“बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम विजयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे. त्याने ध्येय संपादन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सातत्यपूर्ण प्रगतीची शक्यता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”

मी निरपवाद प्रामाणिकपणावर एवढा भर का देत असते? ते तुम्हाला सांगते. तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही लहान होतात त्या वेळी तुम्हाला काय शिकवण्यात आले होते ते कदाचित तुम्हाला आठवत असेल. बहुधा सर्वच पालक त्यांच्या मुलांना सांगत असतात की, ”तुम्ही खोटे बोलता कामा नये, खोटे बोलणे अतिशय वाईट असते.” परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ते स्वतःच बरेचदा तुमच्यासमोर खोटं बोलत असतात. आणि मग जी गोष्ट ते स्वतःच करत नाहीयेत, ती गोष्ट ते तुम्हाला का करायला सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि असे असूनसुद्धा, प्रामाणिक असणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे अगदी लहान वयातच मुलांना सांगितले गेले पाहिजे.

दुसऱ्यांपेक्षा चलाख (smart) कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी, हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण पालकांनी जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितले की, “तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शीसुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत आणि स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही जसे आज आहात तसेच कायम राहाल. तेव्हा तुम्हाला अगदी नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून जरी बाहेर पडायचे असेल आणि विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.

करू नये अशी एखादी गोष्ट जर तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केली पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘ते चांगले नाही‌’ किंवा ‘ते घृणास्पद आहे’, एवढेच नव्हे तर, ‘ते दुष्टपणाचे आहे.” (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 15 : 297-298)

साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे हजार मार्ग असतात. मग अशा वेळी व्यक्तीने तिचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : सावकाशपणे करायचे हे एक दीर्घकालीन कार्य आहे. व्यक्तीमध्ये जर परिपूर्ण प्रामाणिकपणा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने सतत सावध असणे आणि सतत जागता पहारा ठेवणे आवश्यक असते; त्यासाठी तिने स्वतःच्या भावभावना-तरंगांचे आणि प्राणिक प्रतिक्रियांचे निरीक्षण करत राहिले पाहिजे; स्वतःच्या दुर्बलतेची कोडकौतुकं करण्याच्या नादात त्या गोष्टींकडे कधीच डोळेझाक करता कामा नये. (पण एवढी सतर्कता बाळगूनही) जेव्हा कधी एखादी चूक तिच्या हातून घडेल तेव्हा, मग भलेही ती चूक कितीही लहानशी असली तरीपण, प्रत्येक वेळी त्या चुकीसाठी व्यक्तीने स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. व्यक्ती असे जर सातत्याने करत राहिली तर, ही गोष्ट खूपच स्वारस्यपूर्ण होते आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक सोपी होत जाते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 295–296)

 

व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

*

आंतरिक संघर्ष ही प्रामाणिकपणाच्या अभावाची खूण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68, 69)

ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल अशा वेळी, तिने जर अगदी प्रामाणिकपणे ईश्वराला आवाहन केले आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा केली तर, व्यक्तीला त्याच्याकडून नेहमीच प्रतिसाद मिळतो. मात्र एकीकडे आवाहन करायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे, “आता मी ईश्वराला आवाहन तर केले आहे, पण तो प्रतिसाद देतोय का पाहू या,” असे म्हणायचे, (बरेच जणं असं करतात.) पण अर्थातच ही गोष्ट काही योग्य नाही. व्यक्ती जर मन निश्चल-निरव करू शकली आणि ती थोडी जरी शांत झाली तर, ईश्वरी साहाय्य मिळत आहे हे तिला संवेदित होते. एवढेच नव्हे तर, ते साहाय्य कोणत्या रूपात मिळणार आहे तेही तिला संवेदित होते.

*

ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा शाश्वत चेतनेच्या दृष्टीने कितीतरी अधिक मौल्यवान असतो.

– श्रीमाताजी (CWM 05 : 370-371) & (CWM 12 : 129)

प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर आपण नतमस्तक झाले पाहिजे. आपण ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो, त्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे कधीही दाखवीत नाही.

*

व्यक्तीमध्ये जर खऱ्या मानसिक प्रामाणिकपणाचा उदय झाला तर तिला हे उमगेल की, मन हे केवळ एक माध्यम आहे, ते स्वयमेव गंतव्य नाही.

– श्रीमाताजी (CWM 08 : 73), (CWM 14 : 339)

साधक : प्राण रूपांतरणाची आस बाळगत असतो पण तो नेहमीच बाहेरून येणाऱ्या आवेगांना, गोष्टींना बळी पडत असतो. (म्हणून असा प्रश्न पडतो की) तो स्वतः स्वतःच्या रूपांतरणासाठी प्रयत्नशील नसतो का?

श्रीमाताजी : तो जर रूपांतरणाची आस बाळगत असेल तर ती गोष्ट खरंच खूप चांगली आहे. जर तो रूपांतरणाची अभीप्सा बाळगत असेल तर तो (स्वतःच्या कमतरतांपासून, दुर्बलतेपासून) स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. प्राणशक्ती दुबळी असेल तर तिची अभीप्साही क्षीण असते.

हे लक्षात घ्या की, दुर्बलता हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणा असतो. (दुर्बळ) व्यक्ती स्वतःलाच कोणत्या ना कोणत्या तरी सबबी देत राहते. कदाचित ती हे सारे नकळत करत असते. पण तुम्हाला हे अवश्य सांगितले पाहिजे की, अवचेतना (subconscient) ही अशी एक जागा असते की, जेथे अप्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. “मला अमुक एक गोष्ट करायला आवडली असती पण मला ती जमत नाहीये,” असे व्यक्ती जेव्हा दुर्बलतेच्या नावाखाली सांगत असते तेव्हा (ती दुर्बलता नसते, तर) तो त्या व्यक्तीचा अप्रमाणिकपणा असतो. कारण ती व्यक्ती जर खरंच प्रामाणिक असेल तर, ती आज जे करू शकत नाही, ते ती उद्या करू शकेल, आणि जे ती उद्या करू शकणार नाही ते ती परवा करू शकेल. तिला ती गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहते.

