्यांना दिशा देणारी आणि त्यांचा विनाश घडवून आणणारी शक्ती ही आहे तुमची प्रेरकशक्ती आणि स्वतः ‘देव’च तुमचा कप्तान आहे. परंतु त्याचा कार्य करण्याचा स्वतःचा असा एक मार्ग आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा स्वतःचा असा एक काळ आहे. त्याच्या मार्गाकडे लक्ष ठेवून राहा आणि त्याच्या योग्य काळाची वाट पाहा.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 87-88)

विचार शलाका – ३८

आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट असली तरी, वैयक्तिक ‘मुक्ती’ हे त्याचे उद्दिष्ट नाही; तर मानवाची मुक्ती आणि त्याचे रूपांतरण हे या योगाचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक ‘आनंद’ नव्हे, तर दिव्य ‘आनंद’ खाली भूतलावर उतरविणे, ‘ख्रिस्ता’चे स्वर्गसाम्राज्य आणि आपले ‘सत्ययुग’ या पृथ्वीवर अवतरविणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. मोक्षाबाबत म्हणाल तर, आपल्याला वैयक्तिकरित्या त्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा नित्यमुक्तच असतो आणि बंधन हा भ्रम आहे. वास्तविक आपण बद्ध नाही परंतु आपण बद्ध असल्याप्रमाणे लीलेमध्ये सहभागी होतो. जेव्हा ‘देवाची’ इच्छा होईल तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. कारण तो, आपला परम ‘आत्मा’ हाच या खेळाचा स्वामी आहे आणि त्याच्या कृपेविना आणि त्याच्या अनुमतीविना कोणताही जीव हा खेळ सोडून जाऊ शकत नाही. बरेचदा आपल्यातील ‘देवाची’ इच्छाच आपल्या मनाला अज्ञानाच्या भोगामधून, द्वैतामधून, सुख आणि दुःखामधून, मौजमजा आणि वेदना यांतून, पापपुण्यामधून, भोग आणि त्यागामधून घेऊन जात असते. युगानुयुगे, अनेकानेक देशांमध्ये त्याच्या मनाला योगाचा विचार देखील शिवत नाही आणि तो शतकानुशतके हा खेळ अथकपणे खेळत राहतो. यामध्ये गैर असे काही नाही किंवा आपण ज्याचा धिक्कार करावा असेही त्यात काही नाही किंवा आपण स्वतःचा संकोच करावा असेही त्यात काही नाही, कारण ही ‘देवाची’ लीला आहे. खरा ज्ञानी मनुष्य तोच की, जो हे सत्य ओळखतो, स्वतःचे स्वातंत्र्य ज्ञात करून घेतो आणि तरीही ‘देवा’च्या या खेळामध्ये सहभागी होतो आणि या खेळाची पद्धत बदलण्यासाठी म्हणून त्याच्या आज्ञेची वाट पाहात राहतो.

आता ही आज्ञा झाली आहे. सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून देव स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या चतुर्युगामध्ये तरी तो देश भारत आहे. जेव्हा तो देव अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रूंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे कालीच्या लीलेचे पूर्ण सौख्य उपभोगण्याचे ठरवितो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंदावतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो, जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीमधून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील नारायण हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की ज्यामुळे, भारताने ज्ञान व त्याच्या परिणामस्वरूप येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा भारतातील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर भारताचा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)

विचार शलाका – ३७

पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील आध्यात्मिक अनुभव घेण्यावरच समाधानी राहिले. परंतु मन हे अनंताचे, अ-भंगाचे केवळ आंशिकच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अ-भंगाला पूर्णांशाने कवळू शकत नाही. त्याला कवळून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे एकतर भावसमाधीद्वारे, मोक्षाच्या मुक्तीद्वारे किंवा निर्वाणाच्या विलयाद्वारे किंवा तत्सम गोष्टींद्वारे त्याला जाणून घेणे हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नाही. कोठे तरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अ-लक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्य या इथेच मूर्तिमंत ‘ईश्वर’ व्हावा, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही तो ‘ईश्वर’च व्हावा, त्याने या जीवनामध्येच ‘देवा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे. योगाच्या जुन्या पद्धती, आत्मा आणि जीवन यांचे ऐक्य घडवून आणू शकल्या नाहीत किंवा त्या त्यांचा समन्वयही घडवून आणू शकल्या नाहीत. एकतर माया म्हणून किंवा ‘देवा’ची ही अनित्य लीला आहे असे समजून त्यांनी ऐहिकाची उपेक्षा केली. त्याचा परिणाम म्हणून जीवनशक्तीचा ऱ्हास झाला आणि ‘भारता’ची अवनती झाली. ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे की, ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्’ म्हणजे, ”मी जर कार्य केले नाही तर हे लोक छिन्नविछिन्न होऊन जातील.” आणि खरोखर भारतातील अशी माणसं दुर्दशेला जाऊन पोहोचली आहेत. काही मोजक्या तपस्व्यांना, संन्याशांना, पुण्यात्म्यांना आणि साक्षात्कारी जीवांना मुक्ती मिळाली; काही थोडे भक्त हे देवधुंद होऊन, त्याच्या आनंदाने, देवाविषयीच्या प्रेमावेशाने नाचूबागडू लागले पण दुसरीकडे मात्र एक संपूर्ण मानववंश प्राण आणि बुद्धी यांच्या अभावी, जर अंधकाराच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत जात असेल तर, ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सिद्धी म्हणायची?

