योगमार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरा प्रामाणिकपणा सामावलेला असतो कारण तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी आणि दिव्य प्रकाशामध्ये उदय पावण्यासाठी धडपडता, कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे मूळ प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 15 : 378)

प्रामाणिकपणा म्हणजे काय? आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या स्तरापर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाभोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

अस्तित्वाच्या विविध घटकांमध्ये परस्परांमध्ये दुफळी असणे हा अप्रामाणिकपणा असतो. तुमचा देह आणि तुमच्या अस्तित्वाचे सत्य या दोहोंमध्ये खोल दरी असणे हा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा या दरीमुळे तुमचे खरे अस्तित्व तुमच्या देहापासून विलग होते तेव्हा प्रकृती ती दरी सर्व प्रकारच्या विरोधी सूचनांच्या मदतीने तत्काळ भरून टाकते. भीती ही त्यातील सर्वात भयानक सूचना असते तर शंका ही त्यातील सर्वात घातक सूचना असते. कोठेही कोणत्याच गोष्टीमुळे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याला नकार न देणे, हा प्रामाणिकपणा असतो.

– श्रीमाताजी (Growing up with the Mother by Tara Jauhar : 165)

 

प्रामाणिकपणामध्ये (sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या संकल्पामध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याची आणि ईश्वराचे साधन बनण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, त्याला त्याच्या अभीप्सेबाबत खरोखरच गांभीर्य असते व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

 

साधक : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नकोय, फक्त ईश्वरच हवा आहे. पण मी जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो किंवा साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेला असतो, तेव्हा साहजिकच मला माझ्या ध्येयाची म्हणजे ईश्वराची आठवण राहत नाही. हा ‘अप्रामाणिकपणा‌’ आहे का?

श्रीमाताजी : होय. हा अप्रामाणिकपणा आहे. ज्यावेळी व्यक्तीच्या एका घटकाला ईश्वर हवा असतो आणि दुसऱ्या घटकाला मात्र निराळेच काहीतरी हवे असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणाच असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक बनते. परंतु इच्छाशक्ती दृढ असेल आणि ईश्वरी कृपेवर संपूर्ण विश्वास असेल तर, हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68)

साधक : आपल्या पूर्णयोगाच्या दृष्टीने प्रामाणिकपणा याचा अर्थ कृपया सांगाल का?

श्रीअरविंद : ईश्वराप्रत असलेल्या अत्युच्च अभीप्सेशी विसंगत होण्यास, अस्तित्वाच्या कोणत्याही घटकाला अनुमती न देणे म्हणजे प्रामाणिकपणा.

(Guidance from Sri Aurobindo to Nagin Doshi, Vol 01 : 110)

*

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांनी ईश्वराप्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक असते. म्हणजे असे की, एखाद्या घटकाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे घटक मात्र त्याला नकार देतात किंवा बंड करतात, असे असता कामा नये.

प्रसिद्धी किंवा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा शक्ती मिळविण्यासाठी नव्हे अथवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठीदेखील नव्हे, तर ईश्वरासाठीच ईश्वर हवा असणे, म्हणजे अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असणे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

 

प्रामाणिकपणा ही ईश्वराप्रत जाणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे.
*
प्रामाणिक व्हा. प्रामाणिकपणा हे दिव्यत्वाचे‌ महाद्वार आहे.
*
तुम्ही प्रामाणिक राहा आणि मग जर आवश्यकता पडलीच तर हजार वेळासुद्धा तुमच्या चुका सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक-कवच आहे.
*
साधासरळ प्रामाणिकपणा हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा प्रारंभ असतो.
*
तुमचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता, प्रामाणिक व्हा, म्हणजे असे की, प्रामाणिकपणाला तुमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनवा.
*
पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.
*
प्रामाणिकपणा व निष्ठा हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.
*
जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते व ईश्वराकडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकपणा असतो तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.
*
जेथे प्रामाणिकपणा आणि सदिच्छा असते तेथे ईश्वरी साहाय्यसुद्धा असते.
*
प्रत्येकालाच संधी देण्यात आलेली असते आणि सर्वांसाठी ईश्वरी साहाय्यदेखील उपलब्ध असते. पण प्रत्येकाला त्याचा किती लाभ होणार हे त्याच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 68, 86)

 

साधक : अहंभावात्मक व अज्ञानी शक्ती आणि श्रीमाताजींची दिव्य शक्ती यामध्ये एखाद्या साधकाला जर पूर्णतः फरक करता येत नसेल आणि तो कनिष्ठ शक्तींना नकार देऊ शकत नसेल, तर त्या साधकाची अवस्था कशी होईल? त्या साधकाने योगमार्गाचा अवलंब करण्यासाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे?