तुम्ही एकदाच कायमसाठी हे माहीत करून घ्या की, हे संपूर्ण विश्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, स्वतःचेच विस्मरण झालेला ईश्वर आहे. (किंवा इथे तुम्हाला हवे तर तुम्ही संपूर्ण विश्वाऐवजी संपूर्ण पृथ्वी, असेही म्हणू शकता.) त्यामुळे इथे दुर्बलतेला जागा कोठे आहे? (कारण) ईश्वरामध्ये दुर्बलता तर नक्कीच असू शकत नाही ना? मग दुर्बलता जर कुठे असेल तर ती कोठेतरी विस्मरणात असली पाहिजे. म्हणून, तुम्ही जर (उपरोक्त गोष्टीचे) विस्मरण होऊ नये म्हणून प्रयत्न केलेत तर, जेवढ्या प्रमाणात तुम्ही ईश्वराच्या निकट जाल तेवढ्या प्रमाणात तुमच्यामधून दुर्बलता नाहीशी होईल. आणि हे फक्त मनाच्या बाबतीतच खरे आहे असे नाही तर, तीच गोष्ट प्राणाला आणि शरीराला देखील लागू पडते.

सर्व प्रकारचे दु:खभोग, सर्व दुर्बलता, सर्व अक्षमता यांचे विश्लेषण केले तर या सर्व गोष्टींचे मूळ अप्रामाणिकपणामध्ये असल्याचे आढळते. बरेचजण मला सांगत असतात की ‘ते अगदी पूर्ण प्रामाणिक आहेत’, पण अप्रामाणिकपणा जिथे ठाण मांडून बसलेला असतो अशा अनेक जागा असतात. आणि म्हणूनच, ‘मी पूर्ण प्रामाणिक आहे,’ असे व्यक्तीने कधीच म्हणता कामा नये. “मी कधीच खोटे बोललेलो नाही,” असे माणसे छातीठोकपणे सांगत असतात, त्याप्रमाणेच हे आहे.

तुम्ही जर खरोखर पूर्ण प्रामाणिक असता, तर तुम्ही ईश्वरच झाले असता; तुम्ही जर खरोखर कधीच खोटे बोलला नसता, (पण ते काही खरे नसते) तर तुम्ही सत्यरूप झाले असता. पण, तुम्ही ईश्वरही नाही किंवा सत्यरूपही झालेले नाहीत. (खरंतर, मूळरूपात तुम्ही तसे आहात पण प्रत्यक्षात मात्र नाही.) त्यामुळे, सत्य आणि प्रामाणिकपणा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बरीच दीर्घ वाटचाल करावी लागणार आहे, हे निश्चित.

– श्रीमाताजी (CWM 04 : 252-253)

 

साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी केली गेली आहे. यांपैकी कोणतीही गोष्ट जर पूर्णपणे पारदर्शक असेल तर, कोणताही विपर्यास न होता, त्यामधून प्रकाश जसा आरपार जातो, त्याचप्रमाणे प्रामाणिक चेतना, दिव्य स्पंदनांमध्ये कोणताही विपर्यास न होऊ देता, त्याचे आरपार संक्रमण करते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 382)

 

मानसिक, प्राणिक किंवा शारीरिक प्राधान्यक्रम (preferences) आणि पूर्वकल्पना या गोष्टी म्हणजे परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे शत्रू असतात. या अडथळ्यांवर मात केलीच पाहिजे.

*

योगमार्गाचे जो कोणी प्रामाणिकपणे आचरण करतो त्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभणे क्रमप्राप्तच असते. पण बहुसंख्य लोक स्वत:लाच फसवत असतात. ते योगमार्गाचे अनुसरण करत आहेत अशी त्यांची समजूत असते, पण त्यांच्या व्यक्तित्वामध्ये विरोधाभास मात्र अजूनही जसेच्या तसे शिल्लक असतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 71, 70)

 

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा, उन्मुखता असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते किंवा कालांतराने त्यामध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 528)

 

(व्यक्तीला अमुक एखादी वाईट सवय सोडावी, असे वाटत असते पण तसे करणे तिला जमत नसते. अशा वेळी काय करावे असे श्रीमाताजींना एका साधकाने विचारले आहे, त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)

प्रामाणिकपणा अंगी बाणवा. अन्यथा एखाद्या फळामध्ये जशी लहानशी अळी लपून बसलेली असते, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये एखादी सवय सोडण्याविषयीची अनिच्छा दडून बसलेली असते. व्यक्ती स्वत:शीच म्हणत राहते की, ”नाही, मला हे जमत नाहीये.” पण हे काही खरे नसते, व्यक्तीची इच्छा असेल तर ती निश्चितपणे ठरवलेली गोष्ट करू शकते.

काही जण मला म्हणतात की, त्यांच्याकडे इच्छाशक्ती (willpower) नाहीये. तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ते प्रामाणिक नसतात. कारण जगातील कोणत्याही इच्छांपेक्षा प्रामाणिकपणा ही अधिक बलशाली शक्ती आहे. प्रामाणिकपणा कोणत्याही गोष्टीत निमिषार्धात बदल घडवून आणू शकतो, तो त्या इच्छेचा ताबा घेतो, तिला बाहेर ओढून काढतो आणि मग ती इच्छा संपून गेलेली असते. पण तुम्ही मात्र डोळेझाक करता आणि तुमच्या (इच्छावासनांसाठी) सबबी शोधून काढता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 19)