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 360-361)

विचार शलाका – ३६

योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे आत्मसमर्पणाचा संकल्प करणे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी स्वतःला ‘देवा’च्या हाती सोपवा. कोणतीही अट लादू नका, कोणतीही मागणी मागू नका, अगदी योगसिद्धीचीही मागणी करू नका. कारण अन्य कोणत्याही माध्यमातून नव्हे तर, तुमच्यामध्ये जे आहे त्याद्वारे आणि तुमच्या माध्यमातूनच ‘देवा’ची इच्छा थेटपणे कार्यरत होते. जे कोणी त्याच्याकडे मागणी करतात, त्यांना ‘देव’ त्यांनी जे मागितले आहे ते देतो. परंतु कोणतीही मागणी न करता, जे कोणी स्वतःलाच देऊ करतात, त्यांना ‘देव’ सर्व काही प्रदान करतो, त्यांनी जे मागितले असते किंवा त्यांना जे आवश्यक असते तेही तो देतो आणि त्याशिवाय, ‘देव’ स्वतःलाही त्यांना देऊ करतो आणि त्याच्या प्रेमाचे सहजस्फूर्त असे वरदानही प्रदान करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

विचार शलाका – ३५

प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत.

एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठताबसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत ध्यान साधता आले पाहिजे. मनाचे सैरावैरा भरकटणे, विसराळूपणा, निद्रा, शारीरिक आणि नसांची अधीरता, अशांती या साऱ्या ध्यानाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे चढतेवाढते पावित्र्य आणि जेथून विचार आणि भावनांचा उदय होतो, त्या चित्ताची स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक पूर्णत्व आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

विचार शलाका – ३४

प्रश्न : ध्यानाची संकल्पना काय असली पाहिजे किंवा ध्यानाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे ?

श्रीअरविंद : जे तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ते! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी म्हणेन की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि मनाने सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो देव ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘स्वतः’मधीलच देव आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा, पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

विचार शलाका – ३१

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ‘पूर्णयोगा’साठी निवड निश्चित झालेली असते तेव्हा सर्व परिस्थिती, मनाचे आणि जीवनाचे सारे चढउतार हे त्या व्यक्तीला, या ना त्या प्रकारे योगाकडेच घेऊन जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतात. त्याच्या स्वतःच्या चैत्यपुरुषाकडून आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’कडून, अशा व्यक्तीच्या बाह्यवर्ती परिस्थितीचे चढउतार आणि मनाचे चढउतार या दोन्हींचा वापर त्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी करून घेतला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 30-31)

विचार शलाका – ३०

चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.

अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.

श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)

विचार शलाका – २९

…‘अवतार’ कोणत्या कारणासाठी जन्म घेतात? तर मानवाला पुन्हा पुन्हा अधिकाधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी; त्याच्यामध्ये उच्च, उच्चतर, अधिकाधिक उच्चतर अशी मानवता विकसित व्हावी यासाठी; दिव्य जीवाचा अधिकाधिक महान विकास व्हावा यासाठी; जोवर आपले परिश्रम पूर्णत्वाला जात नाहीत, आपले कार्य सिद्धीस जात नाही आणि या जडभौतिक विश्वामध्येसुद्धा ‘सच्चिदानंद’ परिपूर्णतेने भरून जात नाही, तोवर या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अधिकाधिक स्वर्गलोकाचे अवतरण घडविण्यासाठी, अवतार जन्माला येत असतात. केवळ स्वतःच्या किंवा काही मोजक्या लोकांच्या मुक्तीसाठी जर एखादा परिश्रम करत असेल आणि जरी तो त्यात यशस्वी झाला तरी त्याचे कार्य हे लहानच असते. परंतु जो अखिल मानवजातीच्या पूर्णत्वासाठी, शुद्धतेसाठी, आनंदासाठी, जिवाच्या शांतीसाठी प्रयत्नशील राहतो आणि त्यासाठीच जीवन जगतो, तो जरी अयशस्वी झाला किंवा जरी त्याला त्यामध्ये आंशिकच यश मिळाले किंवा काही काळापुरतेच यश मिळाले तरी, त्याचे ते कार्य अनंतपटीने महान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)