श्रीअरविंद : कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीलाच दिव्य शक्ती आणि अदिव्य व कनिष्ठ शक्तींमध्ये पूर्णपणे फरक करू शकत नाही किंवा त्या कनिष्ठ शक्तींना लगेचच पूर्णपणे नकारही देऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण यश येईपर्यंत त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणे, ही गोष्ट अनिवार्य असते. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगी संपूर्ण प्रामाणिकपणा असतो तोपर्यंत ईश्वरी कृपा निश्चितपणे व्यक्तीसोबत असते आणि ती कृपा त्या व्यक्तीला योगमार्गावर प्रत्येक क्षणी साहाय्य करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 225)

 

तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि साक्षात्‌‍ अनुभूतीच्या सर्व क्षमता तो गमावून बसतो. ही त्याला मिळालेली शिक्षा असते. तो स्वत:मध्ये आणि ईश्वरामध्ये आवरणे निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेतो. ईश्वर त्याच्यापासून दूर जात नाही तर, तो मनुष्य ईश्वराचे स्वागत करण्यास स्वत:ला अक्षम बनवितो. म्हणजे, ईश्वर हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस हे असे मुळातच काही नसते.

जी व्यक्ती अप्रामाणिक असते, जी दुरिच्छा बाळगत असते, जी विश्वासघातकी असते ती व्यक्ती स्वत:हून स्वत:वर शिक्षा ओढवून घेत असते. अप्रामाणिक माणसांकडे जी थोडीफार चेतना शिल्लक असते आणि जिच्यामुळे त्यांना ते दुष्ट आहेत, हे कळू शकले असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. इतके की जणू काही ते अचेतन असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी त्यांना (सत्य-मिथ्या, खरे-खोटे इ.) काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 21-22)

 

(आंतरिक धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन म्हणजे यातनाघरच कसे असते, ते श्रीमाताजींनी सांगितले. आपण तो मुद्दा कालच्या भागात विचारात घेतला. आता, अशा दुराचारी व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिकपणाचा काय उपयोग होतो, ते श्रीमाताजी स्पष्ट करत आहेत.)

आंतरिक धर्माचे पालन न करणारा मनुष्य जी कोणती गोष्ट करू पाहील त्यात त्याला यश मिळणारच नाही, असे नाही. तो ज्या गोष्टीची इच्छा बाळगेल ती गोष्ट संपादन करणे त्याला शक्यच होणार नाही, असेही नाही. पण यदाकदाचित, त्याच्या वाट्याला दुर्दैव आलेच तर, त्याच्या आंतरतम अस्तित्वामध्ये प्रामाणिकपणाची एक धुगधुगी अजूनही कुठेतरी शिल्लक आहे, याचे ते द्योतक असते. (त्या दुर्दैवाच्या माध्यमातून जीवन त्याला जो बोध देऊ पाहत असते त्या बोधास तो त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणामुळे पात्र ठरतो.) तेव्हा अगोदर त्याला यश, इच्छावासनांची परिपूर्ती इत्यादी गोष्टींचे जे बाह्य लाभ होत होते ते आता मिळेनासे होतात.

आणि म्हणूनच, जेव्हा एखाद्या दुर्वर्तनी मनुष्याच्या वाट्याला दुर्दैव येते आणि त्यामुळे तो जेव्हा दुःखीकष्टी होतो; त्याला जेव्हा पश्चात्ताप होतो तेव्हा, (तुम्ही त्याच्या दुःखकष्टावर उपहासाने न हसता) त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. त्याच्या अंतरंगातील प्रामाणिकपणाची ज्योत अजून पूर्णपणे विझलेली नाही आणि त्याच्या वाईट कृत्यांबद्दल अजूनही त्याच्या अंतरंगातील कोणीतरी त्याला समज देऊ पाहत आहे, असा त्याच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाचा अर्थ होतो. अंतिमतः पुन्हा आपण त्याच मुद्द्यापाशी येतो की, तुम्ही व्यक्तीच्या बाह्य रंगरूपाकडे पाहून, कधीही त्या व्यक्तीविषयीचे अडाखे बांधता कामा नयेत. तुम्ही बाह्य परिस्थिती पाहून काही निष्कर्ष काढाल तर, तुमचा तो अंदाज नेहमीच निश्चितपणे खोटा ठरेल, या निरीक्षणापाशीच आपण येतो.

सत्याची एक झलक मिळण्यासाठी, व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमध्ये किमान थोडेसे तरी वळले पाहिजे; तिने स्वतःच्या अंतरंगात थोडेतरी डोकावून पहिले पाहिजे आणि वरकरणी दिसणाऱ्या दृश्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींच्या खेळाकडे आणि त्या खेळाच्याही पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी उपस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 279)